निसर्ग हा मानवाचा जीवनपूरक आणि जिव्हाळ्याचा घटक. माणूस निसर्गाकडून किती घेतो आणि किती देतो याची चांगली जाणीव आपणा सर्वांना आहे. जगभरातनं असंख्य देश निसर्ग आणि पर्यावरणाकडे जीवनाचा आणि जगण्याचा अविभाज्य घटक म्हणून पाहतात, म्हणून तेथील हवा, पाणी, जमीन, जंगले, नद्या ही विनाप्रदूषित असतात. पैशापेक्षा हीच खरी त्यांची श्रीमंती आहे. परदेशातील ही माणसे निसर्गाबरोबर जगतात. तो आपला सखा आहे, ही त्यांची निर्मळ आणि शुद्ध सात्विक भावना असते. आपण निसर्गात जगतो. जणू निसर्ग ही आपली उपभोग्य वस्तूच असे आपण मानतो. सातत्याने पर्यावरण आणि निसर्गाला हानी पोहोचविणाऱ्या या माणसाला वेळोवेळी आपली निसर्ग विरोधीभावना आणि कृत्याची जाणीव करून देणे भाग पडते. सर्वत्र विविध विषयांवर संशोधने, संमेलने, मेळावे, कार्यशाळा, परिसंवाद होतात; परंतु पर्यावरण हा विषय फार क्वचित असतो.
जगभरातून बोटावर मोजण्याइतपत संशोधन पर्यावरण आणि निसर्गावर होते. यापैकी जे कोणी पुढे येऊन संशोधन करून सांगतात, त्यांचं ऐकते कोण? जनमाणसांचे सरकार हे पाहून हातावर हात आणि तोंडावर बोट ठेवून असते. मग ही पर्यावरण आणि निसर्ग वाचविण्याची जबाबदारी कुणाची? या प्रश्नाचे उत्तर निरुत्तरीत राहते. मग पर्यावरण आणि निसर्ग वाचविण्यासाठी फिनिक्स पक्षाप्रमाणे एखादा जन्म घेतो. असेच एक श्रीगोंद्याच्या सुगंधी मातीत जन्माला आलेले व्यक्तिमत्व. स्व. आबासाहेब मोरे हे राखेतून जन्म घेणाऱ्या फिनिक्स प्रमाणे एक. पद्मभूषण डॉ. अण्णासाहेब हजारे यांच्या मार्गदर्शन आणि प्रेरणेने पर्यावरण आणि निसर्ग संवर्धनासाठी सुरेगावसारख्या एका छोट्या खेड्यातून या जाणिवेची निर्मिती होते. निसर्ग आणि सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या मूर्तीमंत रूपाने ती साकारते. स्व. आबा हे या मंडळाचे संस्थापक शिल्पकार. आबांच्यानंतर तेवढ्याच जोमाने या संस्थेचे कार्य त्यांचे पुतणे प्रमोददादा मोरे पुढे नेत आहेत. आज ही पर्यावरण चळवळ राज्याच्या कानाकोपऱ्यात हजारोपर्यंत जाऊन पोहोचली आहे. या मंडळाच्यावतीने वर्षभरात वृक्ष लागवड व वृक्षसंवर्धन, वृक्षवाटप, पक्षी वाचविण्यासाठी मातीच्या भांड्यांचे वाटप, निसर्ग व पर्यावरण जनजागृती आणि एक वार्षिक राज्यस्तरीय पर्यावरण संमेलनाचे आयोजन केले जाते.
