shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

डॉ. बाबासाहेब यांचे धम्मचक्रप्रवर्तन कशासाठी ? - प्रा.सुभाष वाघमारे

         जगाला शांती,समता , स्वातंत्र्य आणि दुःखमुक्तीचा मार्ग देणारा तथागत गौतम बुद्ध यांचा धम्म विचार ज्या बुद्धीप्रामाण्यवादी बाबासाहेबांनी स्वीकारला तो दिवस होता विजयादशमीचा. विषमता हेच ज्या धर्माचे माहेर आहे त्या धर्मातून बाहेर पडून बाबासाहेब यांनी १४ ऑक्टोबर १९५६  रोजी बुद्ध धम्म स्वीकारला. जगातील  अखिल मानवाच्या कल्याणासाठी सदा सर्वकाळ फक्त बौद्ध धम्मच राहील असा त्यांना सार्थ विश्वास होता. आणि आज दिशेनेच जग गेले तर हा मन कल्लोळ थांबणार आहे. बाबासाहेब बुद्ध धम्माकडे कसे वळले याचा शोध घेता गुरुवर्य कृष्णाजी अर्जुन केळुस्कर यांनी बालपणी त्यांना ‘गौतम बुद्धांचे चरित्र वाचायला दिले होते त्यामुळे त्यांची चिकित्सक बुद्धी जागृत झाली. एक प्रकारे प्रस्थापित धर्म आणि बुद्ध धम्म वेगळा आहे याची जाणीव होऊन त्यांना तुलनात्मक अभ्यास करण्याची दिशा देखील इथूनच मिळाली. २८ ऑक्टोबर १९५४ चे मुंबई  येथील भाषणात त्यांनी स्वतःचे तीन गुरु असून माझे पहिले गुरु बुद्ध आहेत असे सांगितलेले होते. याच भाषणात त्यांनी जगाचे कल्याण फक्त बुद्ध धर्मच करू शकेल हिंदू लोकांना आपले राष्ट्र जगवायचे असेल तर त्यांनी बुद्ध धम्म स्वीकारला पाहिजे असे म्हटले होते. संत कबीर आणि महात्मा फुले यांना देखील त्यांनी गुरू मानले, 
ते म्हणतात की बुद्धाचे तत्वज्ञानाचे खरे रहस्य हे कबीर यांनाच कळले होते. या शिवाय त्यांनी आपली तीन उपास्य दैवते सांगितली. विद्या हे पहिले दैवत . विद्येशिवाय माणसाला शांतता नाही आणि माणुसकीही नाही. माणूस जगायचा असेल तर अन्नाची गरज आहे  तशीच विद्येची शक्यता आहे. २० हजार पुस्तके माझ्याजवळ आहेत असे ते म्हणत. स्वतःच्या बायकोपेक्षाही जास्त प्रेम पुस्तकावर असेल तेंव्हाच माणूस विद्येचा पुजारी होतो. स्वाभिमान हे दुसरे दैवत त्यांनी सांगितले. माझे ध्यैय पोट तर भरले पाहिजे पण लोकांची सेवा केली पाहिजे हे ते सांगतात. मी स्वतः साठी कधीही कोणाकडे याचना केली नाही .माणसाने दीन राहू नये .मी परमेश्वराला देखील कमी मानतो इतका माझा स्वाभिमान आहे असे ते म्हणत. तिसरे दैवत त्यांनी शील मानले. मी दगाबाजी केली नाही, व्यसन केले नाही, या दैवतांचा आदर्श आपल्यात असला पाहिजे असे ते म्हणतात. यातून एक गोष्ट जाणवते की बाबासाहेब यांच्यावर बुद्धांचा प्रभाव मोठा होता. अलीकडे प्रदीप गायकवाड यांनी बुद्ध आणि धम्म या ग्रंथाची आवृत्ती प्रकाशित करताना बाबासाहेब हे बुद्ध धम्माकडे कसे वळले हे सांगताना अतिशय उपयुक्त माहिती दिली आहे. १४ जानेवारी १९५५ रोजी वरळी येथील भाषणात त्यांनी सांगितले ते अमेरिकेत गेले तिथे त्यांनी बौद्ध धम्माचा अभ्यास केला होता. त्यातून त्यांना हिंदू धर्म आणि बौद्ध धम्म यातील अंतर कळाले, विषमता, जातीभेद, दारिद्र्य याला कारणीभूत ब्राह्मणी धर्म आहे हा निष्कर्ष त्यांनी काढलाच होता. वैदिक ब्राह्मण धर्माने केलेल्या गुलामगिरी विरुद्ध बौद्ध विचारधारेने केलेला मुक्ती संघर्ष हाच भारताचा खरा इतुहास आहे असे त्यांचे मत झाले होते. अवैदिक भारतीय जनतेने बौद्ध धम्माची कास सोडली त्यामुळे विषमतेविरुद्धची बंडे फसली. असे त्यांचे आकलन होते. आजही हिंदुत्वाच्या भ्रमित वातावरणात  विषमता जोपासली जात आहे. बुद्ध धम्म हाच भारत व जगाला मार्गदर्शक आहे. 

