shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

पाकिस्तान क्रिकेटमध्ये आले सुगीचे दिवस


               जगभरातील संघ ३३ वर्षांपासून जे स्वप्न पाहत होते, ते पाकिस्तानने सर्वप्रथम साध्य केले आहे.  पाकने दक्षिण आफ्रिकेला त्यांच्या घरच्या मैदानावर एकदिवसीय मालिकेत व्हाईटवॉश केले.  अशाप्रकारे, दक्षिण आफ्रिकेला मायदेशात एकदिवसीय मालिकेत  क्लिन स्विप करणारा पाकिस्तान हा पहिला संघ ठरला आहे.  दक्षिण आफ्रिकेने सन १९९१-९२ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केल्यानंतर   पहिली एकदिवसीय मालिका खेळली.  त्यानंतर घरच्या मैदानावर एकदिवसीय मालिकेत त्यांचा सुफडासाफ होण्याची ही पहिलीच वेळ आहे. हि धमाल पाकिस्तानी संघाने करून जागतिक क्रिकेटमध्ये धमाका केल आहे.  याशिवाय आणखी एक स्फोट झाला आहे.  सध्याच्या एकदिवसीय मालिकेत काय घडले याबद्दल बोलणे गरजेचे आहे. अखेर पाकिस्तान क्लिन स्विप करण्यात यशस्वी कसा झाला ?

              पाकिस्तानने दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळली आणि तिन्ही सामने जिंकले. ४७-४७  षटके खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तान संघाने प्रथम फलंदाजी करताना ९ गड्यांच्या मोबदल्यात ३०८ धावा केल्या.  पाकिस्तानसाठी, सैम अयुबने पुन्हा एकदा शानदार शतक झळकविले, ज्यामुळे पाकने ३०० धावांचा टप्पा ओलांडला आणि दक्षिण आफ्रिकेच्या अडचणी वाढवल्या.  लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ २७१ धावांवरच मर्यादित राहिला आणि सामना ३६ धावांनी गमावला.  यासह पाकिस्तानने एकदिवसीय मालिकेतही क्लिन स्विप केला.  यापूर्वी डरबनमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या वनडेमध्ये पाकिस्तानने तीन विकेट्सने विजय मिळवला होता. तर केपटाऊनमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानने ८१ धावांनी मोठा विजय नोंदवला होता.

                पाकने दक्षिण आफ्रिकेत जिंकलेल्या एकदिवसीय मालिकेतील तिन्ही सामन्यांमध्ये एक गोष्ट समान राहिली.  पाकिस्तान संघाने तिन्ही सामन्यात नाणेफेक गमावली पण सामना जिंकण्यात यश मिळवले.  दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, मोहम्मद रिझवान हा टॉसचा बॉस बनला नसला तरी दक्षिण आफ्रिकेत खेळल्या गेलेल्या एकदिवसीय मालिकेत निर्भेळ यश मिळविणारा तो नक्कीच पहिला कर्णधार ठरला आहे.  पाकिस्तान दक्षिण आफ्रिकेत एकदिवसीय मालिका एकदा नव्हे तर तीनदा जिंकणारा पहिला आशियाई संघ बनला आहे.   सन २०२४ पूर्वी पाकिस्तान संघाने २०१३ आणि २०२१ मध्ये दक्षिण आफ्रिकेत एकदिवसीय मालिकाही जिंकल्या आहेत.

              दक्षिण आफ्रिकेसाठी हेनरिक क्लासेनने ४३ चेंडूत ८१ धावांची आक्रमक खेळी केली.  असे असतानाही लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा विजय ३६ धावांनी हुकला.  यजमान संघाचा डाव ४२ व्या षटकातच २७१ धावांवर आटोपला.  पावसामुळे सामना ४७ षटकांचा करण्यात आला आणि डकवर्थ लुईस स्टेन (डिएलएस) पद्धतीचा वापर करून निकाल निश्चित करण्यात आला. पाककडून फिरकी गोलंदाज सुफियान मुकीम सर्वात यशस्वी ठरला त्याने चार फलंदाजांना बाद केले.

                बावीस वर्षीय सलामीवीर सैम अयुबने गेल्या महिन्यात बुलावायो येथे झिम्बाब्वे विरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात नाबाद ११३ धावांची खेळी केली होती.  यानंतर, गेल्या आठवड्यात पर्लमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्याने १०९ धावा केल्या होत्या.  एकदिवसीय सामन्यांदरम्यान, त्याने सेंच्युरियनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टि२० सामन्यातही त्याने  नाबाद ९८ धावा केल्या.  अयुबला 'प्लेअर ऑफ द मॅच' आणि 'प्लेअर ऑफ द सिरीज' असे दोन्ही पुरस्कार मिळाले. 

