नगर / प्रतिनिधी
पुणे येथील बालेवाडी स्टेडियमवर २८ आणि २९ सप्टेंबर रोजी पार पडलेल्या ४५ व्या राज्य कराटे स्पर्धेत नगरच्या महेक मतीन खान पठाण आणि अहमद ताहीर शेख यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
महेक पठाणने १७ वर्षे वयोगटातील -४५ किलो वजन गटात कास्य पदक पटकावले आहे. विशेष म्हणजे कराटेच्या 'काता' या प्रकारात नगर जिल्ह्यासाठी पदक जिंकणारी ती पहिलीच महिला खेळाडू ठरली आहे.
अहमद ताहीर शेख याने देखील १७ वर्षे वयोगटातील ५५ किलो वजन गटात कास्य पदक मिळवले आहे. हे दोन्ही खेळाडू नगरच्या युथ कराटे फेडरेशनमध्ये प्रशिक्षण घेत आहेत. त्यांच्या या यशात सर्व परिचित आणि नावाजलेले प्रशिक्षक सबील सय्यद आणि साहील सय्यद यांचा मोलाचा वाटा आहे.
ही स्पर्धा महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या मान्यतेची आहे, आणि विजेत्या खेळाडूंच्या या यशाचे अहमदनगर ग्रामीण आणि शहर कराटे संघटनेच्या वतीने कौतुक करण्यात आले आहे. जिल्हा कराटे संघटनेचे अध्यक्ष जयसिंग काळे आणि अमोल काजळे यांनीही या खेळाडूंवर कौतुकाची थाप मारली आहे.