shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

प्रशिक्षकाचा लाडका खेळाडू बसवला संघाबाहेर



             भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना ब्रिस्बेनमधील गाबा येथे खेळवला जात आहे.  या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.  भारतीय कर्णधाराने अकरा जाणांच्या संघात दोन बदल केले आहेत.  रविचंद्रन अश्विन आणि हर्षित राणा यांना प्लेइंग -११ मधून वगळण्यात आले, तर  त्यांच्या जागी रविंद्र जडेजा आणि आकाशदीप यांचा समावेश करण्यात आला आहे.  या मालिकेतून हर्षितने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.  मात्र, अवघ्या दोन सामन्यानंतर संघातून त्याला बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला आणि बेंचवर बसावे लागले.  मुळात त्याला संघात घेण्यावरुन बरेच विवाद झाले होते, मात्र प्रशिक्षक गौतम गंभीरच्या खास मर्जीमुळे त्याला कुठलाही आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव नसताना थेट ऑस्ट्रेलियाविरूध्द कांगारू भूमित पदार्पणाची संधी मिळाली. एवढंच नव्हे तर भारतात रणजी स्पर्धा, मुश्ताक अली स्पर्धेत आपल्या गोलंदाजीने प्रभावीत करणाऱ्या मोहम्मद शमीसारख्या अनुभवी व मॅचविनर गोलंदाजांस तथाकथीत दुखापतीच्या नावाखाली डावलण्यात आले. अशी सर्वत्र चर्चा सुरू आहे. आपणास ठाऊक आहेच की, सन २०२३ च्या वनडे वर्ल्ड कपमध्ये सुरुवातीला डावलल्यानंतर शमीमुळेच भारत अंतिम फेरी खेळू शकला होता.

             वास्तविक, ही मालिका सुरू होण्यापूर्वी हर्षित मागील काही मालिकांमध्येही भारतीय संघाचा भाग होता.  गौतम गंभीर प्रशिक्षक झाल्यानंतर हर्षितला संधी देण्यात आली. हर्षित आयपीएल मधील कोलकाता नाइट रायडर्स संघाचा भाग होता आणि २०२४ मध्ये चॅम्पियन बनलेल्या संघात त्याचा समावेश होता.  गंभीर हा केकेआर संघाचा मार्गदर्शक होता. अशा स्थितीत हर्षितला गंभीरचा आवडता खेळाडू म्हटले जात होते. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी त्याची निवड झाल्यावर चाहते आणि क्रिकेट पंडितांमध्ये दोन मतप्रवाह होती.  काहींचं असं मानणं होता की हर्षित हा उंच आणि  वेगवान गोलंदाज आहे आणि तो ऑस्ट्रेलियात उपयुक्त ठरू शकतो.  त्याचवेळी हर्षितचा कसोटीत समावेश करणे घाईचे असल्याचे काहींचे मत होते.  खालच्या फळीतील फलंदाजीच्या क्षमतेमुळे हर्षितचा संघात समावेश करण्यात आला.

             मात्र, हर्षित पहिल्या कसोटीत किंवा दुसऱ्या कसोटीतही विशेष काही करू शकला नाही.  गोलंदाजी किंवा फलंदाजीतही हर्षितची प्रतिभा दिसून आली नाही.  ॲडलेडमध्ये गोलंदाजांना मदत करणाऱ्या खेळपट्टीवर हर्षितने मर्यादा ओलांडल्या होत्या.  त्याला स्वतःला सिध्द करण्याची वेगवान गोलंदाज धार्दिण्या खेळपट्टयांवर संधी मिळाली. मात्र तिचे त्याला सोने करता आले नाही. हर्षितने ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात गोलंदाजी केली आणि ५.४०  च्या इकॉनॉमी रेटने १६ षटकात ८६ धावा दिल्या व त्याला एकही विकेट मिळाली नाही.  या खेळपट्टीवर बुमराह आणि सिराजने प्रत्येकी चार विकेट घेतल्या.  ट्रॅव्हिस हेडने हर्षितला बेदम चोपलं .  फलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर, हर्षित दुसऱ्या डावात चेंडूत १२ चेंडूत एकही धाव करू शकला नाही.  दोन्ही डावात तो खाते न उघडताच बाद झाला.

             त्याच्या पदार्पणाच्या कसोटीत म्हणजेच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पर्थमधील मालिकेतील पहिल्या सामन्यात हर्षित इतर भारतीय गोलंदाजांमध्ये सर्वात महागडा ठरला.  त्याने पहिल्या डावात १५.२ षटकात ४८ धावांत तीन विकेट घेतल्या, परंतु त्याचा इकॉनॉमी रेट ३.१० होता.  या इनिंगमध्ये बुमराहचा इकॉनॉमी रेट १.७० सिराजचा १.५०, नितीश रेड्डीचा १.३० आणि सुंदरचा इकॉनॉमी ०.५० होता.  तर दुसऱ्या डावात हर्षितने १३.४ षटकात ६९ धावा देत एक बळी घेतला.  त्याचा इकॉनॉमी रेट ५.००  होता.  दुसऱ्या डावात बुमराह ३.५०, सिराज ३.६० आणि सुंदरने ३.२० च्या इकॉनॉमी रेटने धावा दिल्या.

               पर्थ कसोटीतही राणाला फलंदाजीत विशेष काही करता आले नाही.  त्याने पहिल्या डावात पाच चेंडूत सात धावा केल्या होत्या.  अशा परिस्थितीत त्याला संघातील मधील आपले स्थान गमवावे लागले आणि कारकिर्दीतील सर्व कसोट्यांमध्ये सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या आकाशदीपला संधी देण्यात आली.  आकाशने आतापर्यंत पाच कसोटीत दहा बळी घेतले आहेत.  एवढेच नाही तर फलंदाजी मजबूत करण्यासाठी अश्विनच्या जागी जडेजाला संधी देण्यात आली. इतका सारा नाठाळ खेळाडू संघावर ओझं ठरत असताना कसोटी शमी व आकाशला संघाबाहेर राहावे लागले. अन्यथा डे नाईट कसोटीत झालेला भारताचा मानहानीकारक पराभव झाला नसता. कधी कधी संघहिता पेक्षा व्यक्तिगत हितसंबंध जास्तच जपले जाते. यामुळे संघाचे नुकसान होत असते. गौतम गंभीरच्या या हर्षित राणाच्या अघोरी प्रेमापायी  मात्र भारताची डब्ल्यूटीसी फायनल संकटात आली आहे. 

              मायदेशात न्युझिलंडविरुध्द तीन सामने व ॲडलेडमधील पराभवासाठी कर्णधार रोहित शर्माला जबाबदार धरून खलनायक बनवले जात आहे. मात्र त्याच्या इतकाच किंवा त्याही पेक्षा जास्त निर्णय प्रक्रियेत सक्रीय असलेला गौतम गंभीरच या पराभवांना व सध्या उदभवलेल्या परिस्थितीला  जबाबदार आहे.

लेखक : - 
डॉ.दत्ता विघावे                        
क्रिकेट समिक्षक 
मो. क्रं - ९०९६३७२०८२
close