shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

नागपूर येथील राजभवन च्या लॉनवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार समारंभ संपन्न

नागपूर:--
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळात ३९ मंत्री असतील, हे आता निश्चित झालं आहे.

मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांच्या शपथविधीनंतर दोन आठवडे होत आले, तरी मंत्रिमंडळाचा विस्तार होत नसल्यानं महायुतीत खातेवाटपावरून नाराजी आहे का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. मात्र, अखेरीस नागपूरमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या आधी मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळाला.

नागपूरमधील राजभवनाच्या लॉनवर मंत्रिमंडळ विस्ताराचा सोहळा पार पडला. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी नव्या मंत्र्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली.

*कुणाच्या वाट्याला किती मंत्रिपदं?

देवेंद्र फडणवीस यांच्या रुपाने भाजपकडे मुख्यमंत्रिपद, तर अजित पवार (राष्ट्रवादी काँग्रेस) आणि एकनाथ शिंदे (शिवसेना) हे उपमुख्यमंत्री आहेत.

*भाजप - 19
*शिवसेना (एकनाथ शिंदे गट) - 11*
*राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) - 9*

देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात दोन उपमुख्यमंत्र्यांसह एकूण ३९ मंत्री असतील. यातील पक्षनिहाय मंत्रिपदं कुणाला मिळाली, हे आपण पाहूया.

*भाजपचे मंत्रिमंडळातील नवे मंत्री
महाराष्ट्रात भाजपच्या वाट्याला मुख्यमंत्रिपद आलं असून, देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आहेत. तसंच, १६ कॅबिनेट आणि ३ राज्यमंत्रिपदंही भाजपच्या वाट्याला आले आहेत.

भाजपनं तीन महिला नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान दिलं आहे.

*कॅबिनेट मंत्री :

१) चंद्रशेखर बावनकुळे
२) राधाकृष्ण विखे पाटील
३) चंद्रकांत पाटील
४) गिरीश महाजन
५) अतुल सावे
६) गणेश नाईक
७) मंगलप्रभात लोढा
८) शिवेंद्रराजे भोसले
९) जयकुमार रावल
१०) पंकजा मुंडे
११) आशिष शेलार
१२) अशोक उईके
१३) जयकुमार गोरे
१४) संजय सावकारे
१५) नितेश राणे
१६) आकाश फुंडकर

*राज्यमंत्री :

१७) माधुरी मिसाळ
१८) मेघना बोर्डीकर
१९) पंकज भोईर

*शिवसेनेचे (शिंदे गट):- मंत्रिमंडळातील नवे मंत्री
शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री झाले असून, त्यांच्या पक्षाला ९ कॅबिनेट आणि २ राज्यमंत्रिपदं मिळाली आहेत.
तानाजी सावंत, दीपक केसरकर अशा नेत्यांना एकनाथ शिंदेंनी डच्चू दिलाय.

*कॅबिनेट मंत्री :

१) शंभुराज देसाई
२) उदय सामंत
३) दादा भुसे
४) गुलाबराव पाटील
५) संजय राठोड
६) संजय शिरसाट
७) प्रताप सरनाईक
८) भरत गोगावले
९) प्रकाश आबिटकर

*राज्यमंत्री :

१०) आशिष जयस्वाल
११) योगेश कदम

*राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट): 
मंत्रिमंडळातील नवे मंत्री
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ८ कॅबिनेट, तर एक राज्यमंत्रिपद मिळालं आहे.

छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील अशा दिग्गजांना अजित पवारांनी डच्चू दिल्याचं दिसून येत आहे.

*कॅबिनेट मंत्री :
१) हसन मुश्रीफ
२) आदिती तटकरे
३) बाबासाहेब पाटील
४) दत्तात्रय भरणे
५) नरहरी झिरवळ
६) माणिकराव कोकाटे
७) मकरंद जाधव-पाटील
८) धनंजय मुंडे

*राज्यमंत्री :

९) इंद्रनील नाईक

महायुतीला स्पष्ट बहुमत
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपप्रणित महायुतीला प्रचंड बहुमत (२३७ जागा) मिळालं. भाजपला १३२ एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला ५७, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ४१ जागा मिळाल्या. तसंच, काही अपक्षांनीही महायुतीला पाठिंबा दिला आहे.

गेल्या काही दशकांत भाजपप्रमाणे एखाद्या पक्षाला किंवा महायुतीप्रमाणे एखाद्या युतीला पहिल्यांदाच इतके प्रचंड बहुमत मिळाले. त्यामुळे महायुतीचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला होता. मात्र, तरीही मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी होण्यासाठी आठवडा उलटून गेला होता. यासाठी एकनाथ शिंदे यांची नाराजी कारणीभूत असल्याचं म्हटलं गेलं. मात्र, अखेरीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मुंबईतील आझाद मैदानात शपथविधी पार पडला.

या शपथविधीनंतर मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त सापडत नव्हता. दोन आठवडे व्हायला आले आणि हिवाळी अधिवेशन जवळ आलं, तरी मंत्रिमंडळ विस्ताराचा पत्ता नव्हता. मात्र, अखेरीस १५ डिसेंबरची तारीख जाहीर झाली आणि मंत्रिमंडळ विस्तार पार पडला.

close