यशस्वी शस्त्रक्रियेद्वारे प्लिहाची गाठ काढून कर्करोगग्रस्ताला मिळाले जीवदान..
Image for Google |
जळगाव (प्रतिनिधी) : जामनेर तालुक्यातील पहूर येथील ३५ वर्षीय तरुणावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अभूतपूर्व अशी शस्त्रक्रिया पार पडली. गेल्या दीड वर्षांपासून गाठीमुळे वाढलेली प्लिहा काढून टाकत कर्करोग्रस्ताला जीवदान देण्यात यश मिळाले आहे. अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी शल्यचिकित्सा विभागाचे अभिनंदन केले आहे.
जामनेर तालुक्यातील पहुर येथील संजय सुरेश पांढरे (वय ३५) यांना गेल्या दीड वर्षापासून पोटात प्लिहाचा आकार वाढत चालला असल्यामुळे त्रास होत होता. तपासणी केल्यानंतर समजले की, त्यांना रक्ताचा कर्करोग आहे. त्यामुळे त्याचा आकार आणखी वाढत जात होता. त्यांनी केमोथेरपी घेतली. पण आराम पडला नाही. त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय गाठले. या ठिकाणी शल्यचिकित्सा विभागाचे सहयोगी प्राध्यापक तथा युनिट ३ चे प्रमुख डॉ. रोहन पाटील यांनी विविध तपासण्या केल्या. त्यानंतर संजय पांढरे यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला.
शस्त्रक्रिया दरम्यान तब्बल ४ किलोची प्लिहाची गाठ काढून संजय पांढरे यांना मोठा दिलासा दिला. त्यामुळे त्यांना जीवदान मिळाले. प्लिहावर शस्त्रक्रिया शक्य नसताना देखील आपले वैद्यकीय कौशल्य वापरून डॉक्टरांनी रुग्णाला वाचविण्यात यश मिळवले आहे. त्यामुळे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकुर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड यांनी वैद्यकीय पथकाचे कौतुक केले आहे.
सदर शस्त्रक्रिया ही सहयोगी प्रा.डॉ. रोहन पाटील, सहाय्यक प्रा. डॉ.ईश्वरी भोंम्बे, वरिष्ठ निवासी डॉ. हर्षा चौधरी, कनिष्ठ निवासी डॉ. जिया उल हक, डॉ.झैद पठाण, डॉ. अमेय नेहेते, डॉ. पूजा जयस्वाल यांच्या पथकाने केली. त्यांना शल्यचिकित्सा विभागाचे प्रमुख तथा उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे यांचे मार्गदर्शन लाभले.
बधिरीकरण शास्त्र विभागाचे सहाय्यक प्रा. डॉ. अमित हिवरकर, डॉ. हेमंत, डॉ. तासिन व शस्त्रक्रिया गृहाच्या प्रमुख इन्चार्ज परिचारिका तुळसा माळी यांनी सहकार्य केले.
"खाजगी दवाखान्यात भरपूर पैसे लागणार होते. तरीदेखील खाजगी डॉक्टरांनी जीवाची कुठलीच हमी दिली नव्हती. त्यामुळे शस्त्रक्रिया गेल्या दीड वर्षांपासून टाळत होतो. आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये मोफत आणि उत्तम शस्त्रक्रिया झाल्याने दिलासा मिळाला."
- संजय पांढरे, रुग्ण.