shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

सुपर संडे ठरला न्युझिलंडसाठी गोल्डन डे



               महिला टि२० विश्वचषक २०२४ च्या नवव्या आवृत्तीचे सुवर्ण पान न्युझिलंडच्या नावे कोरण्यात आले.  गट टप्प्यातील सहा गुण आणि + ०.८७९ च्या निव्वळ धावगतीच्या आधारे उपांत्य फेरीसाठी पात्र ठरलेल्या संघाने या स्पर्धेत सलग चौथा विजय नोंदवला.  यापूर्वी १८ ऑक्टोबरला किवींनी उपांत्य वेस्ट इंडिजचा आठ धावांनी पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली होती. 
               दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.  किवींनी २० षटकांत ५ बाद १५८ धावा केल्या.  प्रत्युत्तरात आफ्रिकेचा संघ नऊ गड्यांच्या मोबदल्यात केवळ १२६ धावाच करू शकला. अशा प्रकारे किवीजने पहिले विजेतेपद पटकविले.  त्याचवेळी लॉरा वोल्वार्डच्या नेतृत्वाखालील द. आफ्रिकन संघाला सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. गेल्या वेळी त्यांच्या घरच्या मैदानावर झालेल्या टि२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत त्यांना ऑस्ट्रेलियाकडून १९ धावांनी पराभव स्विकारावा लागला होता.
               या सामन्यात  न्युझिलंडची स्टार अष्टपैलू अमेलिया केरने चमकदार कामगिरी केली.  तिने प्रथम बॅटने छाप पाडली, नंतर चेंडूने आपली चमक दाखविली.  या २४ वर्षीय खेळाडूने चार चौकारांच्या मदतीने ४३ धावा केल्या आणि तीन विकेट्स घेतल्या.  या चमकदार कामगिरीसाठी  तिला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.  त्याच वेळी, संपूर्ण स्पर्धेत १५ बळी धावा अशी अष्टपैलू कामगिरी केल्या बद्दल त्या तिलला मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणूनही निवडण्यात आले.  २०२४ च्या महिला टि२० विश्वचषकात ती सर्वाधिक बळी मिळ .णारी गोलंदाज ठरली.
             अंतिम सामन्यातील विजयानंतर  न्युझिलंडची कर्णधार सोफी डिव्हाईन म्हणाली, एकदा ट्रॉफी हातात मिळाल्यावर मला आनंद होईल.  या संघासोबत ट्रॉफी ठेवताना मला काय वाटेल याची स्वप्ने मी काल रात्री पाहू लागले.  या संघासोबत बराच वेळ घालवला.  या संघाची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे गेल्या १५, १८, २४  महिन्यांत आम्ही काय साध्य करण्याचा प्रयत्न करत आहोत हे आम्हाला माहीत आहे.  आम्ही योग्य दिशेने पावले टाकत राहिलो, तुम्हाला गती हवी असते आणि आम्ही सलग दहा पराभवानंतर विश्वचषकात आलो. पण प्रत्येकाची सुरुवात शून्यापासून होते.
               विजेतेपद मिळविण्यासाठी १५९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची सुरुवात चांगली झाली.  लॉरा वोल्वार्ड आणि ताजमिन ब्रिट्स यांच्यात पहिल्या विकेटसाठी ५१ धावांची उत्कृष्ट भागीदारी झाली.  या स्पर्धेदरम्यान दोन्ही फलंदाजांमध्ये ५० हून अधिक धावांची भागीदारी होण्याची ही तिसरी वेळ आहे.  त्याच वेळी, महिला टि२० विश्वचषकाच्या इतिहासात सहाव्यांदा या दोघीत ५० हून अधिक धावांची भागीदारी झाली.  संघाला पहिला धक्का तझमीनच्या रूपाने बसला जी १७ धावा करून परतली.  तर कर्णधार लॉरा ३३ धावा करून बाद झाली.
