shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

डकेटच्या हमल्यानंतर पाकला गोलंदाजांने सामन्यात आणले ; बंगलोरला पहिला दिवस पर्जन्य राजाचा



             भारत आणि न्युझिलंड यांच्यात डब्ल्यूटीसी चॅम्पियनशिप अंतर्गत तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेला बुधवारी बेंगलुरूच्या एम.एचिदंबरम स्टेडियमवर सुरुवात होणार होती मात्र संपूर्ण दिवस क्रिकेट ऐवजी मैदानावर पावसाचा खेळ पहायला मिळाला त्यामुळे गुणतालिकेत अव्वल स्थानावर असलेल्या टिम इंडियाच्या पुढील वाटचालीस थोडी फार खिळ बसण्याची शक्यता आहे. तरीही उर्वरीत चार दिवस निसर्गाची कोणतीही अवकृपा झाली नाही तर भारत सामना जिंकण्याची क्षमता बाळगून आहे याविषयी कुठलीही शंका नाही. कारण पंधरा दिवसांपूर्वीच कानपूर कसोटीत भारताने पहिले तीन दिवस पावसाने धुवून काढल्यानंतर दिड दिवसात कसोटी जिंकली होती. त्यामुळे पावसाचे सावट असले तरी बदललेल्या आक्रमक खेळ रणनितीमुळे भारताचे बाजी मारण्याचे चिन्ह मोठे आहेत.

               आता हा सामना चार दिवसांचाच होणार असल्याने पहिल्या दिवशी वाया गेलेला खेळ इतर चार दिवसात भरून काढण्याचे नव्याने नियोजनही आयसीसीकडून करण्यात आले असून फॉलोऑनचा नियमही २०० ऐवजी १७५ धावांचा असेल.

              तर दुसरीकडे पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना मुलतान येथे खेळला जात आहे. या सामन्यात इंग्लंडचा संघ पहिल्या डावात १२७ धावांनी पिछाडीवर आहे. पदार्पणवीर कामरान गुलामच्या शतकाच्या जोरावर पाकिस्तानने पहिल्या डावात ३६६ धावा केल्या.  प्रत्युत्तरात इंग्लिश संघाने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत पहिल्या डावात ६ बाद २३९ धावा केल्या आहेत. बेन डकेटने १२९ चेंडूत शानदार शतक झळकविले आहे. त्याने १४ चौकारांच्या मदतीने ११४ धावांची खेळी खेळली. दुसऱ्या दिवस अखेर जेमी स्मिथ १२ आणि ब्रेडन कार्स २ धावा काढून नाबाद परतले. पाकिस्तानकडून फिरकीपटू साजिद खानने चार तर नुमान अलीने दोन विकेट्स घेतल्या.   
                 डकेटने कारकिर्दीतील चौथे शतक झळकविले. त्याच्याशिवाय गेल्या कसोटीत द्विशतक झळकविणाऱ्या रूटने पहिल्या डावात केवळ ३४ धावा केल्या. पहिल्या सामन्यातील त्रिशतकवीर ब्रूकही नऊ धावांची इनिंग खेळून पॅव्हेलियनमध्ये परतला.  कर्णधार स्टोक्स एक धाव काढून बाद झाला.  मंगळवारी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या पाकिस्तानने दुसऱ्या दिवसाची सुरुवात ५ बाद २५९ धावांवरून पुढे केली.  कामरान गुलामने २२४ चेंडूत ११८ धावांची खेळी केली.  त्याच्याशिवाय सलामीला आलेल्या सॅम अयुबने ७७ धावा केल्या.  रिझवान ४१, सलमान ३१ , आमेर जमाल३७  आणि नोमानने 32 धावा केल्या.  इंग्लंडकडून जॅक लीचने चार, ब्रेडन कार्सने तीन, मॅथ्यू पॉट्सने दोन आणि शोएब बशीरने एक विकेट घेतली.
                डकेट या डावखुऱ्या फलंदाजाने आणखी एक कामगिरी केली आहे. १ डिसेंबर २०२२ पासून, कोणत्याही सलामीवीराने कसोटी क्रिकेटमध्ये १७०० धावांचा टप्पा ओलांडल्या नाहीत, परंतु बेन डकेटने १८०० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. त्याने ४३ डावात ४५ च्या सरासरीने १८३२ धावा केल्या आहेत.  दुसऱ्या स्थानावर उस्मान ख्वाजा आहे, त्याने ३९ सामन्यात १६०५ धावा केल्या आहेत. बेन डकेटचा सहकारी फलंदाज जॅक क्रॉलीने ३७ डावात १४५० धावा केल्या आहेत.  त्याचबरोबर भारताचा सलामीवीर यशस्वी जयस्वालने २० डावात १२१७ धावा करण्यात यश मिळविले आहे. सर्वाधिक शतकेही बेन डकेटच्या नावावर आहेत.  त्याने चार शतकेही झळकविली आहेत.
                 इंग्लंडच्या कसोटी संघाला मागील दोन वर्षांपर्यंत काही चांगल्या सलामीवीरांची गरज होती.  अनेक खेळाडूंनिशी प्रयोग  केले गेले, परंतु बेन डकेटसारखे कोणीही यशस्वी झाले नाही. बेन डकेटने अल्पावधीतच संघातील आपले स्थान पक्के केले नाही तर इंग्लंडसाठी तो एक विश्वासार्ह तुफानी फलंदाज बनला आहे.  कसोटी क्रिकेटमध्ये बेन डकेट वेगळा दिसत असून त्याने विश्वविक्रम केला आहे.  कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात कमी चेंडूत दोन हजार धावा करणारा तो फलंदाज ठरला आहे. जेव्हापासून बॉल डेटा उपलब्ध झाला आहे, तेव्हापासून कोणीही इतक्या वेगाने कसोटीत दोन हजार धावा करू शकलेले नाही.
               बेन डकेटने या बाबतीत न्युझिलंडचा टिम साऊथी आणि ऑस्ट्रेलियाचा ॲडम गिलख्रिस्ट यांना मागे टाकले आहे.  बेन डकेटने कसोटी क्रिकेटमध्ये केवळ २२९३ चेंडूत दोन हजार धावांचा टप्पा गाठला.  तसेच टीम साऊदीने २४१८ चेंडू खेळून कसोटी क्रिकेटमध्ये २००० धावा पूर्ण केल्या होत्या.  ऑस्ट्रेलियाचा महान यष्टिरक्षक फलंदाज ॲडम गिलख्रिस्टने आपल्या कारकिर्दीत २४८३ चेंडूत २००० धावा बनविल्या आहेत.  अशाप्रकारे बेन डकेटने आपल्या तुफानी फलंदाजीने विश्वविक्रम केला आहे.  मात्र त्यामुळे पाकिस्तानला त्रास होत आह.  
गेल्या दौऱ्याप्रमाणे यावेळीही ते पाकिस्तानविरुद्ध जोरदार धावा करत आहेत.
                पुढचे उर्वरीत दिवस दोन्ही कसोटी रंगतदार स्थितीत पोहोचणार असून प्रेक्षकांना या द्वारे नेत्रदिपक खेळ बघायला मिळणार हे मात्र निश्चित.

लेखक : - 
डॉ.दत्ता विघावे                        
क्रिकेट समिक्षक 
मो. क्रं - ९०९६३७२०८२
close