न्युझिलंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांतील पराभवानंतर पुढील वर्षी जूनमध्ये होणाऱ्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या (डब्ल्यूटीसी) अंतिम फेरीतील भारताचे स्थान टांगणीला लागले आहे आणि त्यात सलग तिसऱ्यांदा यश मिळाले तरी त्यानंतर पुढील डब्ल्यूटीसी सर्कल मध्ये कर्णधार रोहित शर्माला दोन वर्षांसाठी संघात राखणे कठीण वाटते. हीच गोष्ट रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा आणि विराट कोहली यांना लागू होते. तेव्हा अश्विन ४१ वर्षांचा तर जडेजा आणि कोहली ३९ वर्षांचे असतील.
न्युझिलंडकडून झालेल्या लाजिरवाण्या पराभवानंतर काही वरिष्ठ खेळाडूंकडे बोटे दाखवली जाऊ लागली आहेत. अशा परिस्थितीत भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी विद्यमान प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्याबद्दल सहानुभूती व्यक्त केली. पुण्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात समालोचन करताना शास्त्री म्हणाले, “ न्युझिलंडने दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये भारताचा दारुण पराभव केला आहे. हा विचार करण्यासारखा विषय आहे. गंभीरने नुकताच पदभार स्विकारला आहे. ज्या संघाचे इतके चाहते आहेत त्या संघाचा प्रशिक्षक बनणे कधीही सोपे नसते.”
एकंदर प्रशिक्षक म्हणून त्याच्या कारकिर्दीचे सुरुवातीचे दिवस आहेत, पण तो लवकरच शिकेल, यात शंका नाही. भारतीय संघही बदलाच्या कठीण काळातून जात आहे. पुढील दोन वर्षांत किमान चार जागतिक दर्जाचे क्रिकेटपटू या खेळातून निवृत्त होणार असल्याने, गंभीरसाठी प्रशिक्षक म्हणून एक असंतुलिनय स्थिती आहे. भारताकडे फलंदाजीचे अनेक पर्याय आहेत पण गोलंदाजीच्या बाबतीत असे म्हणता येणार नाही.
दुखापतीमुळे सध्या संघाबाहेर असलेल्या मोहम्मद शमीने पुनरागमन केले तरी तो संघात फार काळ टिकू शकणार नाही. आकाशदीप आणि मोहम्मद सिराज हे चांगले गोलंदाज आहेत पण जेव्हा जसप्रीत बुमराह दुसऱ्या टोकाकडून गोलंदाजी करत असतो तेव्हा या दोन वेगवान गोलंदाजांमध्ये शमीसारखी घातक मारा करण्याची क्षमता नाही. यानंतर पुढच्या रांगेत उभ्या असलेल्या वेगवान गोलंदाजांनाही काहीसा त्रास होतो. आवेश खान आणि खलील अहमद हे चांगले वेगवान गोलंदाज आहेत पण सातत्य आणि फिटनेस ही त्यांची मोठी समस्या आहे.
नवदीप सैनीचा वेग मंदावला आहे तर उमरान मलिकचा मार्ग चुकला आहे. मुकेश कुमार, विशाक विजयकुमार, विदावथ कवेरप्पा यांच्याकडे फलंदाजांच्या मनात शंका निर्माण होईल असा वेग नाही. मयंक यादवला लांबच्या फॉरमॅटमध्ये खेळायचे असेल तर त्याला त्याच्या फिटनेसकडे खूप लक्ष द्यावे लागेल. दुसरी अडचण अष्टपैलू खेळाडूची आहे, जो वेगवान गोलंदाजीही करतो. हार्दिक पांड्या ३० वर्षांचा आहे आणि दीर्घकालीन फॉर्मेटला त्याचे प्राधान्य आहे की नाही याबद्दल शंका आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारताने नितीश कुमार रेड्डी यांची संघात निवड केली आहे, मात्र पर्याय नसल्यामुळे तो संघाचा भाग बनल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. आगामी काळात भारताला फिरकी विभागात अश्विन आणि जडेजाची उणीव भासेल. भारतीय संघाकडे अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर हे पर्याय आहेत पण हे दोघेही त्यांच्यासारख्या दोन्ही विभागात छाप सोडू शकतील की नाही हे भविष्यात पाहणे बाकी आहे.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने न्युझिलंडविरुद्धची कसोटी मालिका गमावली आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत किवीजने २-० अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. त्यांनी प्रथमच भारतीय भूमीवर कसोटी मालिका जिंकली. बेंगळुरू येथे झालेल्या पहिल्या कसोटीत भारताचा ८ विकेट्सनी पराभव झाला. तर पुण्यातील दुसऱ्या सामन्यात भारताचा ११३ धावांनी पराभव झाला. सध्या तर भारतावर क्लिन स्विपची तलवार टांगली आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर शेवटची कसोटी १ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे.
मुंबईत तिसरी कसोटी सुरू होईल तेव्हा रोहित ब्रिगेडवर २४ वर्षांचे 'कष्ट' वाचवण्याचे दडपण असेल. खरेतर, भारतीय संघाला मायदेशात २००० साली कसोटी मालिकेत क्लिन स्विपचा सामना करावा लागला होता. त्यावेळी दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताचा दक्षिण आफ्रिकेकडून व्हाईटवॉश झाला. वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेने भारताचा चार गडी राखून पराभव केला. तर बंगळुरू येथील दुसरी कसोटी दक्षिण आफ्रिकेने एक डाव आणि ७१ धावांनी जिंकली होती.
न्युझिलंडने अजेय आघाडी घेतल्याने भारताची सलग १८ कसोटी मालिका जिंकण्याची मालिका संपुष्टात आली. किवीजने ६९ वर्षांनंतर पहिल्यांदाच भारतात मालिका जिंकली. न्युझिलंड संघ सन १९५५ पासून येथे दौरा करत आहे, परंतु इतक्या वर्षात भारतीय किल्ला भेदू शकला नव्हता. भारताला १२ वर्षांनंतर प्रथमच घरच्या कसोटी मालिकेत पराभवाला सामोरे जावे लागले. टीम इंडियाला यापूर्वी २०१२ मध्ये इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत पराभवाचा सामना करावा लागला होता.
भारतीय संघाने सन १९३३ मध्ये घरच्या मैदानावर पहिली कसोटी खेळली होती. त्यानंतर भारताने घरच्या मैदानावर कसोटी मालिकेत क्लिन स्विपचा सामना फक्त एकदाच केला आहे. गेल्या ९१ वर्षांत दक्षिण आफ्रिके शिवाय इतर कोणत्याही संघाला हा पराक्रम करता आला नाही. अशा स्थितीत रोहित ब्रिगेड कोणत्याही किंमतीत मुंबईत विजयाची नोंद करण्याचा प्रयत्न करणार आहे. दुसऱ्या कसोटीनंतर वानखेडेवर नवीन हेतू, कल्पना आणि पद्धतींनी खेळण्याची गरज कर्णधाराने व्यक्त केली आणि मुंबईत भारतीय संघ विजयाचा झेंडा फडकवेल अशी आशा व्यक्त केली. हे सर्व बघता आपल्याकडे यापेक्षा दुसरा पर्यायही नाही.
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक
मो. क्रं - ९०९६३७२०८२