यष्टिरक्षक फलंदाज ध्रुव जुरेलने सलग दुसरे अर्धशतक झळकावून भारतीय कसोटी संघाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवण्यासाठी भक्कम दावा केला, पण त्याच्या अप्रतिम प्रयत्नानंतरही दुसऱ्या आणि अंतिम सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारत अ संघाला ऑस्ट्रेलिया अ संघाकडून पराभव पत्करावा लागला. शनिवारी येथे झालेल्या अनधिकृत कसोटी सामन्यात सहा गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. अशा प्रकारे भारत अ संघाने दोन सामन्यांची मालिका ०-२ अशी गमावली. त्यांच्या संघाने याआधी मॅके येथे पहिली अनधिकृत कसोटी सात गडी राखून गमावली होती.
भारतीय संघाने सकाळी पाच बाद ७३ धावांवरून आपला डाव पुढे सुरू केला. पहिल्या डावात ८० धावा करणाऱ्या जुरेलने दुसऱ्या डावात १२२ चेंडूत पाच चौकारांसह ६८ धावांची संयमी खेळी खेळली. जुरेलने बाद होण्यापूर्वी नितीश कुमार रेड्डी (३८) सोबत ९४ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. प्रसिध कृष्णा (२९) आणि तनुष कोटियन (४४) यांनीही चांगली खेळी खेळत भारताला दुसऱ्या डावात २२९ धावांपर्यंत नेले आणि यजमान संघासमोर १६८ धावांचे लक्ष्य ठेवले.
भारत अ संघाच्या दुसऱ्या डावात ऑफस्पिनर कोरी रोसिओलीने ऑस्ट्रेलिया अ संघासाठी ७४ धावांत चार बळी घेतले. त्याला अष्टपैलू ब्यू वेबस्टर (४९ धावांत तीन बळी) आणि उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज नॅथन मॅकअँड्र्यू (५३ धावांत दोन बळी) यांचीही चांगली साथ लाभली. ऑस्ट्रेलिया अ संघासाठी विजयी लक्ष मोठे नव्हते, पण त्यांची सुरुवात चांगली झाली नाही. वेगवान गोलंदाज प्रसिध्द कृष्णाने (३७ धावांत २ बळी) मार्कस हॅरिस आणि कॅमेरून बॅनक्रॉफ्ट यांना डावाच्या पहिल्याच षटकात लागोपाठ चेंडूवर बाद करून भारतासाठी आशा निर्माण केली. या सामन्यात सहा विकेट्स घेत त्याने बॉर्डर गावस्कर करंडक स्पर्धेसाठी भारताच्या अंतिम अकरामध्ये स्थान मिळवण्याचा दावाही ठोकला.
यानंतर मुकेश कुमारने कर्णधार नॅथन मॅकस्विनी (२५) याला यष्टींच्या मागे झेलबाद केले आणि ऑस्ट्रेलिया अ संघाची धावसंख्या तीन बाद ४८ अशी केली. पण सॅम कॉन्टास एका टोकाला ठाम होता. त्याने १२८ चेंडूत ७३ धावांची नाबाद खेळी केली. ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघात स्थान मिळवण्याचा दावेदार असलेल्या या युवा फलंदाजाने वेबस्टरसोबत (६६ चेंडूत नाबाद ४६ धावा) ९६ धावांची अखंड भागीदारी करून संघाला लक्ष्यापर्यंत नेले. दरम्यान, ऑलिव्हर डेव्हिसने २१ धावांचे योगदान दिले.
ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील भारत अ संघाला ऑस्ट्रेलिया अ विरुद्धच्या पहिल्या अनधिकृत कसोटीतही सात गडी राखून पराभव पत्करावा लागला होता. या पराभवासह भारत अ संघ या दोन सामन्यांच्या मालिकेत ०-१ ने पिछाडीवर पडला. सामन्याच्या शेवटच्या दिवशी ऑस्ट्रेलियाला ८६ धावांची गरज होती आणि ७ विकेट शिल्लक होत्या, यजमान संघाने एकही विकेट न गमावता ही धावसंख्या गाठली आणि विजयाची नोंद केली. कांगारूंच्या चौथ्या डावात कर्णधार नॅथन मॅकस्विनीने नाबाद ८८आणि ब्यू वेबस्टरने ६१ धावा केल्या.
