श्रीरामपूर / प्रतिनिधी:
मराठी वृत्तपत्र लेखक संघ, मुंबई महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने दिला जाणारा विनोदी दिवाळी अंकाचा राज्यस्तरीय पुरस्कार श्रीरामपूर येथील वर्ल्ड सामना दिवाळी अंकाच्या संपादिका सौ. स्नेहलता प्रकाश कुलथे यांना जाहीर करण्यात आला असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष एकनाथ बिरवटकर यांनी दिली.
राज्यातील नामवंत पत्रकारांना पत्रकार भुषण आणि अन्यही विविध क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी बजावणाऱ्या व्यक्तींना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात येणार आहे. सदरचा पुरस्कार सोहळा ६ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, डॉ. सुरेंद्र गावसकर सभागृह (शारदा सिनेमाच्या शेजारी), दादर, मुबंई या ठिकाणी होणार आहे. यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. राज्यपाल पद्मभूषण रामभाऊ नाईक हे भूषविणार असून यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, भाऊ तोरसेकर, सुकृत खांडेकर आदि उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर स्मृती पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार अनिल रोकडे व कैलासवासी यशवंत पाध्ये स्मृती पुरस्कार पत्रकार तुळशीदास भोईटे यांना प्रदान करण्यात येणार आहेत.
तरी या कार्यक्रमास सर्व साहित्यिक,पत्रकार व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन एकनाथ बिरवटकर, संतोष धोत्रे, शंकर शिंदे, शंकरराव राहणे आदींनी केले आहे.
यापूर्वी वर्ल्ड सामना दिवाळी अंकास राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, विविध सामाजिक संस्था व संघटनांनी सन्मानित केले आहे. या मिळालेल्या पुरस्काराबद्दल संपादिका सौ.स्नेहलता कुलथे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111