देवाची आळंदी हे ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीचे गाव, आळंदी ही ज्ञानवंतांची भूमी. याच भूमीत रविवार, दि. २९ डिसेंबर २०२४ रोजी निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या वतीने नुकतेच एकदिवशीय राज्यस्तरीय आठवे पर्यावरण संमेलन संपन्न झाले. एका बाजूला संमेलनाची संपन्नता खूपच भावणारी, तर दुसरीकडे आळंदीच्या या भूमीवरील अस्वच्छता आणि इंद्रायणीच्या नरकयातना तेवढ्याच कलेशदायक अशा. हजारो, लाखो हात आणि मने एकत्र येऊन आळंदीच्या इंद्रायणीचे पावित्र जपण्याची गरज आज निर्माण झाली आहे. देवाच्या आळंदीतून ज्ञानवंत घडविण्याची परंपरा शेकडो वर्षांची आहे. आळंदीच्या पवित्रभूमीत ज्ञानेश्वरांपासून आजतागायत असंख्य ज्ञानयोगी तयार झाली. या तत्कालीन महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला या ज्ञानयोगियांच्या विचारवाणीने नेहमीच शहाणे आणि समृद्ध केले आहे; परंतु याच भूमीत प्रकटलेले हे ज्ञानयोगियांचे विचार हरवले कुठे? याचा शोध घेण्याची गरज आज निर्माण झाली आहे. या ज्ञानदानाच्या पवित्र कामासाठी आळंदीत अनेक मठ, आश्रमशाळा, वारकरी शाळा उभ्या राहिल्या. त्यांना शंभरपेक्षा अधिक वर्षांची परंपरा आहे. वै. मामासाहेब दांडेकर पुण्याच्या एस. पी. कॉलेजातून त्यावेळी प्राध्यापकांची नोकरी सोडून केवळ अध्यात्माच्या या ज्ञानदानाच्या कामात येऊन उभी हयातभर कार्यरत राहिले. आजचे हे आठवे पर्यावरण संमेलन देविदास आश्रमशाळा तथा वै. मामासाहेब दांडेकर स्मृती सभागृहामध्ये संपन्न झाले. हा देखील हे संमेलन आयोजन करण्याचा योगायोगच. सुंदर सुंदर पर्यावरणीय रांगोळ्यांनी वातावरण निर्मितीबरोबर सर्वांचीच मने जिंकून घेतली. सातारा जिल्ह्यातील पर्यावरणप्रेमींनी विविध रानमेवायुक्त भाज्या आणि फळे यांच्या माहितीची लावलेली पोस्टर्स, पुस्तक प्रदर्शनी आदी आकर्षित करणारी होती. सभागृहात प्रवेश करताच पर्यावरणप्रेमींसाठीची नोंदणी आणि भेटवस्तू मनमोहीत करणारे असे. सभागृहातील स्टेज आणि भव्य सजावट मनाला भावणारी. पर्यावरण व इतर विषयांवरील पर्यावरणप्रेमींचा संवाद माहितीत भर पाडणारा असा.
आज या आठव्या राज्यस्तरीय संमेलनाचे उदघाटन आळंदी देवस्थानचे विश्वस्त ॲड. राजेंद्र उमाप, ज्येष्ठ शास्त्रज्ञ प्रमोद मोघे, देविदास आश्रमशाळेचे प्रमुख ह. भ. प. निरंजनशास्त्री कोठेकर, मंडळाचे अध्यक्ष प्रमोददादा मोरे, इंद्रायणी बचाव समितीचे विठ्ठल शिंदे, ॲड. लक्ष्मण येळे, मनपाचे माजी आरोग्य अधिकारी प्रभाकर तावरे, कार्याध्यक्ष छायाताई राजपूत, प्रभाकर म्हस्के, विलास महाडिक,लतिकाताई पवार आदी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलाने झाले. धीरज वाटेकर यांचा आपल्या प्रास्ताविकपर मनोगतातून मंडळाच्या स्थापनेपासून तर आजतागायतचा लेखाजोखा आपल्या मधुरवाणीतून ज्ञान आणि माहितीत भर पाडणार होता. संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ शास्त्रज्ञ श्रीधर दत्तात्रय महाजन प्रकृती स्वास्थमुळे उपस्थित राहू शकले नाही. तसे त्यांचे आजचे वय ९३ वर्षांचे. त्यांच्या कार्यप्रणालीतील उत्साह मात्र आजही खूपच दांडगा असा. त्यांचे परखड आणि खडेबोल आवाजातील निसर्ग व पर्यावरणविषयक मनोगत यावेळी व्हिडिओच्या माध्यमातून संमेलनप्रसंगी सादर केले. त्यांच्या भाषणातून आणि विचारातून आजच्या पर्यावरणीय स्थितीची जाणीव होते. ते आपल्या भाषणात सांगतात की, पृथ्वीवर पर्यावरणाची अवस्था अत्यंत वाईट होत चालली आहे.
