लहानपणापासून तमाशा कला क्षेत्राची आवड निर्माण झाल्यामुळे तमाशा कला क्षेत्राशी संबंधित गाड्या, स्टेज, तंबू, गेट यांचे अगदी बारकाईने कुतूहलाने निरीक्षण करत आलोय त्यात गाड्यावरील नावे, साऊंड सिस्टिम वरील नावे, रंगवलेल्या गेटवरील आणि स्टेजच्या पडद्यावरील अगदी कोपऱ्यात असणारे पेंटर चे नाव याचे गावात तमाशाच्या गाड्या आल्यापासून दिवसभरातून कितीदा वाचन होत असे त्यावेळी "पेंटर दिलावर" ह्या नावावरती नजर खेळून राहत असे. साहजिकच पेंटर दिलावर ह्या नावाची व्यक्ती माझ्यासाठी कुतूहलाचा विषय बनली आणि त्याच पेंटर दिलावर यांना भेटण्याचा योग आला २०१३ मध्ये तेही त्यांच्याकडे तमाशाचे कामच घेऊन गेलो. त्याचे झाले असे की सन २०१३ मध्ये आमच्या कोपरगांव तालुक्यातील चांदेकसारे या गावातील एका गोडाऊनमध्ये भिका भीमा सांगवीकर या तमाशा मंडळाचे साहित्य ठेवलेले होते. या तमाशा मंडळाचे संचालक भीमा आप्पा, योगेश, गणेश, राजेश यांचे बरोबर माझे व माझे मित्र कांतीलाल होन यांचे मैत्री व प्रेमाचे संबंध आहेत. तेव्हा त्यावेळी सीझनच्या पूर्व तयारीसाठी तमाशाचे गेट रंगवण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील पेंटर दिलावर यांच्याकडे पाठवण्याचे ठरले व ती जबाबदारी माझ्यावरती सोपवण्यात आली मीही ती जबाबदारी आनंदाने स्वीकारली कारण लहानपणापासून ज्या पेंटर दिलावर यांच्या विषयी आकर्षण होते आज प्रत्यक्ष त्या व्यक्तीला भेटण्याचा योग आलेला होता, माझ्या मित्राच्या टेम्पोमध्ये गेट टाकून आम्ही दोघे श्रीरामपूरला गेलो. दिलेल्या पत्त्यावरती गेलो असता ज्या व्यक्तीला भेटण्याची ओढ लागली होती प्रत्यक्षात त्या व्यक्तीची भेट झाली ज्या हाताने अनेक तमाशा फडाचे बोर्ड, गेट, पडदे रंगवले त्या हातांचा स्पर्श हस्तांदोलन करते वेळी झाला. मनात आनंद निर्माण होऊन एक वेगळीच ऊर्जा प्राप्त झाली. चहापाणी घेता घेता माझा प्रश्नांचा भडीमार चालू होता. समोरून दिलावर भाई जुन्या आठवणीत रमून अगदी शांतपणे उत्तरे देत होते. तमाशा क्षेत्रासाठी सुवर्णकाळ असलेल्या त्या वेळेच्या घटना, प्रसंग ऐकताना तमाशाची श्रीमंती लक्षात येत होती...... दिलावर भाईची त्यावेळची झालेली भेट व काल परवाच पुन्हा बारा वर्षानंतर त्याच उत्साहाने झालेली भेट.. यावेळी तमाशासाठी केलेली कामगिरी दिलावर भाई अगदी अभिमानाने सांगत होते.....
सन १९७८ साली नारायणगावला बोर्ड करण्याकरता गेलो होतो तेथे पेंटर नंदकुमार भेटले,दोघांनी एकत्रित खूप कामे केली, सन १९७९ साली लग्न झाल्यामुळे परत श्रीरामपूरला आलो परंतु १९८१ साली पेंटर नंदकुमार यांनी नारायणगावला बोलावून घेतले व कामासंदर्भात समजावले, त्या काळातील नामवंत तमाशा फड विठाबाई नारायणगावकर, दत्तोबा तांबे शिरोलीकर ,चंद्रकांत ढवळपुरीकर ,दत्ता महाडिक पुणेकर ,आनंद महाजन, खेडकर - मुळे यासोबतच काही नव्या तमाशा मंडळांची खूप कामे केली, पडद्यावर रस्ता, जंगल, महाल, रंग भरणे, फिनिशिंग सर्व माहिती नंदकुमार पेंटर यांनी शिकवली त्याकाळी पडद्यावर व गेटवर "नंदकुमार अँड दिलावर आर्ट्स" ही साईन झळकली.
लता सुरेखा पुणेकर या नवीन तमाशा मंडळाला पेंटर नंदकुमार आणि दिलावर यांनी लेटरहेड पासून ते पोस्टर,पडदे, जाहिरात गाडी, गेट इत्यादीचे सहकार्य करून लेखक, संगीतकार, कलाकार, स्टेज तंबू लाइटिंग, साऊंड सिस्टिम इत्यादींची जुळवाजुळव करून देऊन तमाशा उभारणीस सहकार्य केले.
