आपल्या सर्वांचा आवडता सण म्हणजे दिवाळी. वसुबारस ते भाऊबीज पर्यंत दिवाळी सण साजरा करत असताना सर्वांचाच आनंद द्विगुणित झालेला असतो. लहान मुले तर खूपच खुश असतात. कारण; नव नवीन कपड्यां बरोबरच त्यांना फटाके उडवायला मिळालेले असतात.
दिवाळीला आपण जे फटाके उडवतो त्याची परंपरा खूप शतकांपासून आहे. खूप आधीपासून लढाईमध्ये गनपावडर व तोफांचा वापर करत होते. या गनपावडर पासूनच फटाके तयार होत. पुर्वीच्या काळी विवाह सोहळा व उत्सवांमध्ये फटाक्यांची आतषबाजी केली जायची. आणि तेव्हापासूनच कदाचित भारतीयांमध्ये दिवाळी सणाला फटाके उडवायची परंपरा चालू झाली असावी. फक्त दिवाळीलाच नव्हे तर, इतर उत्सवांमध्ये फटाके उडवायला सुरुवात झाली. अलीकडे तर उद्घाटनप्रसंगी, निवडणूक जिंकल्यानंतर, नविन वस्तू खरेदी प्रसंगी, स्वागत समारंभ प्रसंगी अशा एक ना अनेक प्रसंगी फटाके उडविले जातात. फटाके उडवून एक प्रकारचा आनंद साजरा केला जातो. फटाके उडविणे म्हणजे प्रतिष्ठेचे समजले जाते.
तामिळनाडू मधील " शिवकाशी" हे फटाके निर्मितीचे कोठार समजले जाते. फटाक्यांमध्ये रंगीबेरंगी धूर तयार करणारे फटाके, शंकु आकाराचे फटाके ( झाडं), भुईचक्कर, तोटा, सुतळी बॉम्ब, शुटर्स - रॉकेट्स - हवेत वर जाऊन उडणारे फटाके, अलिकडेच नवीन निघालेले पॉप - पॉप फटाके असे अनेक प्रकार आहेत. या विविध प्रकारच्या फटाक्यांमध्ये बेरियम, आर्सेनिक, सल्फर, क्लोरिन, ॲल्युमिनियम, सल्फर पोटॅशियम, सिलिकॉन, लोह, टायटॅनियम यासारखे रासायनिक घटक वापरले जातात, की जे जीवितास धोकादायक आहेत. याचा थेट परिणाम मानवी आरोग्यावर होतो. फटाक्यांच्या धुरामुळे श्वसनाचे आजार वाढतात. सततच्या मोठ्या आवाजामुळे कदाचित बहिरेपणा येऊ शकतो, झोपेचा त्रास होतो, त्यामुळे चिडचिड वाढते. नाक व घसा यात जळजळ होते. लहान मुले, गरोदर स्त्रिया, आजारी लोक, वृध्द यांना जास्त त्रास होतो. बर्याच वेळा सामाजिक एकात्मता ढासळते. मानवाबरोबरच प्राणी - पक्षी यांनाही त्रास होतो. बर्याच वेळा मोठ्या आवाजाने प्राणी - पक्षी घाबरतात, गडबडून जातात. मानवाचेही तसेच आहे. फटाके वाजवताना एकमेकांच्या भावनांचा व शारिरीक स्थितीचा विचार करणे आवश्यक आहे.
फटाक्यांमुळे वायू प्रदूषण, ध्वनी प्रदुषण वाढते आणि त्यामुळे प्राणी - पक्षी व मानवी स्वास्थ्य बिघडते.
फटाके उडवायला विरोध नाही. परंतु; काळजीपूर्वक व पर्यावरणपूरक फटाके उडविले तर; ते सर्वांच्याच भल्याचे असणार आहे. त्यासाठी कमी आवाजाचे व कमी धूर करणारे फटाके उडविले तर आणखी मजा येईल. सर्वांचेच स्वास्थ्य सुरक्षित राहिल.
फटाके उडविताना आवश्यक ती काळजी घेऊनच फटाके उडविले पाहिजेत. उदा. फटाके उडविताना लहान मुलांना एकटे सोडू नये. मोकळ्या जागेतच फटाके उडवावेत. एकावेळी एकच फटाका लावावा. हातात घेऊन फेकू नये. अशा प्रकारची काळजी घेणे आवश्यक आहे.
आपण असेही करू शकतो की; फटाक्यां ऐवजी लहान मुलांना बुद्धीला चालना देणारे खेळ देऊ शकतो. थोर महात्मे, धाडसी कथा, संस्कारक्षम गोष्टींची पुस्तके देऊ शकतो. तसेच मुलांना सर्जनशील उपक्रमात सहभागी होण्यास प्रवृत्त करू शकतो. जसे की; हस्तकला, बागकाम, नृत्य, संगीत. तसेच मुलांसमवेत निसर्गरम्य परिसराला भेट द्या. त्यामुळे मुलांनाही पर्यावरणातील गोष्टी समजण्यास मदत होईल. घराभोवती, पर्यावरणात कचरा होणार नाही याची काळजी घ्यावी. त्यासाठी कागदी कचरा, फटाक्यांचे रॅपर्स इतरत्र न फेकता कचराकुंडीतच जमा करण्यास सागणे.
लहान - सहान गोष्टीतूनच अंगचे वळण लागते आणि चांगल्या सवयीही जोपासल्या जातात. अशारीतीने ज्ञानमय, निरोगी आणि आनंदमय दिवाळी साजरी करणे आपल्याच हाती आहे.
लेखन
सौ. मिनल अमोल उनउने
सातारा - ९१३०४७०३९७
*संकलन
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - ९५६११७४१११