पर्यावरण वाचवण्यासाठी सर्वांनीच पुढे येऊन काम करायला हवे. आपल्याकडे वृक्ष लागवड खूपच आवश्यक असून पर्यावरण वाचवण्यासाठी शिक्षकांनी शास्त्रोक्त ज्ञान अवगत करून सर्वांपर्यंत पोहोचविणारा पर्यावरण दूत होणे आवश्यक आहे. जंगले ही हजारो वर्षांच्या एकत्रित पर्यावरणाच्या परिणामांचा भाग असते. ती काही वेळात तोडता येतात; पण लगेच निर्माण करता येत नाही. पर्यावरण आणि निसर्ग संवर्धनाप्रती निसर्ग व पर्यावरण मंडळाचे कार्य कौतुकास्पद आहे. संमेलनाचे उदघाटनपर मनोगतातून आळंदी देवस्थानचे विश्वस्त ॲड. राजेंद्र उमाप यांनी सांगितले की, मानवनिर्मित जंगलांची वृद्धी, तापमान वाढ आणि हवामान बदल देशाला आव्हानात्मक आहे. पर्यावरण वाचवणे ही काळाची गरज असून शिक्षकांनी पुढाकार घेऊन निसर्ग व पर्यावरण संस्थेच्या माध्यमातून पर्यावरण वाचविले जावे, असे मत त्यांनी मांडले. निसर्ग व पर्यावरण मंडळाचे अध्यक्ष प्रमोददादा मोरे यांनी आपल्या मनोगतातून पर्यावरण चळवळ सार्वत्रिक व्हावी आणि हजारो तरुणांनी यात एकत्र येऊन कार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. संमेलनाचे प्रमुख व्याख्याते ज्येष्ठ शास्त्रज्ञ प्रमोद मोघे यांचे 'एक कप चहाचे प्रदूषण' या विषयावर व्याख्यान झाले. चहासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक घटकाचा पर्यावरणाचा ऱ्हास करण्यामध्ये कसा वाटा आहे, याचे त्यांनी सविस्तर विश्लेषण केले. बदलत्या मानवी जीवन जगण्याच्या पद्धतीमुळे सकाळी उठल्यावर दात घासण्यापासून ते रात्री एसी, गुडनाईट लावून झोपण्यापर्यंत आपणाकडून कसे प्रदूषण होते, याविषयी त्यांनी नेत्रांजन दिले. यासाठी मानवी पारंपरिक जीवनशैली जगण्याची आवश्यकता आहे, ही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. विचारवंतांच्या विचारशीलतेतून आणि मधुरवाणीतील ही अनोखी मेजवानी पर्यावरणप्रेमीच्या विचारात लख्ख प्रकाश पाडणारी होती.
निसर्ग आणि पर्यावरण मंडळाच्यावतीने राज्यातील असंख्य जिल्ह्यात सातत्याने पर्यावरण व वृक्षसंवर्धनाचे उपक्रम सुरू असतात. अशा काही निवडक जिल्हा, गटांचा व व्यक्तिगत कार्य करणाऱ्या पर्यावरणप्रेमींचा झालेल्या सन्मान त्यांना पुढील कार्यासाठी प्रेरणा आणि ऊर्जा देणारा असतो. सातारा जिल्हा गट, आंबीखालसा ग्रामस्थांचे पर्यावरण कार्य, व्ही. व्ही. पोपरे यांना मिळालेला आदर्श शिक्षक सन्मान, कराड येथील दादासाहेब उडाळकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय या शाळेला मिळालेला आदर्श शाळेचा सन्मान या निमित्ताने पर्यवेक्षक माळी यांचा सन्मान, अबितखिंड येथील पर्यावरणाचे उपक्रम व मंडळाच्या पहिल्या शाखेचे उद्घाटन, पर्यावरण या विषयावर पीएच.डी करणाऱ्या आवटी दांपत्य आणि संमेलनाच्या यशस्वीतेसाठी सचिव वनश्रीताई मोरे-गुणवरे, जिल्हाध्यक्ष मारुती कदम, कार्याध्यक्ष संतोष परदेशी, मुख्याध्यापक आबा जाधव, चंद्रकांत भोजने, संजय गायकवाड, विनीत भोसले, सुरज टकले , दिगंबर पुराणे,आदींचा सन्मान कार्याला उभारी देणारा असाच. गोड स्वादिष्ट भोजन संमेलनाच्या उंचीत भर घालणारे असे. या संमेलनात नंदुरबार, धुळे, जळगाव, सातारा, रायगड, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, पुणे, ठाणे, मुंबई आदी २५ पेक्षा अधिक जिल्ह्यातील पर्यावरणप्रेमीची उपस्थिती होती. यामध्ये महिलांचा उत्साह आणि संख्या अग्रगण्य होती हे विशेष.
