अहिल्यानगर / प्रतिनिधी:
कर्मवीरांच्या त्यागातून उभी राहिलेल्या रयत शिक्षण संस्थेने समाजाला आधार दिला. बहुजन समाजातील मुले सुशिक्षित होऊन त्यांची प्रगती साधली गेली. कर्मवीर भाऊराव व लक्ष्मीबाई यांच्या त्यागाची जाणीव ठेऊन संस्थेतील प्रत्येक शिक्षक योगदान देत आहेत, असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य दादाभाऊ कळमकर केले.
कळमकर पुढे म्हणाले, जन्म आपल्या हातात नाही, पण जिद्द व परिश्रमाने यश मिळवून परिस्थिती बदलणे आपल्या हातात असल्याचा संदेश त्यांनी दिला. तर या शाळेतील विद्यार्थ्यांना पुढील काळात स्वच्छ व फिल्टरचे पाणी उपलब्ध करुन देण्याचे त्यांनी आश्वासन दिले.
भिंगार येथील रयत शिक्षण संस्थेचे श्रीमती ॲबट मायादेवी गुरुदित्ताशाह हायस्कूल, ज्यूनियर आर्ट्स कॉलेज व विश्वशंकर प्राथमिक विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले.
या स्नेहसंमेलनात विविधतेने नटलेल्या भारतीय संस्कृती व परंपरेचे दर्शन घडविण्यात आले. विद्यार्थ्यांनी एकापेक्षा एक सरस सांस्कृतिक कार्यक्रम सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. उपस्थित प्रेक्षक व पालकांनी त्यांना टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.
स्नेहसंमेलनाचे उद्घाटन सिने कलाकार मोहनीराज गटणे यांच्या हस्ते झाले. रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य दादाभाऊ कळमकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मराठी पत्रकार परिषदेचे राज्य कोषाध्यक्ष मन्सूरभाई शेख, परिषदेचे राज्य प्रसिद्धीप्रमुख संदीप कुलकर्णी, स्वामी विवेकानंद ट्रस्टचे अध्यक्ष प्रमोद मुळे, बांधकाम व्यावसायिक विजय बेरड, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य ज्ञानदेव पांडुळे, सोमनाथ धाडगे, प्राचार्य तथा उत्तर विभागीय अधिकारी प्रमोद तोरणे, मुख्याध्यापक नारायण अनभुले, सुनील नरवडे, गोरक्षनाथ वामन, पर्यवेक्षक संपत मुठे आदींसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रारंभी ढोल पथकाच्या निनादात फुलांच्या वर्षावाने पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. दीपप्रज्वलन व नटराज पूजनाने स्नेहसंमेलनाचे उद्घाटन झाले. प्रास्ताविकात प्राचार्य प्रमोद तोरणे यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व पाठीवरती शाबासकीची थाप देण्यासाठी स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण दरवर्षी केले जात असल्याचे स्पष्ट करुन विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात मिळवलेल्या यशाचे अहवाल वाचन केले.
मोहनीराज गटणे म्हणाले की, कला जीवनात सन्मान मिळवून देते. प्रत्येकाने एखादा कलेचा छंद जोपासावा ही कला पुढे जीवनात आनंद निर्माण करते. यशाला शॉर्टकट नाही, प्रत्येकाने कठोर मेहनत घेऊन ध्येय साधण्याचे त्यांनी सांगितले. तर स्वतःच्या जीवनाचा प्रेरणादायी वाटचाल त्यांनी विद्यार्थ्यांना सांगून एखाद्याच्या चांगल्या कृती जीवनात आत्मसात करण्याचे त्यांनी सांगितले.
संदीप कुलकर्णी म्हणाले की, आशिया खंडातील सर्वात मोठी शैक्षणिक संस्था म्हणून रयत नावारुपास आली आहे. बहुजनांची मुली शिक्षण घेऊन आपले भवितव्य घडवीत आहे. कमवा व शिका ही स्वालंबी शिक्षणाची मुहुर्तमेढ कर्मवीर अण्णांनी रुजवली. ही शिक्षण पध्दत आजच्या विद्यार्थ्यांना प्रेरणादायी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रमोद मुळे यांनी जिद्द, सातत्य व संयमाने जीवनातील ध्येय साध्य करण्याचे सांगितले.
विद्यार्थ्यांनी भक्तीगीतांसह सांस्कृतिक कार्यक्रमातून भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविले. गणेश वंदनेने सांस्कृतिक कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. आंम्ही शिवकन्या..., कोळी नृत्य..., माय भवानी..., भारुड गीतांमधून महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडविले. साऊथ इडियन थीमचे बहारदार सादरीकरण करण्यात आले. तसेच देवीच्या गीतांमधून वातावरण भक्तीमय बनले होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमावर सादर करण्यात आलेल्या युगत मांडली... व शिवबा माझा मल्हारी... या गीतांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह संचारला होता. शिवाजी महाराजांच्या जय घोषाने परिसर दुमदुमले. पारंपारिक लोकगीतांनी उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकांक्षा पडदुणे व माधव रेवगडे यांनी केले. आभार पर्यवेक्षक संपत मुठे यांनी मानले.
*वृत्त विशेष सहयोग
ज्येष्ठ पत्रकार जी.एन.शेख, अहमदनगर
*वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111