अकोले / प्रतिनिधी:
येत्या २० नोव्हेंबर २०२४ रोजी होणाऱ्या विधानसभेच्या निवडणूकीमध्ये जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजवावा यासाठी आम्ही सर्व विद्यार्थी मतदार दूत बनून यशस्वीपणे काम करू असे वचन विद्यार्थ्यांनी दिले आहे.
बालदिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अकोले येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थ्यांनी वचन घेऊन शंभर टक्के मतदान घडवून आणण्याचा विश्वास दिला. शहरातील मॉडर्न हायस्कूल,अगस्ती विद्यालय,कन्या विद्यालय, परफेक्ट इंग्लिश मीडियम स्कूल, माधवराव कोते अभिनव पब्लिक स्कूल आणि वसुंधरा अकामी अकॅडमी या शाळेतील विद्यार्थ्यांनी शहरातून प्रभात काढून मतदान जागृती केली.
लोकसभेतील झालेल्या कमी मतदानाचा अनुभा लक्षात घेता अकोले विधानसभा निवडणूक शाखेने विधानसभेमध्ये मतदारांची टक्केवारी वाढावी यासाठी कंबर कसली आहे. त्यातूनच मतदार जागृती (स्वीप ) कक्षाची स्थापना करून त्याद्वारे मोठ्या प्रमाणामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
त्याचाच एक भाग म्हणून बालदिन हा लोकशाही उत्सव व्हावा या उद्देशाने शहरातील विद्यार्थ्यांच्या प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी पथनाटयाच्या सहाय्याने मतदारांना मतदानाचे आणि त्यांच्या हक्काची जाणीव करून देत उत्तमरीत्या सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली.
याप्रसंगी तहसिलदार डॉ.सिद्धार्थ मोरे यांचे मार्गदर्शनाखाली स्वीप कक्षाचे नोडल श्रीमती सविता कचरे,सहाय्यक शकील बागवान, मंडलाधिकारी सुरेखा वाकचौरे यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी अभयकुमार वाव्हळ होते. यावेळी केंद्रप्रमुख विजय भांगरे यांनी विद्यार्थ्यांना शंभर टक्के मतदान घडवून आणण्याबाबतचे वचन दिले.
कार्यक्रमासाठी नायब तहसिलदार किसन लोहरे, मुख्याध्यापक शिवाजी धुमाळ,जयाताई पोखरकर अपर्णा श्रीवास्तव खडू बेळगावकर अगत अगस्ती संस्थेचे कार्यवाहक सतीश नाईकवाडे,अभिनव शिक्षण संस्थेच्या डॉ.जयश्री देशमुख,जिल्हा परिषद केंद्र प्राथमिक शाळा अकोले,उर्दू शाळा अकोले यांनी उत्तम प्रकारे कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहभाग नोंदवला.
*संकलन
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111