             बाबासाहेबांच्या मूकनायक व बहिष्कृत भारत मध्ये त्यांनी बुद्धविषयक कार्य सांगितलेले दिसते. १९२७ ला महाडच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रह प्रसंगी त्यांनी बुद्ध लेणी पाहिली त्यावेळी बुद्धाचे अनुयायी ब्रह्मचारी राहून दारिद्र्य स्वीकारून निस्वार्थ बुद्धीने समाजसेवा करीत याची माहिती सर्वाना दिली होती. २५ सप्टेबर १९२८ ला गणेश उत्सवात भाषण देत असताना देखील ‘ जातीभेदावर कुऱ्हाड घालून अस्पृश्तेचे पाप मुळातच मारून टाकणारा खरा जर धर्मवीर आपल्या देशात अवतरला असेल तर तो एकटा गौतम बुद्धच होय असे सांगितले. 
१९२८ नंतर जे समता पाक्षिक चालू झाले त्यात बुद्धाच्या ऐतिहासिक व सामाजिक क्रांतीचे दाखले बाबासाहेब यांनी दिले . १३ ऑक्टोबर १९३५ चे येवला येथील धर्मांतर करणार असल्याची घोषणा जाहीर केली. ज्या धर्मात आपल्याला माणुसकी नाही त्या धर्मात आपण का रहावे ? हा प्रश्न त्यांनी अनेकदा उपस्थित केला होता. गुलाम म्हणून अपमान किती दिवस सहन करणार ? अस्पृश्यता  हा आमच्या नरदेहावरचा कलंक आहे. तो हिंदू धर्मात आहे. तुच्छता आणि मानहानी ची  वागणूक देणाऱ्या धर्मात कशासाठी रहायचे ? हिंदू धर्मात आपल्याला समान दर्जा कधीही मिळणार नाही . सत्याग्रह करूनही उपयोग झालेला नाही. त्यामुळे हिंदूची मनधरणी करणे ,सत्याग्रह करणे या गोष्टी यापुढे बंद करण्याचा ठराव त्यांनी येवल्याच्या सभेत मंजूर करून घेतला. स्पृश्य मानलेल्या वर्गापासून आपण आपला समाज स्वतंत्र केला पाहिजे .आणि आपण मनाचे व समतेचे स्थान मिळविले पाहिजे असे ते म्हणाले. मी हिंदू धर्मात जन्मलो असलो तरी हिंदू धर्मात मरणार नाही असा निर्धार बाबासाहेब यांनी केला. नागरिकत्व व राजकीय हक्कासाठी आपला झगडा चालूच ठेवूयात व आपले मतभेद विसरून एकजुटीने ध्येय गाठुयात असे ते सांगतात,. हिंदू धर्मापासून अलग झाले पाहिजे व माणुसकी , सामर्थ्य , समता , स्वातंत्र्य ,सुखाचा संसार, हे मिळवायचे असेल तर धर्मांतर करा असे आवाहन त्यांनी ३० मे १९३६ चे भाषणात केले . हिंदू धर्म हा दांभिक धर्म आहे हे त्यांनी पटवून दिले. हिंदू देवदेवतांची पूजा अर्चा करू नये, हिंदूंचे सण ,व्रत वैकल्ये , उपोषणे ,पळू नयेत , तीर्थाटने वाऱ्या करू नयेत .हिंदूंच्या कोणत्याच उत्सवात सहभागी होऊ नये असे त्यांनी ठराव करून घेतले . सतत जुलूम सहन करणे  हे त्यांना मान्य नव्हते. स्पृश्य लोक सांगतात धर्म सनातन आहे. म्हणजे त्यात बदल होणार नाही ,त्यामुळे आपण नेहमी खालचेच राहिले पाहिजे हा त्यांचा विचार असल्याने धर्मांतर करायला हवे . माणसाला मनुष्यबळ ,द्रव्यबळ .आणि मानसिक बल असले पाहिजे प्रथम त्याने ते मिळविले पाहिजे .तुम्ही अल्पसंख्याक आहात ,तुमच्याकडे  जातीभेदामुळे संघशक्ती नाही, द्रव्य कसलेच  नाही, व्यापार ,नोकरी आणि शेतीही नाही .वरच्या लोकांच्या घास कुटक्यावर तुमचे जीवन आहे. अन्याय झाला तर तुमच्याकडे कोर्टाचा खर्च करायला पैसा नाही . शेकडो वर्ष तुम्ही गुलामगिरीत घालवल्याने आत्मविश्वास , उत्साह , महत्वाकांक्षा यांचा बिमोड झाला .