shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

विधानसभा निवडणुकीसाठी नियुक्त अधिकाऱ्यांनी समन्वयाने जबाबदारी पार पाडावी - जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ


अहमदनगर / प्रतिनिधी:
 आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत अधिकाऱ्यांनी परस्पर समन्वय राखत आपली जबाबदारी चोखपणे पार पाडण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले.  

  जिल्हाधिकारी कार्यालयात आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आयोजित निवडणूक निर्णय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी व समन्वय अधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) राहुल पाटील आदी उपस्थित होते.

    जिल्हाधिकारी श्री. सालीमठ म्हणाले, नुकत्याच झालेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत सर्वच अधिकारी, कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ट काम केले आहे. विधानसभा निवडणुकीतही नियमांचे पालन करून अशीच कामगिरी अपेक्षित आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय निवडणुकीशी संबंधित सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांचे निवडणूक विषयक प्रशिक्षण सत्र आयोजित करावेत. त्यामध्ये प्रत्येक बाबींचे सूक्ष्म नियोजन करुन प्रशिक्षण देण्यात यावे. निवडणूक प्रक्रिया सुलभतेने पार पाडण्याच्यादृष्टीने भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचा आणि नियमांचा अभ्यास करत त्याचे तंतोतंत पालन करावे.  

जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये तयार करण्यात आलेल्या स्ट्राँगरुमची निवडणूक निर्णय अधिकारी व पोलीस अधिकाऱ्यांनी संयुक्तरित्या पाहणी करावी. स्ट्राँगरुमच्या ठिकाणी त्रीस्तरीय सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात यावी.  मतदान यंत्र वाटप व स्वीकृतीच्या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्याबरोबरच आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी श्री. सालीमठ यांनी यावेळी दिले. 
*वृत्त विशेष सहयोग

पत्रकार रमेश जेठे (सर) अहमदनगर 
*संकलन
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर -९५६११७४१११
close