जिल्हा समन्व्यक व सनियंत्रण समिती (दिशा) कमिटीची पहिलीच आढावा बैठक नुकतीच नगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात खा.भाऊसाहेब वाकचौरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी सहअध्यक्ष खा.निलेश लंके आणि सचिव,सदस्य जिल्हाधिकारी सिद्धारम सलीमठ यांच्यासह जिल्ह्यातील सर्व शासकीय योजनेचे सर्व अधिकारी उपस्थित होते.
केंद्र पुरस्कृत योजनांच्या आढावा बैठकीत सर्वप्रथम खा.भाऊसाहेब वाकचौरे यांचे स्वागत करून सभेला सुरुवात झाली. सर्व योजनांचा तपशीलवार आढावा घेण्यात आला. यावेळी खा.वाकचौरे म्हणाले कि, सामान्य जनतेच्या कल्याणासाठी केंद्र सरकारच्या विविध योजना असून सर्व अधिकारी यांनी त्या सामान्य जनतेपर्यंत पोहचविणे अपेक्षित आहे. अनेकवेळा फक्त ऑनलाईन पोर्टल आहेत म्हणून त्यावर विसंबून न राहता त्याचा प्रचार आणि प्रसार होणं आवश्यक आहे. तसेच अनेक व्यक्ती पात्र असून आणि अनेकांचे नावे पात्र यादीत आले असताना सुद्धा घरकुलाचा लाभ मिळत नाही. सौरऊर्जा योजनेत अनेक शेतकरी सहभागी झालेत मात्र आजपर्यंत अनुदानास पात्र नाहीत. अशा एक ना अनेक अडचणीतुन जनता आणि आपण सर्व अधिकारी यांच्यात समन्व्यक ठेवण्याची जबाबदारी आमची आहे. त्यामुळे यापुढे सर्व योजना जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी नेहमी कटीबद्ध असून अधिकाऱ्यांची अरेरावी आणि मनमानी खपवून घेणार नाही, असा इशारा दिला. यावेळी खा.लंके यांनी जलजीवनच्या कामात प्रचंड भ्रष्टाचार झाला असल्याचा गौप्यस्फ़ोट करत ठेकेदारांनी अत्यंत निकृष्ट काम करत केंद्र शासनाचे लाखो रुपये पाण्यात घातलेबाबत अधिकाऱ्यांना धारेवर धरत मा.जिल्हाधिकारी यांना वेळ असेल तेव्हा काही गावातील या योजनेचा भांडाफोड करणार असल्याचे जाहीर केले.
यावेळी खा.भाऊसाहेब वाकचौरे यांच्या समवेत शिवसेनेचे मुकुंद सिनगर, नीरज नांगरे आदी मान्यवर उपस्थित होते.