shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

भारतीय भाषा उत्सव सांस्कृतिक विविधतेचा गौरव

                   
११ डिसेंबर २०२४ हा दिवस भारतीय भाषा उत्सव म्हणून विविध कार्यक्रमांनी साजरा केला जात आहे. तामिलनाडू येथे ११ डिसेंबर १८८२  रोजी जन्मास आलेले सुब्रह्मण्य भारती उर्फ महाकवी भारतीयार यांचे  भारतीय स्वातंत्र्य चळवळीत मोठे योगदान आहे. त्यांच्या काव्यात देशप्रेम ओतप्रोत भरलेले आहे. अशा या भारतीयतत्व स्वप्न पाहणाऱ्या धैर्यवान कवीचा मृत्यू वयाच्या अवघ्या ४० व्या वर्षी झाला. म्हणजे ११ सप्टेंबर १९२१ ला झाला. ते समाजसुधारक ,पत्रकार होते. भारताच्या दक्षिणेकडील तमिलनाडू  राज्यात एट्टपूरम हे त्यांचे गाव .त्यांचे शिक्षण तेथील स्थानिक विद्यालयात झाले. त्यांना तेथील राजाने भारती हे नाव दिले होते. त्यांचे आई वडील कटे किशोर अवस्थेत असताना वारले. १८९७ मध्ये त्यांचा चेल्लमल हिच्याशी विवाह झाला. १५ व्या वर्षी विवाह झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते वाराणसी येथे गेले. तिथे त्यांनी अनेक गोष्टी शिकल्या प्रारंभी ते हिंदू अध्यात्मात गुरफटले खरे पण पुढे राष्ट्रभक्तीची प्रेरणा जागी झाली, ते पुढे काँग्रेसने सुरु केलेल्या अनेक चळवळीत होते. भगिनी ,निवेदिता ,योगी अरविंद व वंदे मातरम या गीताचा त्यांच्यावर प्रभाव होता. कॉंग्रेस क्रांतिकारक यांचेशी त्यांचा सबंध असल्याने सरकार त्यांना पकडू पाहत होती. १९०८ मध्ये ते पांडेचरी येथे गेले . तेथे ते १० वर्ष वनवासी बनून राहिले.याच काळात त्यांनी कविता व गद्य लेखन केले. स्वातंत्र्य प्राप्ती , जातीभेद निर्मुलन ,स्त्रियांचे न्यायासाठी त्यांनी लेखन केले. १९१८ ला त्यांना जेलमध्ये नेण्यात आले. १९०८ मध्ये त्यांनी स्वदेश गीत गंगाजल, व १९०९ मध्ये त्यांनी जन्मभूमी हे देशभक्तीपूर्ण कविता संग्रह प्रकाशित केले. ब्रिटीशांच्या प्रति उठाव पद्धतीचे हे लेखन होते. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षण देणे , कारखान्यातून आवश्यक साधनांची निर्मिती व वर्तमानपत्र तयार करण्यासाठी कागद निर्मितीची त्यांना आवश्यकता वाटत होती. भारताचा जप लोकांनी केला पाहिजे असे त्यांना वाटे . आपण एकत्र राहिलो तर जीवन आहे .आपल्या सर्व माणसात ऐक्य नसेल तर सर्वांची अधोगती ठरलेली आहे. या भावनेने आपला उद्धार होईल.हेच खरे ज्ञान आहे असे त्यांना वाटे. भारत हा स्वयंप्रकाशित व बलवान देश आहे .दुष्टता आणि कपट यांची संहारक शक्ती आहे. आम्ही गुलामीत राहणे ठीक नाही .गुलामीचा आपण धिक्कार केला पाहिजे हा विचार त्यांच्या साहित्यात येतो. विकिपिडीयावर  त्यांचे कोणते साहित्य आहे ते दिलेले आहे. बहुतांशी साहित्य हे तामिळी आहे . केंद्र शासनाने त्यांच्या जयंतीदिन निमित्ताने ‘भारतीय भाषा दिवस भारतीय भाषांचा उत्सव म्हणून साजरा करावा या बाबत आवाहन केले आहे. विद्यापीठ अनुदान आयोग असेल .किंवा एन.सी.इ .आर टी इत्यादी संस्थांनी देखील या निमित्ताने विविध भारतीय भाषांच्या मध्ये भारतीयत्वाची भावना रुजावी.