दुपारच्या सत्रातील आळंदीच्या भूमितील सिद्धबेट येथील पर्यावरणप्रेमीची क्षेत्रभेट दोन टप्प्यांवर होती. एक टप्पा श्रद्धाळू मनाचा आणि दुसरा टप्पा इंद्रायणीच्या नरकयत्नांचा. प्रभाकर लावरे यांचे बालपण याच मातीतले, आळंदीतले. माऊलींच्या सिद्धबेट परिसरात त्यांनी ज्ञानार्जनाची धडे घेतली. त्यामुळे त्यांच्या अनुभववाणीने, माहितीने सर्वांच्या ज्ञानात उत्तम भर पडली. पत्रकार निसर्गप्रेमी विठ्ठल शिंदे यांचे इंद्रायणी बचावाचे कार्य, पर्यावरणप्रेमीच्या छोट्या व्हिडिओच्या क्लिप्स या कार्याची महती वाढविणाऱ्या आहेत. ज्ञानेश्वर माऊली व भावंडांनी ज्ञानार्जन आणि पवित्र ज्ञानदानाचे कार्य याच इंद्रायणीच्या काठावर केले. इंद्रायणीची आजची अवस्था पाहिल्यावर काळजात क्रंदन निर्माण होते. माउलीच्या काळातील इंद्रायणी आणि आजची इंद्रायणी यात जमीन आसमनापलीकडचे अंतर जाणवते. आज इंद्रायणी रसायनयुक्त फेसाळलेल्या पाण्याने वाहते हे पाहताना मन खिन्न होते. आज इंद्रायणी सिमेंटच्या जंगलातून आणि उद्योगाच्या सानिध्यातून वाहते. तिचे तत्कालीन शुद्धपण आज पूर्णपणे हरपले आहे. ज्या नद्यांच्या काठावर माऊलींनी आपले वास्तव्य केले त्यात गोदावरी, चंद्रभागा, प्रवरा व इंद्रायणी या नद्या आहेत. यापैकी इंद्रायणीची नरकयातना पाहून मानवी ऱ्हास आता फार दूर नाही, असे वाटू लागते. पर्यावरणप्रेमींची श्रद्धाळू मनाने सिद्धबेटावरील ही सफर अध्यात्माची पराकोटीची उंची गाठणारी तर दुसरीकडे या श्रद्धेला आणि पावित्र्याला प्रदूषणाने घातलेला विळखा गंभीर विचार करायला लावणारा आहे. इंद्रायणीची ही स्थिती आणि मनाची खिन्नता पर्यावरणप्रेमींच्या समोर आव्हानांचा मोठा डोंगर उभी करणारी आहे. अध्यक्ष प्रमोददादा मोरे यांची पर्यावरणाप्रतीची जीवननिष्ठा, कमी कालावधीत उत्कृष्ट असे केलेले संमेलनाचे नियोजन कौतुकास्पद आहे. अनेक पर्यावरणप्रेमींचे असंख्य उपक्रम आहेत; परंतु सर्वांनाच व्यक्त होण्यासाठी या संमेलनाचा वेळ तसा खूपच कमी होता. यासाठी हे संमेलन द्विदिवशीय असायला हवे असे वाटते. हे संमेलन मात्र गर्दीपेक्षा दर्दींसाठी होते, हे खरे. सर्वांना पुढील कार्यासाठी सर्वांना शुभकामना.
डॉ. शरद दुधाट,
राज्यसंघटक, निसर्ग व पर्यावरण मंडळ
प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111