भारत आणि न्युझिलंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना १ नोव्हेंबरपासून मुंबईत खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी हर्षित राणाचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. याआधीही तो संघासोबत प्रवास करत होता, पण नंतर त्याला रणजी ट्रॉफीसाठी सोडण्यात आले. मात्र, आता त्याचा पुन्हा संघात समावेश करण्यात आला आहे. अशा स्थितीत त्याला मुंबईतील वानखेडे न स्टेडियमवर पदार्पणाची संधी मिळू शकते, असे म्हणता येईल. न्युझिलंडने मालिकेत २-० अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. मुंबईत भारताला या मालिकेला विजयाने अलविदा करण्याची संधी आहे.
उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज हर्षित राणालाही मुंबई कसोटी सामन्यात पदार्पण करण्याची संधी मिळू शकते कारण संघ व्यवस्थापन अंतिम कसोटी सामन्यात उपकर्णधार जसप्रीत बुमराहला विश्रांती देऊ शकते. बुमराहने सलग चार कसोटी सामने खेळले असून आगामी काळात तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. अशा स्थितीत कामाचा ताण लक्षात घेऊन संघ व्यवस्थापन हर्षित राणाला भारतात संधी देऊ शकते, कारण ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी त्याचीही संघात निवड झाली आहे. जेणेकरुन तेथे त्याला प्रत्यक्ष कसोटी खेळण्याची वेळ आलीच तर त्याच्या पाठी किमान कसोटीचा अनुभव असणे गरजेचे आहे.
आयपीएल २०२४ मध्ये, हर्षित राणाने केकेआरसाठी १९ सामन्यात १९ बळी घेतले आहेत. याशिवाय तो देशांतर्गत क्रिकेटमध्येही चांगला खेळला आहे आणि अलीकडेच त्याने एका रणजी सामन्यात आसाम विरूध्द पाच बळी मिळवले आहेत. तीन पांढऱ्या चेंडूंच्या मालिकेत तो भारतीय संघासोबत राहिला, पण पदार्पणाची संधी मिळाली नाही, पण आता या युवा वेगवान गोलंदाजाचा संघात समावेश केला जाऊ शकतो, असे मानले जात आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यात वेगवान गोलंदाज म्हणून आकाश दीपच्या जागी मोहम्मद सिराज खेळू शकतो. अशाप्रकारे सिराज आणि हर्षितची जोडी मुंबईत गोलंदाजी करताना पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
जर आपण वर्ष २०२४ च्या उत्तरार्धाबद्दल बोललो, तर एक कसोटी क्रिकेटर आणि कर्णधार म्हणून रोहित शर्मासाठी ते चांगले नव्हते, कारण बारा वर्षांनंतर भारतीय संघाने त्याच्या नेतृत्वाखाली घरच्या मैदानावर कसोटी मालिका गमावली आणि शेवटच्या दोन मालिकांमध्ये, रोहित शर्माची बॅटही अबोल राहिली. अशा परिस्थितीत रोहित शर्माचा फॉर्म खराब आहे का, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मात्र, हे फक्त उत्तरार्धातच दिसले, कारण या वर्षाच्या सुरुवातीला त्याने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत दोन शतके झळकावली होती. याशिवाय रोहित शर्माची एका कॅलेंडर वर्षात भारतीय कर्णधार म्हणून सरासरी सर्वात कमी नाही. विशेष म्हणनेच चार महिन्यापूर्वीच त्याच्याच नेत्वत्वाखाली भारतीय टि२० चा विश्वविजेता बनला आहे.
विराट कोहली, सौरव गांगुली, मन्सूर अली खान पतौडी आणि सौरव गांगुली या माजी कर्णधारांची कर्णधार पदा असताना फलंदाज म्हणून सरासरी रोहित शर्मापेक्षा कमी आहे. एका कॅलेंडर वर्षात कसोटी क्रिकेटमध्ये अव्वल सात मध्ये फलंदाजी केल्यानंतर आणि किमान पंधरा डाव खेळल्यानंतर, एमएस धोनीची २०११ मध्ये फक्त २१.३३ सरासरी होती. या यादीत सौरव गांगुली दुसऱ्या क्रमांकावर आहे. सन २००१ मध्ये त्याची सरासरी २२.२० होती. तर मन्सूर अली खान पतौडी सन १९६९ मध्ये २३.२६ च्या सरासरीने धावा करू शकले होते. एका कॅलेंडर वर्षात ३० पेक्षा कमी सरासरीने धावा करणाऱ्या मोजक्या भारतीय कर्णधारांपैकी विराट कोहली देखील आहे.
विराट कोहलीने सन २०२१ मध्ये २८.२१ च्या सरासरीने धावा केल्या. त्याच वेळी, रोहित शर्मा या सर्व कर्णधारांपेक्षा सरस आहे, कारण सन २०२४ मध्ये त्याची सरासरी ३१.०५ इतकी आहे. त्याने सन २०२२ मध्ये संघाचे कर्णधारपद स्विकारले. सन २०२२ आणि २०२३ मध्ये त्याची सरासरी चांगली होती, परंतु यावर्षी ती उत्तरार्धात घसरली आहे. मात्र तो अजूनही एमएस धोनी, सौरव गांगुली, पतौडी आणि विराटपेक्षा पुढे आहे. रोहित शर्माकडे यावर्षी अजून पाच कसोटी सामने बाकी असून तो किमान तीन कसोटी सामने खेळणार आहे. या कालावधीत त्यांची सरासरी सुधारू शकते किंवा खराब होऊ शकते.
मागील चार कसोट्यात त्याला विशेष धावा काढता आल्या नाहीत, त्यामुळे संघाला मजबूत सलामी न मिळाल्याने संघाची पायाभरणी व्यवस्थीत झाली नाही. त्याचा परिणाम नंतर येणाऱ्या फलंदाजांवर झाला व त्यांना दबावाचा सामना न करता आल्याने डावाच्या शेवटी भारताच्या नावे किरकोळ धावा लागल्या. याचा फायदा प्रतिपक्षी संघाने उठविला. दुसरे असे की, या दबावात भारतीय गोलंदाजही निष्प्रभ ठरले. विशेष म्हणजे जे रविचंद्रन आश्विन व रविंद्र जडेजा हे फिरकी बहाद्दर प्रतिपक्षाचे कर्दन .काळ ठरायचे तेच नेमके न्युझिलंडविरूध्द अपयशी ठरले. त्यामुळे पराभव भारताच्या पदरी पडले. यामुळे कर्णधार म्हणून रोहितच्या माथ्यावर त्याचे खापर फुटणार होतेच. परंतु या दोन पराभवांमुळे रोहित खरंच खराब कर्णधार बनला नाही. प्रतिकुलतेवर मात करून पुन्हा एकदा फिनिक्स भरारी मारण्यात रोहितचा हातखंडा आहे. ते पुढील उर्वरीत मालिका व आस्ट्रेलिया दौऱ्यात नक्कीच दिसून येईल.
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक
मो. क्रं - ९०९६३७२०८२