प्राचार्य एस.के.उर्फ बापूसाहेब उनउने
२९ व्या वक्तृत्व स्पर्धेचा निकाल जाहीर
सांगली / प्रतिनिधी:
वर्तमानकाळात वक्तृत्व कलेचा दुरुपयोग केला जात आहे. धडधडीत खोटे बोलून मी बरोबर बोललो हे असे सांगितले जात आहे. अविश्वासू लोक केवळ बोलघेवडे बनून मतलब साधून घेत आहेत. वास्तविक वक्तृत्व कलेचा उपयोग देशाच्या कल्याणासाठी करायला हवा, बंधुता वाढवण्यासाठी करायला हवा, पण आज देशाचे नेतृत्व करणारी काही मतलबी माणसे देशात भेद निर्माण करतात, सतत इतिहासाकडे घेऊन जातात, धर्मांध बनवतात,देशातल्या लोकांना धर्मांध बनवण्यासाठी वाणीचा उपयोग करतात, यामुळे देशात आदर्श निर्माण होण्याऐवजी संभ्रम निर्माण करण्यात येत आहे. अशाने देशातली माणसे कशी वागतील ? स्वतः नीतिमान राहून देशकल्याण व देशाचे हित हाच धर्म म्हणणारी माणसे तयार होण्याऐवजी विकृती तयार केल्या जात आहेत.
इतिहासातील भांडणे उकरून हिंसा करण्याला उत्तेजन देणारे राज्यकर्ते उपयोगी नसतात. त्यातून देशाचे फार मोठे नुकसान होत असते.लोकशाहीत वाणी आणि लेखणी यांचा उपयोग विकासासाठी करण्याची गरज आहे. समाजसुधारक व शिक्षणतज्ञ,विचारवंत, सर्वांच्या कल्याणाचा विचार करणारे संत यांनी आपल्या वक्तृत्वाचा उपयोग माणुसकी वाढवण्यासाठी केला.पण आज काही राजकारणी लोकशाहीला भीती दाखवून एक दहशत निर्माण करताना दिसतात. बाबासाहेब आंबेडकर यांनी बर्क या विचारवंताचे एक वाक्य सर्वाना ऐकवले होते.. सत्ता देणे सोपे असते,सुज्ञपणा देणे कठीण असते. म्हणून आज आपण सुज्ञ नागरिक घडवण्यासाठी वक्तृव कलेचा उपयोग करावा,असे विचार छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा येथील मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ. सुभाष वाघमारे यांनी व्यक्त केले.
ते सांगली जिल्ह्याच्या तासगांव तालुक्यातील सावळज येथील महात्मा गांधी विद्यालयात प्राचार्य शंकरराव उर्फ बापूसाहेब उनउने वक्तृत्व स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अमोल उनउने हे उपस्थित होते,या स्पर्धेचे आयोजन स्मृती मंडळाचे संस्थापक कै. मारुती तारळेकर यांच्या प्राचार्य शं.कृ.उनउने स्मृती मंडळ व एस.के .उनउने इंग्लिश मिडीयम स्कूल सावळज यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
वक्तृत्वाचे महत्व सांगताना डॉ.वाघमारे पुढे म्हणाले की ‘ वक्तृत्व म्हणजे केवळ वाणीचा विलास नव्हे, वक्तृत्व हे आपल्या व्यक्तिमत्वासाठी आवश्यक गोष्ट आहे. कोणतेही कार्य चांगले होण्यासाठी लोकांशी सुसंवाद आवश्यक असतो. कार्पोरेट जगात विश्वास व संवाद यांची गरज आहे. आपल्या मनातले स्वप्न वाणीतून व्यक्त करण्यासाठी धैर्य हवे. नेतृत्व गुण विकासात भाषा आणि सर्व क्षेत्रातील ज्ञान माहिती या गोष्टी आवश्यक आहे. कर्मवीर यांची वाणी आणि कृती,चारित्र्य हे अनुकरणीय असेच आहे.. वक्तृव म्हणजे अलंकारिक वाक्यांचा फुलबाजा नाही. वक्तृव म्हणजे आपल्याच भावनेत रमणारे भुईचक्र नाही. वर्तमानकाळातला अंधार दूर करण्यासाठी वक्तृत्व असते. या स्पर्धेत भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी सत्य शोधण्यासाठी, हित करण्यासाठी, लोकांचे कल्याण व भारतीय लोकशाही मूल्यांचे जतन करण्यासाठी जागरूक राहून आपले विचार प्रसारित केले पाहिजेत .त्यासाठी त्यांनी चौफेर वाचन करण्याची गरज व्यक्त केली. साधनाचे बालकुमार २०२४ हे अंक त्यांनी वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना भेट दिले.
अध्यक्षीय भाषणात अमोल उनउने यांनी महात्मा गांधी विद्यालय सावळज येथे १० वीमध्ये प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यासाठी ११ ,००० रुपये व प्राचार्य एस.के उनउने इंग्लिश मिडीयम स्कूल सावळज येथे १० वीमध्ये प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यासाठी ११००० रुपये असे पारितोषिक ठेवत असल्याचे यावेळी जाहीर केले. आणि विद्यार्थ्यांनी वक्तृत्व कलेचा अधिक विकास करावा असे मत व्यक्त केले.
स्पर्धेच्या प्रारंभी ए.पी.पाटील यांनी प्रास्ताविक केले. सदर मंडळाचे सचिव श्री.दिलीप उनउने यांनी वक्ते व अन्य मान्यवर यांचा परिचय करून दिला.या स्पर्धेत एकूण ६५ विद्यार्थी सहभागी झाले. बालगटात साक्षदा क्षीरसागर; कन्या विद्यामंदिर शिरोळ ,किशोर गटात हर्षवर्धन कारंडे ,शांती निकेतन विद्यामंदिर सांगली ; कुमार गटात विश्वजा प्रकाश पाटील. ज्ञानदेव सावंत हायस्कूल, बस्तवडे व खुल्या गटात शिवम संजय माळकर ,भारती विद्यापीठ, सांगली. यांनी प्रथम क्रमांक मिळविले. या स्पर्धेत सर्व गटात द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ अशी पारितोषिके मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली. याच कार्यक्रमात महात्मा गांधी विद्यालयाच्या मयुरेश निकम १० वी, श्रेया पाटील १० वी यांना व प्राचार्य उनउने इंग्लिश मिडीयम स्कूल च्या स्वरा पाटील १० वी, अक्षद पाटील १० वी या विद्यार्थ्यांना आदर्श विद्यार्थी पुरस्कार देण्यात आले. यावेळी सर्व गतातील परीक्षकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्र संचालन अनिल बागवडे यांनी केले. आभार व्ही.बी.गाट यांनी मानले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष डॉ. संदीप मारुती तारळेकर,माजी मुख्याध्यापक एस.ए पाटील, शिदगोंड पाटील,दिलीप चिवटे,सुनील केडगे,संजय थोरात,बाळासाहेब सावंत, रमेश कांबळे, डॉ.डी.आर. तारळेकर ,स्पर्धक पालक, शिक्षक ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने हजर होते.
*संकलन
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111