shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

आली दीपावली...प्रेम, सुख सावली

आली दीपावली...प्रेम, सुख सावली

दिवाळी सण म्हणजे सर्वांचा आवडता व आनंदाचा सण. दिव्यांचा लखलखाट, फटाक्यांची आतषबाजी, भरगच्च रांगोळ्या, तिखट - गोड फराळ आणि नव-नविन कपडे. वा sss दिवाळीची रंगतच न्यारी. सर्व कुटुंबीय एकत्र येण्याचा सर्वात महत्त्वाचा सण म्हणजे दिवाळी.
          दिवाळी सणाची तयारी २५-२० दिवस अगोदरच सुरू होते. नवीन वस्तू खरेदीबाबतच्या ऑफर्स, सेल अशा अनेक जाहिराती वर्तमान पत्रात वाचायला मिळतात. तसेच हेही वाचतो किंवा मोबाईल वर पाहतो की, ज्यांना खरी गरज आहे - अन्न, वस्त्र, निवारा व मदतीची, अशा लोकांकडूनच पणत्या, आकाशकंदील, रांगोळी खरेदी करावी. पण, प्रत्यक्षात असे किती होते? किंवा कोणी घेते का? खूप कमी ठिकाणी असे दृश्य पाहावयास मिळते. काहीवेळा असेही पाहावयास मिळते की, गावाकडील काही लोक हे शहरामध्ये जाऊन दिवाळीची खरेदी करतात. आणि आवर्जून सांगतात की, ५० रु. जास्त गेले पण, काय भारी आहे. असलं इथं गावात नाही मिळत म्हणून यावेळी शहरातून आणलंय खास दिवाळीला.
           तसेच, गावाकडील काही मंडळी पणत्या, आकाशकंदील, रांगोळी विकण्यास शहरामध्ये जातात. परंतु; पाहिजे तितका नफा त्यांना मिळत नाही. कारण; शहरातील काही दुकानदार महागड्या शोभेच्या वस्तुंनी गिर्हाईक आकर्षित करतात. फॅन्सी व लेटेस्ट या नावाखाली बरयाचदा गिर्हाईकास भूरळ पाडली जाते. आणि बरेचजण पैशाचा विचार न करता खरेदी करत असतात. उंची - महागडी कपडे खरेदी करतात. प्रदूषण पसरविणारे फटाके मोठ्या प्रमाणात वाजवतात. लहान बालके. वृध्द, आजारी यांचा विचार केला जात नाही. त्यामुळे प्रदुषण वाढ होऊन अनेकजण आजारीही पडतात.
            फराळाच्या बाबतीतही तसेच. काही घरांमध्ये तर असे पाहावयास मिळते की, भरमसाठ फराळाचे पदार्थ बनविले जातात, अगदी तेलकट - तुपट कसलाही विचार न करता. का तर म्हणे, मामाला, आत्याला डबा द्यायचाय. मित्राला द्यायचंय, मैत्रिणीला द्यायचंय. आणि घरी आलेले इतरांचे डबे काहीवेळा तसेच राहतात. फक्त आवडीचाच पदार्थ खाल्ला जातो. ८-८, १०-१० दिवस काही डबे उघडले जात नाहीत. शेवटी तो फराळ वाया जातो. काहीवेळा असेही आढळते की, त्यांचे पदार्थ चांगल्या तेलातले नसतात, त्याला काही टेस्टच नसते. नको खायला. फक्त आपलेच खा. भरमसाठ पदार्थ करण्याच्या प्रकाराने काहींना विशेषतः लहान बालके व महिलांमध्ये - पित्त, डोके दुखणे, पोट दुखणं यांसारख्या समस्या आढळतात.
        आपणाला जर खरंच समाधानाने व आनंदाने दिवाळी सण साजरा करावयाचा असेल तर साधे दिवे खरेदी करा, साध्या साजेलशा पणत्या, आकाशकंदील गरजू लोकांकडूनच खरेदी करा. काही गरजू, अपंग लोक यांसारख्या वस्तू विक्रीस ठेवतात, तेंव्हा त्यांच्याकडून जरूर घ्या. त्यामुळे त्यांनाही फायदा होईल, शिवाय त्यांना त्यांच्या मुलभूत गरजा भागविता येतील. आणि त्यातून मिळणारा आनंद हा लाखमोलाचा असणार आहे. आपणाला त्यांच्या गरजा प्रत्यक्षपणे भागविता येत नसतील तर निदान आपण हे तरी करू शकतो.
         कपडे खरेदी करतानाही पैशांचा योग्य विचार करूनच खरेदी करावेत. त्याच्याकडे खूप भारी आहेत म्हणून मलापण तसेच हवे आहे. अशी बरोबरी न करता विचार करूनच कोणतीही खरेदी करावी. दिवाळीला चांगले नवीन कपडे घेतले म्हणून पहिले कपडे ठेवणीत ठेवू नका. येत नसतील पण, जर घालण्याजोगे असतील तर एखाद्या गरजूस ते कपडे भेट द्यावेत. सोबत थोडा फराळही द्यावा.
                  फटाक्यांच्या बाबतीत बोलायचे झाले तर, खूप मोठ्या आवाजाचे, खूप धूर करणारे फटाके वाजवू नका. काळजीपूर्वक हाताळता येतील असेच मोजके फटाके वाजवा. फटाके वेळी लहान मुलांना एकटे सोडू नका.आणि हो...दिवाळी बरोबर ज्ञान दीपावली साजरी करूयात .मुलांना छोटी छोटी ..पण चांगली संस्कार करणारी जगातली पुस्तके भेट देऊयात..फटाके पेक्षा आपण ग्रंथ संस्कृती घरात निर्माण करूया..फटाक्यांचा प्रकाश तात्पुरता असेल..आणि त्यातून कदाचित फक्त धूर मिळेल पण आरोग्य चांगले ठेवण्यासाठी मुलांना सुट्टीत चांगले खेळ खेळायला देणे हेच आवश्यक वाटते.. दर वर्षी दिवाळीत नवीन कपडे घेतो. तशी ज्ञान देणारी पुस्तके खरेदी केली तर मुलांचे व्यक्तिमत्व आणि प्रभावी होईल.. हलकी फुलकी गोष्टीची पुस्तके ,सुट्टीत निसर्ग सान्निध्य,आपल्या माणसांचे प्रेम मुलांना मिळायला हवे..सर्जनशील होण्याचा आनंद वेगळाच असेल. नोकरी,संसाराच्या व्यापातून मिळणारे दिवाळीचे काही दिवस मन मुक्त होण्याचा आणि सर्वांना आनंद देण्याचे  असायला हवेत. 

                दिवाळी सणाच्या निमित्ताने माहेरवाशीण, सासुरवाशीण, पै- पाहूणे एकत्र जमलेले असतात, तेंव्हा कोणतीही तेढ मनात न आणता, रुसवे - फुगवे सोडून, आनंदाने सर्वांनी मिळून सण साजरा करा. त्यामुळे आपला आनंद द्विगुणित तर होईलच पण; खर्या अर्थाने दिवाळी साजरी केल्याचा आनंद मिळेल. आणि म्हणूनच तर म्हणतात ना - 
" सण दसरा,दीपावली मोठा
नाही आनंदा तोटा .".

*लेखन
सौ.मीनल अमोल उनउने
सातारा - ९१३०४७०३९७
*संकलन*
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - ९५६११७४१११
close