*वर्ष उलटत आला तरी वडार समाजातील कामगारांचे नोंदणी अर्ज निकाली काढले नाहीत.
*वडार समाज संघाच्या वतीने मुख्यमंत्र्यांना जाहीर निवेदन.
लातूर / प्रतिनिधी
बांधकाम कामगारांच्या हितासाठी निर्माण झालेले महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने कामगारांसाठी अनेक योजना राबविल्या जातात. मात्र या अनेक योजना केवळ कागदावरच राहताना दिसून येत आहेत. वडार जमात ही दगडाशी संबंधित कामे करणारी जमात म्हणून ओळखली जाते. जाते, पाटे, वरवंटा तसेच दगडी शिल्पकृती घडविणे, खडी फोडणे, माती खोदकाम असे अनेक कामे करून आपले उदरनिर्वाह करतो. या जमातीतील कामगारांची नोंदणी व्हावी त्यांना कामगार मंडळाचे विविध योजना मिळावे म्हणून कामगार मंडळाकडे नोंदणी अर्ज दाखल करण्यात आले, मात्र वर्ष संपत आले तरी कामगार मंडळाने वडार जमातीतील अनेक कामगारांची नोंदणी अर्ज निकालीच काढली नाहीत. यास्तव वडार समाजाने जगावे कसे? असा संतप्त सवालच सामाजिक कार्यकर्ते भटक्या विमुक्त समूहाचे अभ्यासक तथा वडार समाज संघ, महाराष्ट्र राज्य प्रदेश पदाधिकारी श्रीकांत मुद्दे यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे केली आहे.
श्रीकांत मुद्दे म्हणाले की, शासन स्तरावर बांधकाम कामगार नोंदणीचा अर्ज एक महिन्याच्या आत निकाली काढण्याचा शासन निर्णय असताना, लातूर येथील बांधकाम कामगार कार्यालय कल्याणकारी मंडळाने वर्ष वर्ष कामगारांचे नोंदणी अर्ज निकाली न काढता तसेच प्रलंबित ठेवले आहे. त्यामुळे त्यांना योजनांचा लाभच घेता येत नाही. ही अत्यंत गंभीर आणि चिंताजनक बाब आहे असेही म्हणाले.
श्रीकांत मुद्दे सर
यासाठी लातूर कामगार मंडळाचे आयुक्त साहेबांना अर्ज निकाली काढण्यात यावे म्हणून वारंवार निवेदने देण्यात आली, तसेच त्यांच्या निदर्शनासही आणून देण्यात आली, संबंधित अधिकाऱ्यांशी सांगण्यात आले, कंत्राटी अधिकाऱ्याशीही भेट घेऊन निदर्शनास आणून देण्यात आले. मात्र याविषयी सातत्याने दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे दिसून आले. कामगारांनी ही वारंवार हेलपाटे मारले, कंत्राटी अधिकारी सांगतात फाईल साहेबांच्या टेबलला आहे, फाईल पुढे पाठवण्यात आले आहे, मात्र निकाली केव्हा निघेल हे मात्र कळत नाही. सातत्यानेच अधिकाऱ्यांकडून अरेरावीची भाषा वापरणे, योग्य माहिती न देणे याशिवाय कामगारांना काही मिळत नाही. आयुक्त साहेबांना प्रत्यक्ष भेटून कामगारांची चौकशी करून नोंदणी अर्ज निकाली काढावे असेही सांगण्यात आले. मात्र यावरही निर्णय झाला नाही.
वडार जमातीतील कामगारांची नोंदणी अर्ज ९- १०- ११ महिने झाले तरी निकाली निघत नसेल तर एजंट, दलाल, कंत्राटदार, ठेकेदारांच्या विळख्यात अडकलेले हे कार्यालय वडार समाजातील कामगारांचे प्रश्न सोडवेल का? हाच फार मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होताना दिसत आहे. असे सामाजिक कार्यकर्ते भटक्या विमुक्त समूहाचे अभ्यासक तथा वडार समाज संघ, महाराष्ट्र राज्य प्रदेश पदाधिकारी श्रीकांत मुद्दे यांनी मुख्यमंत्री यांना निवेदनातून केले आहे.