              याउलट दुसरा सलामीवीर अब्दुल्ला शफीकने सलग तिसऱ्यांदा शून्यावर बाद होऊन अनोखी हॅट्रीक साधली.  तर अयुबने उत्कृष्ट नियंत्रण दाखवत मैदानाच्या चारही बाजूने फटके मारले.  त्याने बाबर आझम (५२) सोबत ११४ आणि कर्णधार मोहम्मद रिझवान (५३) सोबत ९३ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली.  तेरा चौकार आणि दोन षटकार मारल्यानंतर पदार्पण करणारा कॉर्बिन बॉशच्या गोलंदाजीवर यष्टिरक्षकाच्या हाती झेल देऊन तो बाद झाला.  फलंदाजी व्यतिरिक्त, अयुबने त्याच्या ऑफ स्पिनवर संतुलीत गोलंदाजी करत, दहा षटकात ३४ धावा देत एक बळी घेतला.  त्याने डेव्हिड मिलरची महत्त्वाची विकेट घेतली आणि तो सामन्यातील सर्वात किफायतशीर गोलंदाज ठरला.  दक्षिण आफ्रिकेकडून सलग तिसऱ्या सामन्यात अर्धशतक झळकविणारा क्लासेन हा एकमेव फलंदाज होता.  २९ व्या षटकात शाहीन शाह आफ्रिदीच्या चेंडूवर तो झेलबाद होईपर्यंत त्याने आवश्यक धावगती कायम ठेवली होती.

              कसोटी क्रिकेटच्या डब्ल्यूटीसी सर्कलमध्ये भारत व ऑस्ट्रेलियाला मागे सारत गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचलेल्या दक्षिण आफ्रिकेला टि२० व वनडे मालिके पाठोपाठ पाकिस्तान विरूध्द दोन कसोटी सामन्यांची मालिकाही खेळायची आहे. कसोटीत सध्या त्यांचा जमलेला बस बघता ते पाकला सहज हरवतील असे वनडे व टि२० मालिका सुरू होण्यापूर्वी वाटत होते.  मात्र सध्याचा फॉर्म बघता पाकिस्तान कसोटीतही दक्षिण आफ्रिकेला चकीत करू शकतो. तसं बघाल तर पाकिस्तानला दक्षिण आफ्रिकेत अद्याप कसोटी मालिका सोडा एक सामना जिंकणेही जमले नाही. 

               सध्या ऑस्ट्रेलियात भारत व ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान पाच कसोटी सामन्यांची मालिका रंगतदार अवस्थेत पोहोचली असून तीन सामन्यानंतर दोन्ही संघात बरोबरीची कोंडी कायम असून उर्वरीत दोन कसोट्यांचा निकाल ज्याच्या बाजूने लागेल तो संघ डब्ल्यूटीसी फायनलसाठी पात्र ठरू शकतो. अशा परिस्थितीत पाकिस्तानने मालिका जिंकली अथवा बरोबरीत सोडवली तरी त्याचा लाभ भारताला होऊ शकतो. परंतु पाकिस्तान स्वतः डब्ल्यूटीसी सर्कलच्या या सत्रातून बाद झाल्यामुळे ते भारताला लाभ होईल असे काही करतील असं वाटत नाही. पाकचा भारताविषयीचा आकस व जळावूवृत्ती बघता ते स्वतः हारून घेतील आणि ऑस्ट्रेलिया - द. आफ्रिका अशी फायनल होईल असे समीकरण जुळवण्याची चाल खेळतील. असेच सकृत दर्शनी तरी स्पष्ट दिसते.

              आजमितीला पाकिस्तान क्रिकेटला नवसंजिवनी मिळाल्याचे दिसत आहे. मायदेशात इंग्लंडला कसोटी मालिकेत पिछाडीवरून २-१ असे हरविले. त्यानंतर झिंबाब्वेला टि२० मालिकेत नमविले व ऑस्ट्रेलियात टि२० मालिका जिंकली. त्याउलट भारताची परिस्थिती झाली आहे. दोन महिन्यापूर्वी जागतिक क्रिकेट अधिराज्य गाजविणारी टिम इंडिया तीनही प्रारूपात अव्वल स्थानी होती. मात्र मायदेशात न्युझिलंडविरुद्ध कसोटीत सुफडासाफ झाल्यानंतर संघाचे संतुलन बिघडले. ऑस्ट्रेलियात पर्थला जिंकूनही दुसरी कसोटी गमावल्याने पिछाडीवर पडावे लागले. गाबात पावसाने वाचवले म्हणून मालिका बरोबरीत आहे. अशा स्थितीत धोकादायक पाकिस्तानने द. आफ्रिकेला कसोटीत हरवावे याकडे भारतीयांचे लक्ष असणे भारतीय क्रिकेटच्या दृष्टीने लज्जास्पद असलेली बाब उघड्या डोळ्यांनी बघावी लागते यासारखे दुसरे दुर्देव असूच शकत नाही.

लेखक : - 
डॉ.दत्ता विघावे                        
क्रिकेट समिक्षक 
मो. क्रं - ९०९६३७२०८२
close