shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

गाबा कसोटी वरूण देवतेच्या नावे ; मालिका अद्यापही बरोबरीतच



              बुधवारी १८ डिसेंबर २०२४ रोजी ब्रिस्बेनमधील गाबा येथे सुरू असलेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसऱ्या कसोटी सामन्याचा शेवटच्या दिवशी खेळात मोठी रंगत आणली. खेळ मजेदार अवस्थेत पोहचला असताना ५४ षटकात २७५ धावांचे विजयी लक्ष गाठताना २.१ षटकांचा खेळ झाला असता पुन्हा पावसाने मैदानाचा ताबा घेतला आणि खेळात व्यत्यय आणला. त्यावेळी भारताच्या आठ धावा फलकावर लागल्या होत्या आणि दोन्ही सलामीवीर राहुल व जयस्वाल यशस्वीरित्या तंबूकडे नाबाद परतले. तत्पूर्वी कांगारूंचा दुसरा डाव ७ बाद ८९ धावांवर भारताने नियंत्रित ठेवला, पण त्याच धावसंख्येवर कर्णधार कमिन्सने डाव घोषित करून पहिल्या डावातील १८५ धावांचे अधिक्य धरून भारतासमोर पावणे तिनशे धावांचे लक्ष्य ठेवले. भारताकडून आकाशदीप व मोहम्मद सिराजने प्रत्येकी दोन तर भारतीय गोलंदाजीचा महामेरू जसप्रित बुमराहाने १८ धावात तीन बळी घेतले. एकंदर या सामन्यात त्याने ९ गडी बाद करत दोन्ही संघाकडून सर्वाधीक २१ बळी घेत मालिकेतला यशस्वी गोलंदाज बनला आहे. अखेर वरूण राजाच्या अवकृपेमुळे खेळ पुन्हा होऊ न शकल्याने सामना अनिर्णितावस्थेत संपला.

                सामन्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत दोन्ही संघांचे पहिले डावही पूर्ण झाले नव्हते. पाचव्या दिवशी सकाळी भारतीय संघाचा पहिला डाव २६० धावांवर आटोपला.  या कसोटीचे पहिले तीन दिवस बॅकफूटवर असलेल्या टीम इंडियाने चौथ्या दिवशी आकाशदीप आणि बुमराहच्या सनसनाटी फलंदाजीने  सामन्यात पुनरागमन केले. केएल राहुलनंतर रविंद्र जडेजा, आकाशदीप आणि बुमराह यांनी दमदार फलंदाजी करत भारताला फॉलोऑनपासून वाचवले.  त्याचबरोबर ऑस्ट्रेलियन संघाने भारतीय संघावर पहिल्या डावात १८५ धावांची आघाडी घेतली.  पाचव्या दिवसाच्या खेळात आकाशदीप-बुमराहने डाव पुढे नेला आणि दोघांमध्ये ४० धावांची भागीदारी झाली.  या भागीदारीमुळे त्यांनी दहा वर्षे जुना विक्रम आपल्या नावावर केला.

           वास्तविक, आकाशदीप आणि जसप्रित बुमराहा यांच्यात भारताच्या पहिल्या डावात ४७ धावांची भागीदारी झाली.  या दोन्ही खेळाडूंनी सामन्यात भारताच्या पुनरागमनात महत्त्वाची भूमिका बजावली.  रविंद्र जडेजाची विकेट पडली तेव्हा भारताची धावसंख्या २१३ धावा होती.  यावेळी भारत फॉलोऑन वाचवू शकणार नाही असे वाटत होते, पण आकाशदीप आणि बुमराहच्या अमूल्य भागीदारीमुळे अशक्यप्राय गोष्ट शक्य झाली.

               चौथ्या दिवशी या दोघांच्या जोडीने भारताला फॉलोऑनपासून वाचवले.  यानंतर पाचव्या दिवशीही दोन्ही खेळाडूंनी मिळून ८ धावा केल्या.  यादरम्यान आकाशदीप आणि बुमराह यांच्यात दहाव्या विकेटसाठी ४७ धावांची भागीदारी झाली.  ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीत भारतासाठी ही संयुक्त तिसरी सर्वोच्च भागीदारी ठरली.  आकाशदीप ३१ धावा करून बाद झाला आणि बुमराह दहा धावा करून नाबाद राहिला.

              ऑस्ट्रेलियात कसोटीत दहाव्या विकेटसाठी भारताच्या सर्वोत्तम भागीदारीचा विक्रम माजी खेळाडू सुनील गावस्कर-शिवलाल यादव यांच्या नावावर आहे, ज्यांच्यामध्ये सन १९८५ मध्ये ९४ धावांची भागीदारी झाली होती.  दुसऱ्या क्रमांकावर अनिल कुंबळे -इशांत शर्माची जोडी आहे, ज्यांच्यामध्ये सन २००८ मध्ये ५८ धावांची भागीदारी झाली होती.  त्याचवेळी, आता आकाशदीप आणि बुमराहच्या जोडीने दहा वर्षे जुन्या विक्रमाची बरोबरी केली आहे. सन २००४   मध्ये अजित आगरकर- झहीर खान यांच्यात ४७ धावांची भागीदारी झाली होती आणि या सामन्यात २०२४ मध्ये बुमराह-आकाशदीपनेही असाच पराक्रम केला. 

               पाचव्या दिवसाच्या सुरुवातीला एक मजेदार क्षण देखील दिसला, जेव्हा आकाशदीपने दिवसाच्या दुसऱ्या षटकात नॅथन लियॉनच्या षटकात असे काही केले, त्यानंतर त्याला ट्रॅव्हिस हेडला 'सॉरी' म्हणावे लागले.  मैदानाच्या मध्यभागी आकाश दीप आणि ट्रॅव्हिस हेड यांच्यात घडलेली ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.  वास्तविक, असे काही घडले की, नॅथन लियॉनच्या दुसऱ्या षटकात आकाश दीपच्या पॅडमध्ये एक चेंडू अडकला.  शॉर्ट लेगच्या दिशेने उभा असलेला ट्रॅव्हिस हेड चेंडू घेण्यासाठी त्याच्या दिशेने येत होता.  आकाशदीपने पॅडमधून चेंडू काढला आणि हातात नाही तर जमिनीवर सोडला.  चेंडू पडल्यानंतर ट्रॅव्हिस हेड रागावलेला दिसत होता.  मात्र, आकाशदीपने जाणीवपूर्वक चेंडू टाकला नव्हता. हेडकडे बघत तो सॉरी-सॉरी म्हणाला व खेळातील गांभीर्य राखले. पुढे जात हेडच्याच गोलंदाजीवर आकाश मोठा फटका मारण्याच्या नादात यष्टीचित झाला. पहिल्या डावात दिड शतक ठोकणारा हेड सामनावीर ठरला.

               मालिका तिन सामन्यानंतर १-१ अशीच बरोबरीत आहे. त्यामुळे उर्वरीत दोन कसोटयांत आता खरी लढाई बघायला मिळणार असून मेलबोर्न व सिडनीमध्ये भारतीय संघाची यापूर्वीची कामगिरी चांगली आहे. गाबा कसोटीत शेवटच्या दोन सत्रात भारतीयांनी सरस कामगिरी केल्याने व संभावीत पराभव टाळल्यामुळे संघ उंच मनोधैर्याने पुढच्या कसोटीत उतरेल.

लेखक : - 
डॉ.दत्ता विघावे                        
क्रिकेट समिक्षक 
मो. क्रं - ९०९६३७२०८२
close