दत्ता महाडिक पुणेकर यांनी गेटचा लोखंडी पत्रा गंजतो म्हणून ॲल्युमिनियमच्या पत्र्याचा प्रथम वापर करून नवीन पॅटर्नचा गेट तयार केला तो गेट बघून चंद्रकांत ढवळपुरीकर व विठाबाई नारायणगावकर यांनीही तसेच गेट बनवले.
पुढे सन १९८९ साली मंगला बनसोडे करवडीकर तमाशाचे मालक रामचंद्र बनसोडे यांनी कराडला बोलावून घेतले व कामे करून घेतली, त्यात पडदे, वगनाट्याची स्टेज प्रॉपर्टी, बॅनर,बोर्ड,गेट वगैरे होती.
मालती इनामदार या तमाशा फडाचे मुसा भाई इनामदार हे सुद्धा मंगला बनसोडे या फडात मॅनेजर म्हणून काम बघायचे ते देखील श्रीरामपूरचेच असल्याने विशेष सहकार्य करायचे.
सर्वच पार्ट्यांनी आवश्यक साहित्य तयार करून घेतले त्यामुळे वगनाट्य मध्ये आकर्षकपणा, जिवंतपणा वाढला प्रेक्षक आज कोणते वगनाट्य आहे याची चौकशी करत नंतरच तिकीट काढत असत.
मंगला बनसोडे यांनी वगनाट्यासाठी कुऱ्हाड, तलवार,भाला, कोर्टातील दृश्यासाठी आरोपी व साक्षीदारांसाठी पिंजरे उभे करणे व न्यायाधीशांचे आसन तयार करून घेतले.
बापू बिरू वाटेगावकर वगनाट्या साठी २२ फुटी एसटीची प्रतिकृती तयार करण्यात आली, त्यात कलाकार दरवाजा उघडून आत जात असत.
राजीव गांधी यांच्या हत्येवर आधारित वगनाट्यासाठी धनु हया मारेकरीचा आत्मघातकी बॉम्बस्फोटाचे विशेष सादरीकरण, स्टेजवर राजीव गांधी यांची चिता जळणे इत्यादी सादरीकरणासाठी वातावरण निर्मिती व ड्रेपरीवर विशेष लक्ष देण्यात आले. राजीव गांधी ची भूमिका करणाऱ्या कलाकारासाठी श्रीरामपूर मध्ये अस्सल खादीचा ड्रेस शिवून दिला होता.
हस्तीदंत व चंदन तस्कर वीरप्पन या वगनाट्या मध्ये हत्तीची फोल्डिंग पद्धतीची प्रतिकृती व वन अधिकाऱ्यांची कापलेली मुंडकी तयार करून दिली.
पालीचा गण्या माग या वगनाट्या साठी पाली येथे जाऊन मंदिराचे स्केचेस तयार करून पडद्यावर पालीच्या मंदिराची उभे उभे प्रतिकृती तयार केली होती.
नागेवाडी खून खटला या वगनाट्या मध्ये मृत पात्राचे केलेले सात तुकडे प्रेक्षकांना दाखवून एकेक अवयव हात, पाय, धड, मुंडके वाहत्या पाण्यातून काढून स्टेजवर मांडताना प्रेक्षक उभे राहून आश्चर्यचकित होत सोबत डॉक्टर पोलीस पंच वगैरे पात्र असत.
बाळू मामाची मेंढर या वगनाट्यात माठातून आपोआप दही जमिनीतून पैशांची रास स्टेजवर नागाचे येणे फणा उभारणे असे दृश्य तयार केले होते.
लग्नाआधी कुंकू पुसले या वगनाट्यात स्टेजवर भुताटकीचे आगमन भय्या व पडद्यावर अल्ट्राव्हायलेट लाईट व फ्लोरोसंट चा वापर करून वातावरण निर्मिती केली होती.
वीस फुटी विहिरीतील स्त्री पात्राची उडी टाकून आत्महत्येचा प्रयत्न हा सीन खरे तर दुःखद आहे पण त्यात खूपच जिवंतपणा असायचा, लाईट इफेक्ट समोर इफेक्ट वीस फुटी दगडी विहिरीत उडी टाकल्यावर विरुद्ध उडणारे पाणी व त्याचा आवाज तिला विहिरीबाहेर काढल्यावर स्त्री ची भिजलेली अवस्था हा सीन बघून प्रेक्षक अक्षरशः टाळ्या वाजवून दात देत असे.
