मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : श्रीमती तारामाई वर्तक मेमोरिअल ॲकॅडमीच्या प्रांगणात आगाशी - विरार - अर्नाळा शिक्षणसंस्थेचे अध्यक्ष विकास नरसिंह वर्तक ह्यांच्या संकल्पनेने "ग्रॅण्डपॅरेंट्स डे" मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. सध्याच्या तंत्रज्ञान व व्यस्त युगात पालक मुलांसाठी संपूर्ण वेळ देऊ शकत नाहीत. अशा वेळी आजी-आजोबा ही भूमिका चोख बजावतात. मुलांना संस्कार देतात. नातवंडांना जीवनाचे महत्त्व शिकवतात. असे घराचे आधारस्तंभ असलेल्या, थोर व्यक्तिमत्व असलेल्या आजी-आजोबांचा सन्मान झालाच पाहिजे ह्याचे बाळकडू शालेय वयापासून देणे गरजेचे आहे. ह्याच संस्कारासाठी आवारात प्रथमच ग्रॅण्डपॅरेंट्स डे मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला.
सदर कार्यक्रमासाठी अध्यक्ष विकास वर्तक आणि पल्लवी वर्तक यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून 'ग्रॅण्डपॅरेंट्स डे' चे महत्त्व सांगत शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रमात बालवाडी ते इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी नृत्य, गीत व भाषणे सादर करून आपले आजी-आजोबांवरचे प्रेम व्यक्त केले. शिक्षकवृदांनी आजी-आजोबांसाठी नाटिका व गीत सादर करून कार्यक्रमात रंगत आणली.
शाळेच्या मुख्याध्यापिका रंजना कोळवणकर यांनी आपल्या जीवनात असणारे आजी-आजोबांचे महत्त्व सांगत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. माध्यमिक विभागाच्या प्राचार्य रचना शर्मा यासुद्धा कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता पाचवीतील विद्यार्थी स्वरूप गायकवाड व आरोही चान्सीकर ह्यांनी केले.
सदर कार्यक्रमास संस्थेच्या व्यवस्थापन मंडळाचे विशेष मार्गदर्शन व सहकार्य लाभले. सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमाने कार्यक्रम बहारदार झाला आणि नातवंडे व आजी-आजोबा आनंदी झाले.