प्रकाश मुंडे/बीड जिल्हा प्रतिनिधी.
स्व. धैर्यशीलराव डफळे सरकार हे केजकर पाटील घराण्याचे जेष्ट जावाई होते. उमराणी ता. जत, जि. सांगली येथील ऐतिहासिक सरंजामदार घराण्यातील श्रीमंत धैर्यशीलराव दादासाहेब डफळे सरकार उमराणीकर यांचे दि.22/12/2024 रोजी अल्पशा आजाराने रात्रौ 11:45 मिनिटांनी दुःखद निधन झाले. श्रीमंत डफळे सरकार हे 1967 पासून स्थानिक राजकारण आणि समाजकारणात सक्रिय राहिले.
सलग 25 वर्षे त्यांनी उमराणी गावचे सरपंचपद भुषविले. याकाळात त्यांनी गावातील पहिले सहकारी तत्त्वावर दुध संकलन केंद्र सुरू केले. कर्नाटक आणि महाराष्ट्र भागातील देवदासी प्रथेचे निर्मूलन करण्यासाठी त्यांनी उमराणी येथे उद्योग केंद्र तत्कालीन जिल्हाधिकारी लिना मेहंदळे यांच्या सहकार्याने चालू केले. त्याचबरोबर त्यांचे वडील बंधू कै.श्रीमंत विजयसिंह अमृतराव डफळे सरकार उमराणीकर यांच्या सहकार्याने उमराणी गावात पहिली सांगली बैंकेची शाखा सुरू केली.
त्याचबरोबर उमराणी परीसरात सार्वजनिक शौचालय उभारणी, गावातील बांधीव गटारे, रस्त्यांचे खडीकरण, सामाजिक वनीकरण तसेच जल संधारण आणि जलकुंभ उभारणी व नळपाणी योजना असे विविध शासकीय कामे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून प्रभावीपणे राबवली. सांगली जिल्हा बाजार समितीवर सदस्य म्हणूनही ते कार्यरत राहीले. 1972 च्या दुष्काळात जत तालुक्यातील सुकडी वाटपाचा कार्यक्रम प्रभावीपणे राबवला. त्याचबरोबर अनेक इच्छुक तरूणांना भारतीय सैन्यामध्ये भरती होण्यासाठी प्रोत्साहित आणि सहाय्य केले.
1982 साली उमराणी शिक्षण प्रसारक मंडळ उमराणी या संस्थेची स्थापना करून उमराणी आणि खोजानवाडी येथे इ. पाचवी ते इ.दहावीपर्यंतचे वर्ग चालू करून कन्नड व मराठी माध्यामातील परीसरातील मुलांची माध्यमिक शिक्षणाची गैरसोय दुर केली. याच संस्थेच्या माध्यमातून ज्ञानदीप वाचनालय आणि गरीब विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह चालू केले. त्याचबरोबर नवीन युगाची हाक ऐकून त्यांनी आपल्या सुविद्य पत्नी यांचेबरोबर पॉंडिचेरी येथील श्रीअरविंद इंटरनेशनल सेंटर ओफ एज्युकेशन व औरोविल मातृमंदिर या उषानगरीलाही भेट दिली. त्यांनी वयाच्या ऐंशीव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
त्यांच्या निधनामुळे परीसरातील नागरीकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. आपल्या मनमिळाऊ आणि सर्वांना बरोबर घेऊन जाण्याच्या स्वभावामुळे उमराणी ग्रामपंचायतीचे सलग 25 वर्षे बिनविरोध नेतृत्व केले. त्यामुळे त्यांचे राजकीय विरोधक ही त्यांना गुरूस्थानी मानतात. त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी व मुलगा,आणि दोन मुली,जावई व नातवंडे असा परिवार आहे.त्यांच्या दुःखद निधनानं केज येथील
सुरेश तात्या पाटील व पाटील परिवार केज यांनी शोक व्यक्त केला आहे.