निराशा आणि नामर्दतेचे वातावरण आहे. तुमच्यात समर्थ नसल्याने तुमच्यावरजुलूम होतात . तुम्हला कोणी मदत करणारा नाही. असहाय असल्याने तुमच्यावर अत्याचार होतात. कोणत्या तरी अन्य समाजात धर्मात सामील झाल्याशिवाय तुम्हाल सामर्थ्य मिळू शकत नाही .हिंदू धर्मात तुमची आत्मोन्नती कदापि होणार नाही. हिंदू समाजातच समता नाही. या धर्मात असलेली  तीव्र स्वरुपाची अस्पृश्यता ,असमानता तुम्हाला कोठेही   आढळणार नाही. महारोगी माणसापेक्षा जास्त घृणा ते तुमची करतात. हिंदू  धर्मात असल्यानेच तुमची ही दशा झाली. मुखाने सर्वाभूती ईश्वर म्हणणारे लोक दांभिक आहेत. हिंदुस्थानमध्ये सर्वापेक्षा हीन समजलेले लोक आपण आहोत .आपले कलंकित जीवन नाहीसे करायचे असेल तर धर्मांतर हाच मार्ग आहे हे त्यांनी पटवून दिले. तुम्हाला मानसिक स्वातंत्र्य हवे आहे. तुम्हाला गुलामाचे जीवन या धर्माने दिले आहे. जातीभेदाची ही घाण भावना नाहीसी करण्यासाठी धर्मांतर आवश्यक आहे. मूर्ख माणसेच गुलामीला चिकटून राहतील .हिंदू धर्म माझ्या बुद्धीला पटू शकत नाही. स्वाभिमानाला रुचू शकत नाही. जिवंतपणी सौख्य देत नाही अशा धर्मात कशासाठी राहायचे ? हा सवाल त्यांनी केलाच विद्या शिकू नका, धनसंचय करू नका, शस्त्र धारण करू नका हे फक्त एका वर्गाला शिकवणारा हा धर्म पक्षपाती व विषमता मानणारा आहे . ... याच भाषणात बाबासाहेबांनी भगवान बुद्धांच्या  अत्त दीप भव -सुरवातीला स्वयंप्रकाशित व्हा या संदेशाची कथा सांगितली आहे. तुम्हीच तुमचे आधार व्हा. कोणाला शरण जाऊ नका असा शेवट देखील त्यांनी केला होता. केवळ अस्पृश्यांनी नव्हे तर ब्रह्मने तर इतर हिंदुनी देखील बौद्ध धम्म स्वीकार करावा असे त्यांनी १९४१ ला सांगितले. बुद्ध आणि तिचे राजकीय महत्व यावर लेख त्यांनी जनता पत्रात लिहिला. हिंदूंची रक्तशुद्धी रामाची जयंती करून होणार नाही, कृष्णाची जयंती करून होणार नाही ,किंवा गांधीजींची जयंती करून होणार नाही ,राम कृष्ण गांधी हे ब्राह्मणी धर्माचे उपासक आहेत लोकशाहीच्या प्राणप्रतिष्ठेला त्यांचा काही उपयोग नाही उपयोग झालाच तर बुद्धाचा होईल असे सांगितले. बुद्धाने केलेली क्रांती हीच सर्वंकष क्रांती असे त्यांचे मत होते. १९५४ ला माझे जीवन विषयक तत्वज्ञान स्वातंत्र्य , समता ,आणि बंधुभाव यात असून ते मी फ्रेंच राज्य्क्रांतीतून घेतलेले नसून माझे गुरु भगवान बुद्ध यांच्या शिकवणीतून घेतल्याचे ते सांगतात. बुद्धाने जाती व्यवस्थेचा धिक्कार केला असे त्यांनी सांगितले. १९५४ च्या रंगून परिषदेत त्यांनी भारताच्या घटनेत पाली भाषेतील उपस्थितीची योजना केल्याचे सांगतात. राष्ट्रपतीच्या निवासात धम्म चक्र प्रवर्तन हा शब्द घेतला. भारत सरकारचे प्रतिक म्हणून त्यांनी अशोक चक्र  मान्य करून घेतले. १० जून १९५६ ला त्यांनी आपण बुद्धाचे शिष्य असून आपण स्वतंत्र वृत्तीचे निर्भय नागरिक व्हा असा संदेश दिला. आणि २३  सप्टेंबरला त्यांनी आपण बौद्ध धम्म स्वीकारणार हे जाहीर केले .आणि विजयादशमीच्या दिवशी १४ ऑक्टोबर रोजी त्यांनी धम्म चक्र प्रवर्तन केले. 
