shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

विश्वासराव रणसिंग महाविद्यालयात अभिजात मराठीचा जल्लोष व वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा...

विश्वासराव रणसिंग महाविद्यालयात अभिजात मराठीचा जल्लोष व वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा...
इंदापूर: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे व इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे, विश्वासराव रणसिंग महाविद्यालय कळंब वालचंदनगर अंतर्गत मराठी विभाग आयोजित मराठी भाषा जल्लोष व डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन हा कार्यक्रम महाविद्यालयामध्ये संपन्न झाला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.राम कांबळे यांनी केले. त्यामध्ये त्यांनी भारतीय ज्ञान व्यवस्था,ज्ञान परंपरा त्याचबरोबर पाश्चात्य ज्ञान परंपरा याविषयी मार्गदर्शन केले.३ ऑक्टोबर २०२४ रोजी केंद्र शासनाने मराठी भाषेला अभिजात भाषा म्हणून दर्जा दिला याचा प्रामुख्याने उल्लेख केला. वाचनाचे महत्व पटवून सांगितले. त्यामध्ये संत ज्ञानेश्वर, महानुभाव पंथ, संत तुकाराम, छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा ज्योतिराव फुले, महात्मा गांधी, राजश्री शाहू महाराज डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे यांचा प्रामुख्याने उल्लेख केला. वाचनाचे महत्त्व पटवून सांगताना त्यांनी इतिहास अभ्यासक एक दाखला नेहमी देतात की "रोम" जळत होता आणि नेरोफिडेल वाद्य वाजवीत बसला होता. उद्या इतिहास अभ्यासकांनी असे लिहून ठेवू नये की, भारतीय विद्यार्थी पुस्तकांपासून फारकत घेऊन अज्ञानाच्या दरीत चाचपडत होता आणि इथला शिक्षक कोडग्या मनाने संवेदनाशून्य होऊन त्याकडे बघत होता.असा दाखला त्यांनी दिला.
प्रा. डॉ. विजय केसकर, उपप्राचार्य ज्ञानेश्वर  गुळीग,प्रा.विद्या गुळीग सांस्कृतिक विभाग प्रतिनिधी कु.श्रुती राजेंद्र साबळे, कृष्णा प्रकाश चोपडे यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करण्यात आले व डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. रामचंद्र पाखरे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.राजेंद्रकुमार डांगे,डॉ. प्रशांत शिंदे,डॉ.बबन साळवे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. दरम्यान महाविद्यालयातल्या डिजिटल बोर्ड वरती मराठी स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. यामध्ये प्राध्यापक व विद्यार्थी यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला.
उपप्राचार्य ज्ञानेश्वर गुळीग यांनी अभिजात मराठीचा जल्लोष म्हणून ज्ञानेश्वरी प्रारंभ त्यानंतर संत तुकारामांचे अभंग "वृक्षवल्ली आम्हा सोयरे",संत एकनाथांची गवळण "हरीच्या मुरलीवर जीव जडे" महात्मा फुले यांचा अखंड "सत्य सर्वांचे आधी घर सर्व धर्मांचे माहेर" सादर केला.तसेच गदिमांचे काव्य सादर केले. प्रा. विद्या गुळीग यांनी "लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी "हे गीत सादर केले. त्याचबरोबर "रेशमाच्या रेघानी लाल काळया धाग्यांनी" ही लावणी गायन या ठिकाणी सादर केली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्र.प्राचार्य डॉ. विजय केसकर (मराठी विभागप्रमुख) यांनी आपल्या भाषणाची सुरवात "भगवत गीता" मधील " यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत I अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानम सृज्याहम" या कवणाने केली. त्याचबरोबर डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देऊन. वाचनाचे महत्त्व पटवून सांगितले. वाचाल तर वाचाल असा उल्लेख त्यांनी केला. मराठी साहित्यातील निसर्ग कवी म्हणून ओळखले गेलेले बालकवी यांची औदुंबर ही कविता त्यांनी सादर केली. मराठी भाषा वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न आपण सर्वजण करूया हा संकल्प करण्यात आला. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने करण्यात आली. या कार्यक्रमासाठी ४२ विद्यार्थी व १२ प्राध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन प्रा.कपिल कांबळे यांनी केले.
close