श्रीरामपूर / प्रतिनिधी:
येथील रयत शिक्षण संस्थेचे डी डी काचोळे माध्यमिक विद्यालय श्रीरामपूर येथे आदरणीय मीनाताई जगधने मॅनेजिंग कौन्सिल सदस्या रयत शिक्षण संस्था सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली 'आनंद बाजार' या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते, थोर देणगीदार, माजी विद्यार्थी संघाचे उपाध्यक्ष श्री गणेश थोरात यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी विद्यालयाचे उपक्रमशील मुख्याध्यापक सुनील साळवे, पर्यवेक्षक बाळासाहेब रासकर सर हे उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना याप्रसंगी संबोधित करताना विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील साळवे म्हणाले की, विद्यार्थ्यांना समाजाची ओळख ही खरी बाजारातूनच होत असते. दुकान कोणत्या मालाची लावावी, तो किती खरेदी करावा म्हणजे तेवढा बाजारात विकला जाईल, त्याचे दर कसे निश्चित करावे, त्याचबरोबर ग्राहकांबरोबर व्यवहार कसा करावा, गणिती क्रिया, माणसांची ओळख, स्वभाव, शेवटी नफा झाला की तोटा होतो व तो किती, व पुढच्या वर्षी आलेल्या अनुभवातून आपल्याला नवीन काय करता येईल इथपर्यंत विद्यार्थी विचार करतात. हे विद्यार्थ्यांना आनंद बाजार या संकल्पनेतून समजते.
विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे स्टॉल्स आनंद बाजार मध्ये लावले. त्याचबरोबर खाद्यपदार्थ स्टॉल, भाजीपाला स्टॉल, फळ विक्री, चायनीज पदार्थ, चहा, नाश्त्याचे पदार्थ, पेय, सँडविच, भेळ चिप्स, मेकअपचे साहित्य, पतंग, विविध खेळण्या यासारखे अनेक स्टॉल्स आनंद बाजारात उपलब्ध होते.
सर्व विद्यार्थी, पालक, माजी विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यालयावर प्रेम करणारे अनेक नागरिक यांनी आनंद बाजारचा आनंद लुटला. विद्यार्थ्यांना यातून प्रत्यक्ष व्यवहाराचा अनुभव मिळाला विद्यार्थ्यांचा उत्साह आनंद ओसंडून वाहत होता.
आनंद बाजार या उपक्रमाचे कौतुक करताना पालकांनी विद्यालयाचे कौतुक तर केलेच मात्र विद्यार्थ्यांना यातून जीवनाचा प्रत्यक्ष आनंद मिळाला तसेच व्यवहारात ज्ञान मिळाले. असे उपक्रम विद्यालयांमध्ये आयोजित केले जातात ही विद्यार्थ्यांसाठी ज्ञानप्राप्तीची पर्वणीच आहे अशा शब्दात आपल्या प्रतिक्रिया व समाधान व्यक्त केले.
*संकलन
समता मीडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर
बा./जा.संपर्क क्र. 9561174111