shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

पृथ्वी शॉची क्रिकेट कारकिर्द संपण्याच्या मार्गावर ?


                भारताकडून खेळताना कसोटी पदार्पणातच शतक ठोकण्याचा कारनामा करणारा पृथ्वी शॉ अनेक वादविवाद व वैयक्तीक कारणांमुळे मागील अनेक दिवसांपासून सातत्याने चर्चेत राहिला आहे. क्रिकेटपटूने देशाच्या राष्ट्रीय संघात स्थान मिळविल्या नंतर ते कायम टिकविण्यासाठी आपली तंदुरुस्ती व क्रिकेटींग कौशल्य यावर फोकस करणे गरजेचे असते मात्र पृथ्वी मुंबईचाच माजी खेळाडू विनोद कांबळीच्याच पावलावर पाऊल टाकून आपले क्रिकेट करिअर खराब करून घेत असल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे. आपल्या क्रिकेट कारकिर्दीच्या सुरुवातीलाच अनेक पराक्रम करून थेट भारतीय संघात स्थान मिळाल्यानंतर मात्र पृथ्वी खास करून क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करण्यात अपयशी ठरल्याने वेगळ्याच प्रकारे संकटात सापडला होता.

                पृथ्वी शॉ त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत सतत अपयशाचा सामना करत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये पदार्पण करणारा आणि कसोटी पदार्पणातच शतक झळकावणाऱ्या पृथ्वी शॉने सुमारे साडेतीन वर्षांपूर्वी एक आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.  यानंतर त्याची संघात निवड नक्कीच झाली, पण त्याला अंतिम अकरा जणांच्या संघात संधी मिळाली नाही.  मात्र, त्यानंतर तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये सक्रिय झाला, मात्र कधी दुखापतीमुळे तर कधी अन्य कारणांमुळे त्याला क्रिकेटपासून दूर राहावे लागले.  जेव्हा त्याने पुन्हा एकदा पुनरागमन केले तेव्हा त्याला मुंबई संघातून वगळण्यात आले.  फॉर्म ही त्याची समस्या नक्कीच आहे, पण सध्याचा सर्वात मोठा प्रश्न त्याचा फिटनेस आहे. याच कारणामुळे त्याला रणजी संघातून वगळण्यात आले आहे.
              ४१ रणजी सामन्यांचा अनुभव असलेल्या अखिल हेरवाडकरची मुंबई संघात पृथ्वी शॉच्या जागी रणजी ट्रॉफी सामन्यात निवड करण्यात आली आहे.  तनुष कोटियनच्या रूपाने सोमवारी २१ ऑक्टोबर रोजी जाहीर झालेल्या संघात आणखी एक बदल दिसून आला.  ऑस्ट्रेलियाला जाणाऱ्या भारत अ संघात त्याची निवड झाल्याने त्याला संघातून मुक्त करण्यात आले आहे.  त्याच्या जागी २८ वर्षीय लेफ्ट आर्म स्पिनर कर्श कोठारीला संघात आणण्यात आले आहे.  मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मीडिया रिलीझने पृथ्वी शॉला का वगळण्यात आले याबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही, परंतु त्याच्या फिटनेसमध्ये समस्या असल्याचा दावा करण्यात आला आहे.  पृथ्वी शॉने एका इन्स्टा स्टोरीमध्ये म्हटले आहे की, तो ब्रेक घेत आहे, पण सत्य काही वेगळेच आहे.
                 पृथ्वी शॉ २४ वर्षीय सलामीवीराला इशारा मिळाला होता, मात्र त्याने त्याकडे लक्ष दिले नाही. यापूर्वीही तो शिस्तभंगाच्या प्रकरणांमध्ये अडकला आहे.  मुंबई निवड समितीमध्ये संजय पाटील (अध्यक्ष), रवी ठाकरे, जितेंद्र ठाकरे, किरण पवार आणि विक्रांत येलिगेट्टी यांचा समावेश आहे. पृथ्वी शॉला किमान एका सामन्यासाठी बाहेर ठेवले पाहिजे, असे  वाटत होते.  पुढच्या सामन्यासाठी त्याला परत बोलावले जाईल की नाही हे सांगणे खूप घाईचे आहे, परंतु निवडकर्ते आणि संघ व्यवस्थापन दोघांचेही मत आहे की नेट आणि सराव सत्रात अनियमित खेळ करणाऱ्या सलामीच्या फलंदाजासाठी हा धडा ठरू शकतो.