लोकांनी भारतातील विविध संस्कृती व भाषा यांच्याप्रती मैत्रभावना रुजवावी व देशाची एकात्मता जपायला हवी असे आवाहने केली आहेत. तमिळ भाषेतील आधुनिक काव्याचे जनक असे देखील त्यांना म्हणतात. आपल्याकडे केशवसुत यांच्या काव्यात ‘ समतेचा ध्वज उंच धरा रे असे आवाहन दिसते. तसे आवाहनं त्यांच्या काव्यात आहे. वीर शिवाजी, भारतमाता ,कन्नन पाटू  इत्यादी काव्यात स्वातंत्र्य , सामाजिक समता आणि राष्ट्रप्रेम आपल्याला दिसते. जाती व्यवस्थेला त्यांनी विरोध केला ,स्त्री शिक्षण आणि महिलांचे स्वातंत्र्य यांचा कैवार त्यांच्या कवितेत आहे. स्वदेश मित्रन , इंडिया , आणि बालभारती या राष्ट्रीय वृत्तपत्रासाठी त्यांनी लेखन केले आहे. तमिळ साहित्याला त्यांनी उंची प्राप्त करून दिली. भारतमाता हे त्यांचे देशभक्तीपूर्ण काव्य आहे. पांचाली शपथ हे महाभारतशी निगडीत आहे. नव मान्य कविता स्त्रीआहे.  स्वातंत्र्य समतेवर आधारित आहे. भाषिक समृद्धी, विविधतेचा आदर ,राष्ट्रीय एकता ,भारतातील विविध संस्कृतीची समृद्धी, या गोष्टीना महत्व दिल्याने सर्व भारतीय भाषांचा सन्मान केला पाहिजे हे त्यांचे मत दिसते. भारतीय बहुविध संस्कृतीचा गौरव करण्यासाठी भारतीय भाषा दिवस आहे.भारतीय  भाषांचे सामर्थ्य आणि सौंदर्य आपण मान्यच करायला पाहिजे. जगामध्ये अशी विविधता खूप कमी असेल. माणसाच्या सर्जनशीलतेचा दिवस म्हणजे भारतीय भाषा दिवस   आहे सर्व लोक आनंदाने जगा, ही आपली भूमी आहे. ती सर्वांसाठी आहे. भारत हे सर्वसमावेशक राष्ट्र आहे. ते केवळ हिंदू राष्ट्र नाही याचीही जाणीव त्यांना झालेली असणार कारण भारत आणि इंडिया या गोष्टीना त्यांनी महत्व दिले आहे. आपले राष्ट्र हे उंच उठले पाहिजे आणि महिलांना देवी मानले पाहिजे असा सन्मान त्यांनी केलेला आहे . स्वदेशी तत्वज्ञान हे देशाला उपयुक्त आहे असे त्यांचे मत आहे. आर्थिक स्वावलंबन आवश्यक आहे. त्यांचा सबंध आध्यात्मिक विचाराशी असला तरी ते अंधश्रद्धा आणि सामाजिक अन्यायाच्या विरुद्ध होते. सत्य ,आणि जगाचे यथार्थ वास्तव याचा स्वीकार ते करतात.अंधश्रद्धावर टीका त्यांनी केली आहे.तर्कशुद्ध विचारसरणी आणि स्वातंत्र्य मुल्ये स्वीकार करा , अंधश्रद्धापासून दूर व्हा असे त्यांचे मत होते. भारतातीय धर्मांविषयी श्रद्धा होती पण अंधश्रद्धा त्यांना नको होती. त्यांची विचारसरणी प्रगल्भ होती.
‘भारत माते ,तूच दिन दुबल्यांना दिलेस शौर्य 
 तुझ्या छायेत सारे भेद विसरले जातात 
 तुझ्या अंगणात शरण आलेले सर्व दुःखांना विसरतात 
 हे माते ,तुझ्या कधीही न मावळनाऱ्या तेजाने सर्व भूमी उजळून जाते 
         किंवा 
 आता उठा ! तुमच्या देशाच्या सुखासाठी 
 ज्या बंदिस्त मनानी अंधकारात वास केला ते जागे ताजे विचार घ्या 
 चला ! सुसंस्कृत राष्ट्रात रुपांतर करा 
 तुमच्या देशासाठी हीच नवचेतना असू द्या [ 

 या प्रकारचे लेखन त्यांचेकडून होते.  किंवा महिलेसाठी ते लिहितात 
 होय , स्त्री ,तू एक शक्ती आहेस
तुझ्या हातात तीर्थ आहे 
 तू कधीही खंडित होऊ नकोस 
 तु अशीच स्वाभिमानाने धावत राहा  
 किंवा  सत्य हवे आहे ,सत्याची गाठ पडली पाहिजे .