बाबासाहेब म्हणतात ‘ हा धम्म बहुजन हिताय ,बहुजन सुखाय आहे.लोकांविषयी अनुकंपा असणारा आहे . बुद्ध धम्म  हा बहुजन लोकांच्या हिताकरिता , सुखाकरिता ,त्यांच्यावर प्रेम करण्याकरिता आहे. ज्या प्रमाणे उस हा सर्वत्र गोड असतो. तसाच बुद्ध धम्म  सुरवातीला कल्याणकारी , मध्येही कल्याणकारी ,आणि शेवटीही कल्याणकारी आहे.  मरते समयी बाबासाहेबांनी भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ लिहून खऱ्या अर्थाने तळागाळात बुद्ध विचार पोचवला .आज जगातील अनेकांना  सदाचारी जीवन जगायला प्रेरित करणारा धर्म कोणता असेल तर तो बुद्ध धम्म  आहे. भगवान बुद्धांच्या नंतर सनातनी धर्मावर प्रहार करणारे बाबासाहेब होते. ‘बाबासाहेब करे पुकार ,बुद्ध धम्म  का करो स्वीकार या घोषणा अजूनही या  आसमंतात आहेत .. पण सनातनी भारताला हिंदू राष्ट्र करण्याच्या नादात लोकांच्या डोक्यात देव आणि धर्माचे खोटे भ्रम पेरत आहेत. जगातील अतिशय विद्वान व बुद्धीप्रामाण्यवादी व्यक्तीने बुद्ध धम्माला पुन्हा भारताच्या भूमीतील तळागाळात पोहचवले .या वेळी स्वतः धम्मदीक्षा घेऊन बाबासाहेब यांनी नागपुरात उपस्थित असंख्य समाज बांधवाना दीक्षा दिली. २२ प्रतिज्ञा दिल्या .जवळपास ६८ वर्षे धम्मचक्रप्रवर्तनास होत आहेत. खरोखरच नवा जन्म झाला आणि  काल अस्पृश्य असणारी सारी निळी पाखरे आज जगाच्या विविध देशातील आसमंतात मुक्तपणे भरारी घेत आहेत. बाबासाहेबांच्या कार्याची जाणीव ठेवून अजूनही जे अज्ञानाच्या खाईत आहेत .शुद्ध बुद्ध धर्मापासून वंचित आहेत त्यांच्या हितासाठी सर्वांनी धम्मप्रसार करण्याची गरज आहे. शत्रू माणसाना पुन्हा धर्माचे लाभ दाखवून ,खोटे बोलून काळोखाच्या गुहेत माणसांना टाकून गुलाम बनवत आहे. एवढेच काय माणसाला हैवान बनवत आहे , त्यासाठी माणसाच्या मनात बुद्ध जाण्याची तीव्र गरज आहे. बाबासाहेबांच्या सोबत जाऊन  आपण राहिलेल्या सर्वाना सजग करूयात. नागभूमी बुद्धतत्वाने जगभरात गेली. बाबासाहेबांनी हिंदू धर्मातून बाहेर पद्ल्याशिवायी बोलताना सांगताना म्हटले होते की मी नरकातून सुटलो. आर्थिक उन्नतीची चळवळ त्यांना आवश्यक वाटत होती. मन सुसंस्कृत होण्यासाठी त्यांना बुद्ध धम्म योग्य वाटला . सर्व सुधारणा फक्त बौद्ध ध्म्मानेच होतील यावर त्यांचा विश्वास होता. नवीन वाट ,अभ्युदयाचा मार्ग ,आशेचा धर्म बुद्धीला पटणारा हा धर्म आहे. मला राजकारणापेक्षा देखील बुद्धाचा धम्म मला प्यारा आहे असे ते सांगतात.  गरिबी दूर करण्याचा सर्वोत्तम मार्ग बुद्धाचा मार्ग त्यांना वाटतो. आज भिक्खू व्हायला कोणीही सहजासहजी तयार नाही.त्यामुळे बुद्धजीवी यांनीच बुद्ध धम्म आत्मसात करून अनेकांना सम्यक मार्ग दाखवावा असे माझे मत आहे.

*प्रा.डॉ.सुभाष वाघमारे
मराठी विभाग प्रमुख व प्र.भाषा संचालक ,भाषा मंडळ,कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ,सातारा -  ९८९०७२६४४०
close