                क्रिकबझच्या वृत्तानुसार, मुंबई संघ निवड समिती आणि संघ व्यवस्थापनाशी संबंधित लोकांच्या मते शॉचे वजन जास्त आहे. तो नेट सराव सत्रांना गांभीर्याने घेत नाही आणि अनियमितपणे हजेरी लावतो असेही आढळून आले आहे.  त्याच वेळी, श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकूर आणि कर्णधार अजिंक्य रहाणे यांसारखे संघातील इतर भारतीय खेळाडू त्यांच्या सराव सत्रांमध्ये नियमित असतात, परंतु पृथ्वी शॉ सतत सराव सत्रे बुडवत आहे. तो एका हंगामानंतर दोन हंगाम सोडतो.  एमसीएच्या एका वरिष्ठ सूत्रानुसार, निवडकर्ते आणि कर्णधार आणि प्रशिक्षकांसह संघ व्यवस्थापन शॉला संघाबाहेर ठेवण्याच्या निर्णयावर एकमत होते.
                 खराब फिटनेसमुळे मुंबई निवड समितीने पृथ्वी शॉला आगामी रणजी सामन्यातून वगळण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईचा संघ २६ ते २९ ऑक्टोबर दरम्यान त्रिपुराविरुद्ध खेळणार आहे. मुंबई संघाचे कर्णधारपद अजिंक्य रहाणे याच्याकडे सोपवण्यात आले असून श्रेयस अय्यर आणि शार्दुल ठाकूर यांना मुंबई संघात कायम ठेवण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनूसार, निवडकर्त्यांनी पृथ्वी शॉला  मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या प्रशिक्षकांनी दोन आठवड्यांसाठी तयार केलेल्या फिटनेस नियम पाळण्यास सांगितले आहे. टीम मॅनेजमेंटने एमसीएला दिलेल्या अहवालात पृथ्वी शॉच्या शरीरात ३५ टक्के वजन जास्त (चरबी वाढली) असल्याचे सांगितले आहे आणि संघात पुनरागमन करण्याआधी कठोर प्रशिक्षणाची गरज असल्याचं सांगत वजन कमी करण्यास अहवालात सांगितले आहे. दरम्यान, आतापर्यंत झालेल्या दोन रणजी सामन्यांमध्ये पृथ्वी शॉने चार डावांत अनुक्रमे ७, १२, १ आणि ३९ धावा केल्या आहेत. 
              पृथ्वी शॉ जुलैमध्ये बंगळुरूमध्ये मुंबईच्या कंडिशनिंग कॅम्प आणि चेन्नईमध्ये बुची बाबू ट्रॉफीला उपस्थित राहू शकला नाही. त्याने इराणी ट्रॉफीच्या दुसऱ्या डावात शेष भारताविरुद्ध ७६ धावा करून देशांतर्गत हंगामाची सुरुवात केली. तो सामना अनिर्णित राहिला आणि पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर मुंबईचा संघ चॅम्पियन ठरला. गतविजेत्या मुंबईचे दोन सामन्यांत सहा गुण झाले असून ते सध्या अ गटात चौथ्या स्थानावर आहे.
एमसीएच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, पृथ्वीला पुन्हा संघात निवड होण्यापूर्वी सराव करणे आणि वजन कमी करणे आवश्यक आहे. त्याचे वजन वाढल्याने संघातून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, त्रिपुराविरुद्धच्या सामन्यात अजिंक्य रहाणे मुंबई संघाचे नेतृत्व करणार आहे. श्रेयस अय्यर, सिद्धेश लाड, आयुष म्हात्रे, अंगकृष्ण रघुवंशी आणि शार्दुल ठाकूर देखील सामना खेळणार आहेत तर सूर्यकुमार यादव वैयक्तिक कारणांमुळे या सामन्यातून बाहेर आहे. एकंदर बघता पृथ्वी एका वेगळ्याच संक्रमणातून जात असून तो या बिकट परिस्थिताचा सामना कसा करतो ? यावरच त्याची कारकिर्द पुढे जाणार का थांबणार हे ठरणार आहे.

लेखक : - 
डॉ.दत्ता विघावे                        
क्रिकेट समिक्षक 
मो. क्रं - ९०९६३७२०८२
close