गांधीजीं व भारती अशी काहीशी तुलना केली तर  दोघांना गुलामगिरी नको आहे.  विचार सत्य अहिंसेचा ,सत्याग्रह स्वरूपाचा तर भारती काव्यातून स्वातंत्र्य ,स्वाभिमान ,शौर्य बद्दल लिहितायत. जातिवाद ,अस्पृश्य्ता यांना गांधीचा विरोध तर भारतीच्या कवितेत जातिवाद ,अंधश्रद्धा व लैंगीक भेदभाव यावर टीका आहे .दोघे भारतीय संस्कृतीचा गौरव करतात. स्वदेशी विचार, आत्मनिर्भरता ,साधेपणा मूलोद्योग यांना गांधीनी महत्व दिले ,तर भारती शौर्य आणि बंड याचा पुरस्कार करतात. गांधी सत्य ,अहिंसा अहिंसा ,सर्व समभाव वादी तर भारती  सर्व धर्मीयांची एकता व समाजसुधारणा यांना महत्व देतात. गांधीजी स्वराज्य मिळविण्यासाठी लोकांना प्रेरित करतात तर भारती थोडे आक्रमक लढयाला महत्व देतात. भारती विविध धर्माची समरसता साधून सार्वभौम राष्ट्र अपेक्षा करतात. भारती स्वतंत्रते साठी संघर्ष महत्वाचा मानतात. काही प्रमाणात धर्म असूनही धर्मनिरपेक्षता दृष्टी भारतीमध्ये आहे. स्वामी विवेकानंद यांचे समाज सुधारणेचे विचार त्यांना भावत होते. आत्मविश्वास ,जागरूकता , धर्म तत्वज्ञान आदर व समाज उन्नती असाही भाग त्यांच्यात आहे. बंकिमचंद्र चे वंदे मातरम चा आशय त्यांच्यात भिनलेला दिसतो. सिला पट्टीकरम हा त्यांचा प्रसिद्ध ग्रंथ आहे. सुदर्शन मित्र या तमिळ साप्ताहिकाचे संपादक होते. 
 खरे तर आजचा काळ या पुढे गेला असला तरी आजही आपण धर्म ,जात व अन्य चक्रव्युहात अडकलेलो आहोत. भारतीय संविधानाच्या आकांक्षा पूर्तीत या गोष्टी आलेल्या आहेतच उलट सार्वभौम , धर्मनिरपेक्ष ,समाजवादी ,स्वातंत्र्य ,समता ,बंधुता ,न्याय ,इत्यादी आधुनिक आणि उपयुकत मुल्ये स्वीकारून देखील आपल्या देशात संविधान लागू होऊन आज ७४ वर्षे झाली तरी देश एकात्म झालेला नाही. त्याची कारणे सर्वाना माहित आहेत. आजही समाज व्यवस्थेत सरंजामी मानसिकता आणि तिला शरण जाणारी प्रवृत्ती इथे घडवली जात आहे. पैसे देऊन मते विकत घेतली जात आहेत. धर्मांधता संविधान मानत नाही उलट धर्मांधता वर्ण व्यवस्था पोषक व सरंजामी मानसिकतेची समर्थक झाली आहे. आपले प्रांत भाषिक आधारावर वेगळे झालेत ती भांडणे अजुनं चालू आहेत. राजकारणी केवळ सत्तेसाठी राजकारण करीत असून लोकांना केवळ तुकडे देणे यासाठी काम करत आहेत. जनता सुद्न्य व्हावी असे आचरण आपण करीत नाही. चारित्र्याचे स्तोम निर्माण करणे आणि जनतेसाठी आम्ही काहीही करतो हे सांगणे सध्या सुरु आहे. गरिबी आणि भ्रष्टाचार आहे,लोकसंख्या आहे,  आर्थिक व सामाजिक विषमता आहे ,त्यामुळे द्वेष आहे. व्यक्तिपूजा आणि बुवाबाजी तर खूपच झाली आहे. इतर देशातल्या भाषा शिकण्याचे आपण बोलतो पण आपल्याच देशातल्या लोकांना परप्रांतीय म्हणून मारहाण होते. भाषिक अस्मिता या टोकाच्या झाल्या आहेत.  