              यानंतर द. आफ्रिकेचा फलंदाजी  पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली.  या सामन्यात लॉरा आणि तझमीननंतर केवळ दोनच फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले.  किवीजविरुद्ध अनेके बॉश नऊ, मारिजन कॅप आठ, नदिन डी क्लर्क सहा, क्लो ट्रायन १४, सुने लुस आठ, अनेरी डेर्कसेन १०, सिनालो जाफ्ताने सहा, मलाबा आणि खाकाने प्रत्येकी चार धावा केल्या.  किवीजकडून रोझमेरी मेयर आणि अमेलिया केर यांनी प्रत्येकी तीन तर कार्सन, जोनास आणि हॅलिडे यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
             न्युझिलंडची सलामीवीर सुझी बेट्ससाठी अंतिम सामना ऐतिहासिक ठरला. ३३४ आंतरराष्ट्रीय सामने खेळणारी ती पहिली महिला खेळाडू ठरली.  तिने या बाबत माजी भारतीय क्रिकेटर मिताली राजला मागे सोडले. 
               महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने खेळणाऱ्या ३३४- सुझी बेट्स, ३३३ - मिताली राज, ३२२ - एलिस पेरी,३१६ - हरमनप्रीत कौर, ३०९ - शार्लोट एडवर्ड्स यांचा समावेश आहे. तर
महिला टि२० विश्वचषकात सर्वाधिक सामने खेळणारी खेळाडू ४७ - एलिस पेरी, ४२- सुझी बेट्स,४२- ॲलिसा हिली, ३९ - हरमनप्रीत कौर, ३६ - सोफी डिव्हाईन ह्या आहेत.
                 या सामन्यात संघाची सुरुवात चांगली झाली होती. जॉर्जिया प्लाइमरने मारियान चषकाच्या पहिल्याच षटकात दोन चौकार मारले, पण दुसऱ्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर खाकाने तिला लुसकरवी झेलबाद केले.  तिला नऊ धावा करता आल्या.  यानंतर सुझी बेट्स आणि अमेलिया केर यांनी पदभार स्वीकारला.  तिसऱ्या विकेटसाठी दोघांमध्ये ३७ धावांची भागीदारी झाली जी आठव्या षटकात मलाबाने तोडली. त्याने सुजीला आपला बळी बनवले. तिला तीन चौकारांच्या मदतीने ३२ धावा करता आल्या.  संघाला तिसरा धक्का कर्णधार सोफी डिव्हाईनच्या (६) रूपाने बसला. अमेलिया आणि ब्रूक यांच्यात पाचव्या विकेटसाठी ५०+ धावांची भागीदारी झाली.  यावेळी मलाबाने अमेलियाला ब्रिटीशा कडून झेलबाद केले.  ४३ धावांची शानदार खेळी करून ती पॅव्हेलियनमध्ये परतली.  त्यांच्याशिवाय ब्रूक ३८ धावा, मॅडी नाबाद १२ आणि इसाबेलने नाबाद ३ धावा केल्या.  द. आफ्रिकेकडून मलाबाने दोन तर खाका, ट्रायन आणि नदिन डी क्लार्क यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
               रविवारचा दिवस खास करून न्युझिलंड साठी सुवर्णदिन ठरला. याच दिवशी त्यांच्या पुरुष संघाने मागील ३७ वर्षांपासून भारताला भारतात हरविण्याचा पडीत पडलेला प्रश्न सोडवताना आपला भारताला तिसरा कसोटी विजय मिळवून तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेत बलाढ्य भारताला बॅकफूटवर ढकलले. आपल्या पुरुष संघाच्या ऐतिहासिक कामगिरीने प्रेरित होऊन रविवारी रात्री महिला संघाने तर चक्क विश्वचषकच जिंकून मायदेशातील क्रिकेट रसिकांना दुहेरी आनंदाचा योग दिला. मात्र द. आफ्रिकन महिलांसाठी हा पराभव जिव्हारी लागणारा ठरला. कारण त्यांच्या याच संघाला मागच्या टि२० विश्वचषकात अंतिम फेरीतच पराभवाचा चटका बसला होता. तर त्यांचा पुरुष संघही याच वर्षाच्या जून महिन्यात वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या टि२० विश्वचषकात भारताकडून अंतिम सामन्यात हारला होता. म्हणजे मागच्या सलग तीन आयसीसी स्पर्धा त्यांना गमवाव्या लागल्या. या सारखी वाईट बाब द. आफ्रिकन संघासाठी कोणतीच असू शकत नाही.

लेखक : - 
डॉ.दत्ता विघावे                        
क्रिकेट समिक्षक 
मो. क्रं - ९०९६३७२०८२
close