शौकतभाई शेख / श्रीरामपूर
साने गुरुजी यांनी भारतीय स्वातंत्र्य आणि भारतीय संस्कृतीची मूल्यनिष्ठा शिकविली. त्यांनी लिहिलेली ७६ पुस्तके म्हणजे अमृतमूल्ये आहेत.२४ डिसेंबर १८९९ ते ११ जून १९५० या जीवनकाळात त्यांनी केलेली समाजसेवा दिशादर्शक आहे. त्यांची राष्ट्रभक्ती व मानवप्रेमाची मूल्ये जोपासली पाहिजेत असे विचार विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानचे संस्थापक, सचिव सुखदेव सुकळे यांनी व्यक्त केले. येथील आंतरभारती श्रीरामपूर शाखेतर्फे सुखदेव सुकळे यांचे साने गुरुजींची मूल्यनिष्ठा जाणीव विषयावर व्याख्यान अतिथी कॉलनीतील समाज मंदिरात आयोजित करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य टी.ई. शेळके होते. स्वागत, प्रास्ताविक शाखेचे संस्थापक,अध्यक्ष सुभाष लिंगायत यांनी केले.
पाहुण्यांचा परिचय शाखेचे उपाध्यक्ष डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी करून दिला. यावेळी नायब तहसिलदार दत्तात्रय रायपल्ली यांनी कथा सादर केली.ॲड. बाबासाहेब मुठे यांनी श्रीशिव मंदिर उभारणीची माहिती दिली. ह.भ.प प्रा. सखाराम कर्डिले महाराज, प्रा. शिवाजीराव बारगळ, माजी प्राचार्य श्री.ए.डी. पोटघन,माजी मुख्याध्यापक दत्तात्रय चव्हाण, दगडू शिंदे, लेविन भोसले, कारभारी वाघ इत्यादींनी चर्चेत भाग घेतला. सुखदेव सुकळे यांनी साने गुरुजी यांचा खडतर जीवनप्रवास सांगून भारतीय संस्कृतीचा आदर्श म्हणजे शिक्षक साने गुरुजी होते. मंदिर प्रवेश, शेतकरी आंदोलन, तुरुंगवास, समाजवादी विचारधारा, विविध उपक्रमांची माहिती सुकळेसरांनी सांगून आंतरभारती शाखेने आपले कार्य वाढवावे म्हणून ११११ रुपये देणगी दिली. प्राचार्य टी.ई. शेळके यांनी साने गुरुजी यांची साहित्यसंपदा आणि आंतरभारती संकल्पना विद्यार्थी आणि उगवत्या पिढीसमोर ठेवली पाहिजे. त्यांची देशभक्ती आणि समाजमूल्ये यांची शिकवण समजून घेतल्यास साने गुरुजींचा मोठेपणा कळेल. असे सांगून आपण सर्वजण त्यांच्या विचारांचा आदर्श प्रत्यक्ष कृतीत आणणे गरजेचे असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी केले.त्यांनी उपस्थितीतांना ग्रंथसंवाद पुस्तके भेट स्वरूपात देऊन वाचन संस्कृतीला घरोघरी प्रतिष्ठा लाभावी अशी अपेक्षा व्यक्त केली. शाखेचे सचिव लेविन भोसले यांनी आभार मानले
.
- वृत्त विशेष सहयोग, पत्रकार राजेंद्र देसाई वडाळा महादेव