कारगिल युद्ध ज्वाला या वगनाट्यासाठी नवीन प्रयोग एके ४७ मधून गोळीबार व सैनिक देशातील पात्रांच्या कपड्याच्या आतून होणारे स्फोट व रक्त हा सीन मंगलताईचे चिरंजीव अनिल कुमार यांच्या धाडशीपणामुळे पूर्ण झाले, कारण कपड्याच्या आत छातीवर फटाक्यांचा लड बांधून व योग्य वेळी वीज प्रवाहाचे बटन दाबून फटाक्यांचा स्फोट करण्याची हिंमत फक्त अनिल कुमारांकडेच असल्याने हा सीन अजरामर झाला. प्रेक्षक अचंबित होऊन तो सीन बघायचे.
कारगिलच्या वगनाट्यात रायफलच्या प्रतिकृती जवानांच्या शवपेट्या कारगिल डोंगराची प्रतिकृती विमान १४ फुटांचे हेलिकॉप्टर तोफेची प्रतिकृती त्यातून होणारे स्फोट सगळेच अचंबित करणारे होते.
देव चोरला जेजुरीचा या वगनाट्यासाठी जेजुरीच्या खंडोबाची मूर्ती व मंदिराची प्रतिकृती तयार करून दिली.
अहमदनगर जिल्ह्यातील
कोठेवाडीत महिलावर झालेला अत्याचार ज्या वाड्यात झाला त्याची प्रतिकृती वगनाट्यासाठी तयार करण्यात आली.
प्रेक्षकांना आकर्षित करण्याकरता गेटमध्ये आजपर्यंत कोणी न वापरले डिझाईन मध्ये निर्मिती साईज २५ फूट रुंदी ४० ते ५० फुटापर्यंत राजीव गांधी यांच्या हत्येवर आधारित लोकनाट्याची वेळी पार्लमेंट ची प्रतिकृती असलेले गेट, कधी किल्ला, कधी नागफणी, कधी मोरपंखी तर तीन व पाच छत्र्यांचे डिझाईन असलेले गेट, दर दोन ते तीन वर्षात नवीन पॅटर्नची निर्मिती करण्यात येत होती.
रंगबाजी च्या टायटल साठी गणपती शंकराची पिंड, पंख हलवीत उडणारा गरुड व त्यावर तुकारामाच्या भूमिकेत बसलेले पात्र, भिंतीवर निवृत्ती ज्ञानेश्वर सोपान व मुक्ताबाई अशी चार पात्र बसून भिंत चालविणे, चालणाऱ्या वाघाचे प्रतिकृतीवर चांगदेव महाराजांचे भूमिकेतील पात्र बसून चालवणे तसेच भारतरत्न एपीजे अब्दुल कलाम यांची इंट्री व मिसाईल चे स्टेजवर उड्डाण असे सीन स्टेजवर हुबेहूब तयार करण्यात आले.
वेळेअभावी इतर पार्ट्यांचे कामे करू शकलो नाही तरी काही फड मालकांच्या इच्छेनुसार पडदे गेट वगैरे करून दिले. विशेषतः रघुवीर खेडकर यांना माझे पडदे खुप आवडतात. सध्या माझे पडदे भिका भीमा सांगवीकर, पांडुरंग मुळे ,आनंद महाजन जळगावकर इत्यादी तमाशा फडामध्ये आहे. भिका भीमा सांगवीकर,पांडुरंग मुळे, अंजली राजे नाशिककर यांचे गेट सुद्धा केले आहेत.
आव्हानात्मक सीन साठी नावीन्यपूर्ण प्रयोग व क्रियाशीलता यामुळे सतत ४० वर्षे तमाशा क्षेत्राशी बांधिलकी जपली आहे.
अशा पद्धतीने माझा तमाशा सृष्टीची सेवा करण्याचा प्रवासात खारीचा वाटा आहे. असे तमाशा सृष्टीचे कला दिग्दर्शक पेंटर दिलावर भाई जुन्या आठवणींना उजाळा देत होते. मीही भूतकाळात रमून गेलो होतो कारण यातील बरीचशी वगनाट्य मी पाहिलेली आहेत परंतु स्टेजवरील पडदे, ड्रेपरी, उभे केलेले सीन इत्यादी गोष्टीत पेंटर दिलावर यांचे कष्ट आहेत हे माहीत नव्हते ते आज माहित पडले. चर्चा चालू असतानाच मध्येच दिलावर भाई यांनी बाजूलाच असलेल्या प्रसिद्ध मिनार चहावाल्याला आवाज देऊन मलई मारके चहाची ऑर्डर दिली. क्षणात चहा आला आणी तो चहा घेऊन मी "दिलावर'स रेडीयम आर्ट" या पेंटर दिलावर यांच्या दुकानातून माझ्या गावाकडे येण्यासाठी रजा घेतली व परतीच्या प्रवासाला मार्गस्थ झालो.
तमाशाचे पडदे रंगवणारे दिलावर भाई नेहमीच पडद्याआड राहिले त्यांना पडद्यासमोर आणण्याचा माझा हा आजचा छोटासा प्रयत्न...
लेखन
अरुण खरात
चांदेकसारे ता.कोपरगांव
मोबा. क्र.9960838433
*संकलन*
समता मीडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर - 9561174111