भविष्यातील ५० वर्षे योग्य दाबाने होणार वीज पुरवठा - आ. नमिता मुंदडा!!
प्रकाश मुंडे /बीड जिल्हा प्रतिनिधी:-
केज विधानसभा मतदार संघात महावितरणच्या गावठाणसाठी सुधारित वितरण क्षेत्र (आरडीएसएस) योजनेंतर्गत ३३ केव्हीची नवीन उपकेंद्रे उभारण्यात येत आहेत. तर, ८० कोटी रुपये खर्च करून गावठाण फिडर आणि शेती पंपासाठीचे फिडर वेगवेगळे केले जाणार आहेत.
याशिवाय मतदार संघात काही ठिकाणी अतिरिक्त ५ एमव्हीचे रोहित्र तर काही ठिकाणी नवीन १०० चे रोहित्र बसविण्यात येणार असल्याची माहिती केज विधानसभा मतदार संघाच्या आमदार नमिता मुंदडा यांनी दिली. त्यासोतच काही भागात गायरान जमिनीवर सौर पॅनल उभारून त्याद्वारे शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्यात येणार आहे. याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा उर्जामंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, आ. पंकजाताई मुंडे, भाजप नेत्या प्रीतमताई मुंडे यांचे आ. नमिता मुंदडा यांनी आभार मानले आहेत.
केज विधानसभा मतदारसंघातील अनेक गावांमध्ये गावठाण आणि शेतीपंपाचे फिडर एकच असल्याने गावठाणास अखंडित वीज पुरवठा मिळणे शक्य होत नाही. गावठाणातील ग्रामस्थांना घरगुती वापराची अखंडीत वीज मिळाली पाहिजे यासाठी केंद्र व राज्यसरकारच्या प्रत्येकी ५० टक्के निधीतून सुधारित वितरण क्षेत्र (आरडीएसएस) योजना राबविण्यात येते. भविष्याचा वेध घेत या योजनेचा लाभ केज विधानसभा मतदारसंघाला मिळण्यासाठी आ. नमिता मुंदडा यांनी ऊर्जा विभागाकडे पाठपुरावा करून ८० कोटींचा निधी उपलब्ध करून घेतला. याची निविदा प्रक्रिया देखील पूर्ण झाली आहे. यातून गावठाण फिडर आणि शेती पंपासाठीचे फिडर वेगवेगळे केले जाणार आहेत. त्यामुळे गावठाणात अखंडित वीज पुरवठा करणे शक्य होणार आहे. तसेच, जिथे नियमानुसार लोड आहे, आवश्यकता आहे ते सर्व्हेक्षणात घेतले असून तिथे १०० केव्ही रोहित्र बसविण्यात येणार आहेत. अनेक ठिकाणी जुने ११ केव्ही, ३३ केव्ही एल.टी. कंडक्टरची साईज कमी पडत आहे, कंडक्टरचे तुकडे पडत आहेत तिथे उच्च दर्जाचे कंडक्टर बसविण्यात येणार आहेत. नवीन ११ केव्ही, ३३ केव्ही लिंकलाईनची कामे करण्यात येतील. इन्सुलेटर, फिडर नुतनीकरण, दोन खांबात जास्त अंतर असेल तर्नवीन खांब उभारणे, नादुरुस्त खांब, ११ केव्ही, ३३ केव्ही बदलणे आदी कामे केली जातील. तसेच, ३३ केव्ही सबस्टेशन, ११ केव्ही फिडर वेगवेगळे करण्यात येणार असून ज्या गावातील रोहित्र वारंवार फेल होत आहेत तिथे एबी केबल टाकण्यात येणार आहेत.
*नवीन ३३ केव्ही उपकेंद्रांची होणार निर्मिती*
केज मतदार संघातील धावज्याची वाडी (ता. बीड), उंदरी, केवड, कासारी, सोनीजवळा, सारूळ, अशोक नगर (ता. केज), मगरवाडी, डीघोळआंबा, सोमनाथ बोरगाव, येल्डा, पाटोदा देवळा, पोखरी रोड अंबाजोगाई या ठिकाणी नवीन ३३ केव्ही उपकेंद्राची कामे होणार आहेत.
*अनेक उपकेंद्रातून अतिरिक्त ५ एमव्हीचे रोहित्र*
मतदार संघातील एकूण अकरा ३३ केव्ही उपकेंद्रात ५ एमव्हीचे अतिरिक्त रोहित्र बसविण्यात येणार आहे, यामध्ये नेकनूर (ता.बीड), आडस, कुंबेफळ, साळेगाव, चिंचोली माळी, कानडी माळी, युसुफ वडगाव, येवता, जवळबन (ता. केज), आपेगाव, कुंबेफळ (ता. अंबाजोगाई) या उपकेंद्रांचा समावेश आहे. तर, पाटोदा येथील ३३ केव्ही उपकेंद्रात ५ एमव्हीचे दोन नवीन रोहित्र लावले जाणार आहेत. तसेच, मांडवा पठाण (अंबाजोगाई) येथील उपकेंद्रात ५ एमव्ही ऐवजी १० एमव्हीचे रोहित्र बसवून क्षमतावाढ केली जाणार आहे.
*सारूळ उपकेंद्राची निविदाप्रक्रिया पूर्ण*
आ. मुंदडा यांचा प्रयत्नातून केज तालुक्यातील सारूळ येथे २२० / १३२ / ३३ केव्हीचे उपकेंद्र मंजूर झाले होते. याची निविदा प्रक्रिया पूर्ण झालासून येत्या तीन ते चार महिन्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. यापैकी १३२ केव्ही उपकेंद्रासाठी आणखी २ हेक्टर जमिनीची आवश्यक असून त्याची कार्यवाही सुरू आहे. हे उपकेंद्र वीज पुरवठ्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे असून त्यामुळे तालुक्यातील इतर उपकेंद्रांना यीग्य दाबाने विद्युत पुरवठा होणार आहे.
*उर्जामंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विकासाभिमुख भूमिकेचे कौतुक*
केज मतदार संघातील गावांसाठी उपमुख्यमंत्री तथा उर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वैयक्तिक लक्ष देऊन आरडीएसएस योजनेतून कोट्यावधी रुपयांचा निधी देत येथील विद्युत प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावले. या सर्व कामांमुळे नागरिकांना, ग्रामस्थांना भविष्यातील किमान ५० वर्षे तरी योग्य दाबाने सुरळीत वीज पुरवठा करणे शक्य होणार आहे. याबद्दल आणि शेतकऱ्यांना वीजमाफी व नंतर मोफत वीज यासाठी उर्जामंत्री फडणवीस यांचे केज विधानसभा मतदार संघातील जनतेकडून विशेष आभार मानले जात आहेत.