मॅके येथील ग्रेट बॅरियर रीफ एरिना येथे खेळल्या गेलेल्या या कसोटी सामन्याची सुरुवात भारतासाठी चांगली झाली नव्हती. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा पाळी आल्यानंतर भारत अ संघ पहिल्या डावात अवघ्या १०७ धावांत गुंडाळला गेला. भारताकडून देवदत्त पडिक्कल याने सर्वाधिक ३६ धावा केल्या. भारताच्या निराशाजनक फलंदाजीचा अंदाज यावरूनच लावता येतो की, नवदीप सैनी हा गोलंदाज संघाकडून सर्वाधिक २३ धावा काढून दुसऱ्या क्रमांकावर होता.
मात्र, भारत अ संघानेही ऑस्ट्रेलिया अ संघाला पहिल्या डावात फारशी धावसंख्या करू दिली नाही. मुकेश कुमारच्या घातक गोलंदाजीसमोर कांगारू १९५ धावांत गारद झाले. मुकेशने पहिल्या डावात सर्वाधिक ६ बळी घेतले. पहिल्या डावानंतर ८८ धावांनी पिछाडीवर पडलेल्या भारत अ संघाने दुसऱ्या डावात साई सुदर्शन (१०३) यांचे शतक आणि देवदत्त पडिक्कल (८८) याच्या अर्धशतकाच्या जोरावर ३१२ धावा केल्या. तिसऱ्या विकेटसाठी या दोघांमध्ये १९६ धावांची भागीदारी झाली आणि त्यामुळेच संघाला ही धावसंख्या गाठता आली. हे दोघे बाहेर पडताच संघ पुन्हा एकदा पत्त्याच्या बंगल्यागत भारताचा डाव कोसळला. भारत अ संघाने ऑस्ट्रेलिया अ संघासमोर विजयासाठी २२४ धावांचे लक्ष्य ठेवले होते.
या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलिया अ संघाने तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ८५ धावांत ३ गडी गमावले होते. त्यानंतर कर्णधार नॅथन मॅकस्विनी आणि ब्यू वेबस्टर यांनी अप्रतिम फलंदाजीचा नजराणा पेश करत भारतीय गोलंदाजांना कोणतेही यश मिळू दिले नाही नाही. या दोघांनी १४१ धावांची नाबाद भागीदारी करत ऑस्ट्रेलिया अ संघाला सहज विजय मिळवून दिला. याच दोन संघातील दुसरा अनधिकृत कसोटी सामना सात नोव्हेंबरपासून मेलबर्न येथे खेळवला जाणार आहे.
भारत अ आणि ऑस्ट्रेलिया अ यांच्यात मॅके येथे खेळल्या गेलेल्या पहिला अनधिकृत कसोटी सामन्याच्या शेवटच्या दिवशी सकाळी भारत अ आणि विशेषत: संघाचा यष्टिरक्षक ईशान किशन अडचणीत आला. भारत अ संघावर बॉल टॅम्परिंगचा आरोप करण्यात आला. या सामन्याच्या शेवटच्या दिवशी सकाळी चेंडू बदलाचा वाद पाहायला मिळाला. यामध्ये ईशान किशन पुढे आला आणि पंचाशी हुज्जत घातली. चेंडू बदलण्याचा पंचांचा निर्णयही मूर्खपणाचा होता. स्क्रॅचमुळे चेंडू बदलण्यात आल्याचे पंचाचे म्हणणे ऐकू आले.
