काँग्रेस कार्यकर्त्यांची निरीक्षक मुजफ्फर हुसेन यांच्याकडे मागणी
प्रतिनिधी : संजय वायकर
नगर शहरामध्ये काँग्रेसची ताकद मोठी आहे. शहरातील सत्ताधाऱ्यांना निर्भीडपणे विरोध करण्याची आणि विकासाचे व्हिजन घेऊन जनसामान्यांना न्याय मिळवून देण्याची ताकद ही शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्यामध्ये आहे. तीन पक्षांची महाविकास आघाडी आहे. दक्षिणेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचा तर उत्तरेत शिवसेना उबाठा गटाचा खासदार केला. आता मात्र शहराच्या आमदारकीच्या बाबतीत तडजोड नको. कोणत्या ही परिस्थितीत शहराची जागा काँग्रेसकडेच घ्या आणि किरण काळेंना उमेदवारी द्या, अशी जोरदार मागणी शहरातील काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पक्षाचे विधानसभा निवडणूक निरीक्षक तथा प्रदेश कार्याध्यक्ष मुजफ्फर हुसेन यांच्याकडे केली आहे.
प्रदेश काँग्रेसच्या वतीने पाठविण्यात आलेले काँग्रेसचे निरीक्षक नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील विधानसभेच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी नगर शहरात आले होते. यावेळी शासकीय विश्रामगृहावर त्यांनी नगर शहरासह दक्षिणेतील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. यावेळी कर्जत - जामखेड मधून ॲड. शेवाळे, श्रीगोंद्यातून घन:श्याम शेलार, पाथर्डी - शेवगाव मधून नासिर शेख, समीर काझी, नगर मधून मंगल भुजबळ, मोसिम शेख यांनी मुलाखती दिल्या.
यावेळी शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष जयंत वाघ, ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, ओबीसी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष संजय झिंजे, माथाडी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष विलास उबाळे, मागासवर्गीय काँग्रेसचे प्रदेश सचिव सुनील क्षेत्रे, अल्पसंख्यांक काँग्रेस प्रदेश पदाधिकारी निजाम जहागीरदार, माजी नगरसेवक फैयाज केबलवाला, युवक काँग्रेस सरचिटणीस शमस् खान, महिला काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष उषाताई भगत, महिला उपाध्यक्ष डॉ. जाहिदा शेख, उपाध्यक्ष शैला लांडे, दिव्यांग महिला काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष मोमीन सय्यद, दिव्यांग पुरुष काँग्रेस विभाग शहर जिल्हाध्यक्ष सोफियान रंगरेज, सोशल मीडिया शहर जिल्हाध्यक्ष आर. आर. पाटील, शहर जिल्हा सरचिटणीस अभिनय गायकवाड, शहर जिल्हा सचिव किशोर कोतकर, अल्पसंख्यांक काँग्रेसचे अजय मिसाळ आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
काँग्रेसने जिल्ह्यात सात मतदारसंघवर जोरदार दावा केला आहे. यावेळी शहरातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. सत्तेचे समान वाटप झाले पाहिजे. लोकसभा, विधानसभा, महानगरपालिका यामध्ये महाविकास आघाडीतील तिन्ही घटक पक्षांमध्ये संधीचा समतोल साधला गेला पाहिजे. दक्षिण लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे खासदार निवडून आणण्यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसचा सिंहाचा वाटा असल्याचा दावा दक्षिणेतील कार्यकर्त्यांनी निरीक्षकांसमोर केला.
दक्षिणेतील सहाच्या सहा जागा राष्ट्रवादी शरद पवार गट लढते. मात्र यावेळी त्यांनी नगर शहराची जागा ही कोणत्याही परिस्थितीत काँग्रेसला सोडावी. त्यासाठी प्रदेश काँग्रेस स्क्रीनिंग कमिटी, तसेच अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे प्रभारी आणि हायकमांडने राष्ट्रवादी कडून ती जागा खेचून घ्यावी आणि किरण काळे यांना उमेदवारी द्यावी. ते विक्रमी मतांनी विजयी होतील असा आग्रह यावेळी कार्यकर्त्यांनी निरीक्षक हुसेन यांच्याकडे धरला.