लोकशाही स्तरात आणि वर्गात वाटली आहे. भांडवलदार खाजगीकरण करून देशातील नेत्यांना देखील गुलाम करीत आहेत. आणि नेते सरकारी कंपन्या त्यांना विकत आहेत . अशावेळी आपण भारतीय भाषा उत्सव करीत आहोत ,पण आपण काय करायला हवे ? तर आपण आपल्या देशातील प्रमुख भाषेतील साहित्य भाषांतरीत करून एकमेकांचे साहित्य वाचले पाहिजे. एकमेकांच्या भाषा शिकल्या पाहिजेत . अंगणवाडी पासूनच आपल्या देशात विविधता आहे, आणि आपल्या देशाच्या अनेक भाषा आहेत. अनेक धर्म आहेत,त्याच्या भाषा आहेत . आपण एकमेकांच्या भाषेचा आदर करून एकमेकांना भाषा समजेल असे कार्यक्रम व उपक्रम सतत अधून मधून घ्यायला पाहिजेत. प्रत्येक वर्तमानपत्रात प्रत्येक भारतीय भाषेची माहिती , तिचे शब्दज्ञान प्रसारित केले पाहिजे .समाजमाध्यमात आवर्जून इतर भाषा शिक्षण व चालू ठेवले पाहिजे . छोटे छोटे भाषेचे अभ्यासक्रम आता देशातील सर्व विद्यापीठात लावले पाहिजेत. भारतीय विविध भाषेतले ग्रंथ वाचले पाहिजेत .पुस्तके दान करावीत. भाषा शिकण्याचे अप्स तयार केले पाहिजेत . दुर्मिळ भाषा जतन करण्यासाठी विशेष प्रकल्प सुरु करावेत, बोली भाषा जतन व संवर्धन करायला हवे .प्रत्येक भाषेतील ज्ञानपरंपरा व संस्कृती संदर्भ हे आपले विषय चर्चेत यावेत . विविध भाषांचा सहकार समन्वय करणे , भाषा व व्यक्ती यांची घृणा न करणे आवश्यक आहे. वाचन ,निबंध, कथाकथन , काव्य लेखन नाटक सादरीकरण,आपल्या प्रदेशात आलेल्या अन्य भाषिक बांधव यांचेशी भाषिक संवाद हे कार्यक्रम शाळा कॉलेज, विविध संस्थेत घेतले पाहिजेत. संस्कृती वैशिष्ट्ये समजून घेता आली पाहिजेत . इतर भाषेतील गाण्यावर नृत्य करणे,इतर भाषेतील गाणी गाणे, संगीत ऐकणे , इतर भाषिक बंधूंचे पेहराव करून भाषिक संवाद कार्यक्रम घेणे ,आकाशवाणी व दूर चित्रवाणी यावर दुभाश्याच्या मदतीने  एकमेकाच्या भाषेवर आधारित कार्यक्रम ठेवणे ,मुलांना इतर भारतीय भाषेतून बोलण्याचा नाद लावणे ,आपली तशीच दुसऱ्या देशी भाषेचा सन्मान करणे हेच आपले काम आहे. पुस्तक प्रदर्शन लावणे , अनुवाद कार्यशाळा घेणे , देशातील इतर राज्यातील माहितीपत आवर्जून पाहणे , संदेश प्रसार करणे ,भाषा मैत्री उपक्रम सुरु करणे या गोष्टी आता भारतीयांनी सुरु केल्या पाहिजेत. या देशाच्या नवीन शैक्षणिक धोरणात ही बहुभाषिक होण्याची गोष्ट आहेच . हिंदू ,मुस्लीम ,शीख ,इसाई भाई भाई है सारखी गीते आज कुठे वाजत नाहीत . देशाला केवळ हिटलरी राष्ट्र निर्माण करायचे नाही. सार्वभौम आपण आहोतच ,खरे दुखणे हे आहे की आम्हीच आमची घृणा करीत आहोत. त्यामुळे भाषेवरून घृणा न करता अशा कितीतरी भाषा शिकायची तयारी ठेवली पाहिजे . पण हे लक्षात ठेवून या भारतात बंघुभाव नित्य वसु दे ..बंधुभाव निर्माण करण्यासाठी आणि नीतिमान सुज्ञ नागरिक तयार करण्यासाठी आज माणसे तयार करण्याची गरज आहे. यंत्रे तुम्हाला सुखी करतील ,पण ती बंधुभाव निर्माण करतील असे वाटत नाही म्हणूनच माणसाने सम्यक दिशा कोणत्या याचे अवधान कायम ठेवावे .आज भारतीय भाषा उत्सव कसा करणार कळवा मला . भारतीय भाषा दिवस साजरा करणे म्हणजे आमच्या भारतीय बहुविध संस्कृतीचा गौरव आहे.
*प्रा.डॉ.सुभाष वाघमारे*
प्रभारी संचालक,भाषा मंडळ, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ,सातारा -                                     ९८९०७२६४४०
*संकलन*
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - ९५६११७४१११
close