ईसपीएन क्रिक इनफोनुसार, दिवसाच्या पहिल्या चेंडूआधी भारतीय खेळाडू आणि पंच शॉन क्रेग यांच्यामध्ये जोरदार बाचाबाची झाली, ज्यामध्ये यष्टीरक्षक ईशान किशनने चेंडू बदलण्याच्या निर्णयाला "मूर्खपणा" म्हटले. फॉक्स क्रिकेटवरील स्टंप मायक्रोफोनद्वारे रेकॉर्ड केलेल्या ऑडिओमध्ये चेंडू का बदलला हे स्पष्ट करताना, क्रेग म्हणाला: "त्यावर ओरखडे आहेत, आम्ही चेंडू बदलतो. आणखी चर्चा नाही, चला खेळूया." किशनने उत्तर दिले: "म्हणून आम्ही या चेंडूने खेळणार आहोत. हा अतिशय मूर्खपणाचा निर्णय आहे."
क्रेगने उत्तर दिले: "माफ करा, तुमची मतमतांतरे नोंदवली जातील. हे अयोग्य वर्तन आहे. तुमच्या कृतीमुळे आम्ही चेंडू बदलला आहे." विशेष म्हणजे, नियम ४१.३.४ मध्ये नुसार, जेव्हा पंच चेंडू "अयोग्यरित्या बदलला गेला" असे मानतात तेव्हा ऑस्ट्रेलिया अ संघाला पाच पेनल्टी धावा दिल्या गेल्या नाहीत. मात्र, याचे कोणतेही पुरावे नसताना मग अशा पद्धतीने चेंडू का बदलण्यात आला, हा प्रश्न कायम आहे.
नियमांनुसार, "कोणत्याही संघाच्या सदस्याने किंवा सदस्यांनी चेंडूची स्थिती चुकीच्या पद्धतीने बदलली आहे असे पंचांना वाटत असेल, तर त्यांनी विरोधी पक्षाच्या कर्णधाराला विचारले पाहिजे की तो चेंडू बदलू इच्छितो का ? आवश्यक असल्यास, फलंदाजीच्या बाबतीत, विकेटवरील फलंदाजाला त्याच्या कर्णधाराऐवजी विचारले जाते.
नियम ४१.३.४.१ बदली चेंडूची विनंती केल्यास, पंचाने उल्लंघनापूर्वी ताबडतोब आधीच्या चेंडूइतकाच समान असलेला चेंडू निवडून लगेच वापरावा. तथापि, नियम क्रमांक४१.३.४.२ नुसार, बदली चेंडू वापरण्यासाठी निवडला गेला किंवा नसला तरी, गोलंदाजी करणाऱ्या विरोधात पंच फलंदाजी करणाऱ्या संघाला ५ पेनल्टी धावा देईल; योग्य असल्यास, विकेटवरील फलंदाज आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या कर्णधाराला कळवले जाते की तुमच्या कृतीमुळे चेंडू बदलला आहे.
मागील तीन आठवड्यात भारतीय क्रिकेटचे भाग्यच पलटले असून एक वेळ प्रत्येक बाब भारतीयांच्या मनासारखी घडायची, पण सध्या मात्र छोट्या छोट्या चुका अंगलट येत आहेत. त्याचा परिणाम कळत नकळत सर्वच प्रकारच्या भारतीय क्रिकेटवर होत आहे.
२२ नोव्हेंबर पासून पाच कसोटी सामन्यांची बॉर्डर -गावस्कर ट्रॉफी टिम इंडिया व ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान खेळली जाणार असून त्या मालिकेपूर्वी नव्या दमाच्या भारतीय खेळाडूंना सराव म्हणून या अ संघांची मालिका आयोजित करण्यात आली होती. परंतु भारतीय संघाला विशेष काहीच प्रतिकार न करता आल्याने दोन सामान्यांच्या मालिकेत क्लिन स्विप स्विकारावा लागला. ध्रुव जुरेल व प्रसिद्ध कृष्णाचे हेच काय ते भारतासाठी मुख्य मालिकेकरिता आशास्थान म्हणून उभारले आहेत.
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक
मो. क्रं - ९०९६३७२०८२