श्रीरामपूर / प्रतिनिधी:
अशोक सहकारी बँकेची वाटचाल आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने प्रगतीपथाकडे सुरू आहे. बँकेने नुकतीच क्युआर कोड सुविधा सुरु केलेली असून या सुविधेमुळे बँकेच्या खातेदारांना बँकेत थेट पैसे भरणे सोयीस्कर झालेले असून त्यांना बँकेत समक्ष जाण्याची आवश्यकता नाही. सध्या या सुविधेचा लाभ बँकेच्या खातेदारांना मोठ्या प्रमाणावर होत आहे. याबरोबरच अशोक बँक थोड्याच दिवसांत आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करुन इंटरनेट बँकींग तसेच फोन बँकींगमध्ये फोन पे, गुगल पे अशा आधुनिक सुविधा खातेदारांना उपलब्ध करून देणार आहे. त्यामुळे बँकेच्या खातेदारांना त्यांचे खात्यातून पैसे काढणे अथवा अन्य ठिकाणी पैसे पाठविणे सोयीस्कर होणार असून या सुविधांमुळे बँकेच्या खातेदारांना बँकेत समक्ष जाण्याची आवश्यकता पडणार नाही, अशी माहिती अशोक बँकेचे संस्थापक तथा चार्टर्ड अकौंटंट माजी आ. भानुदास मुरकुटे यांनी दिली.
अशोक सहकारी बँकेची सन २०२३-२४ ची वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवारी (३० सप्टेंबर) रोजी बँकेचे चेअरमन अॅड.सुभाष चौधरी यांचे अध्यक्षतेखाली अहमदनगर येथे संपन्न झाली त्याप्रसंगी श्री. मुरकुटे बोलत होते.
बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदिप थोरात यांनी बँकेला सन २०२३-२४ या वर्षामध्ये एकूण ढोबळ नफा ७ कोटी ७२ लाख झाला असून आयकर २ कोटी ७४ लाख भरला आहे. घसारा ७१ लाख, थकीत कर्ज तरतूद ५० लाख, ठेव विमा हप्ता ५८ लाख अशा सर्व तरतूदी वजा जाता ताळेबंदाला निव्वळ नफा रुपये ३ कोटी १९ लाख झाला आहे, असे ते म्हणाले.
दि.३१ मार्च २०२४ अखेर बँकेच्या एकूण ठेवी रुपये ४९५ कोटी असून कर्ज वाटप ३४० कोटी तर खेळते भांडवल ५६३ कोटी आहे. तसेच रिझर्व बँकेच्या नियमाप्रमाणे सर्व निकष पूर्ण केल्यामुळे बँकेला ऑडिट वर्ग ‘अ’ मिळाला आहे. बँकेच्या सध्या १३ शाखा कार्यान्वित असून दोन स्वमालकीचे ए.टी.एम. आहेत. बँकेच्या संचालक मंडळात चार्टर्ड अकौंटंट, वकील, व्यापारी तसेच व्यावसयिकांचा समावेश आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बँकेने नेट एन.पी.ए.चे प्रमाण ५% चे आत राखले आहे, अशी माहिती बँकेचे चेअरमन अॅड.सुभाष चौधरी यांनी दिली. सदर सभेसाठी बँकेचे व्हा. चेअरमन भाऊसाहेब हळनोर, सभासद, संचालक मंडळ, बँकेचे अधिकारी उपस्थित होते. सदर सभेचे कामकाज खेळीमेळीत पार पडले.
*संकलन
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर -९५६११७४१११