आळंदी येथे निसर्ग व पर्यावरण मंडळाचे आठवे पर्यावरण संमेलन उत्साहात संपन्न
श्रीरामपूर / प्रतिनिधी:
पद्मश्री अण्णासाहेब हजारे यांच्या प्रेरणेने आणि स्वर्गीय आबासाहेब मोरे यांनी स्थापन केलेल्या या मंडळाचे कार्य राज्यभर अविरतपणे सुरू असून या कार्यात हजारो माणसे जोडली जाऊन तरुणांनी या पर्यावरणीय चळवळीत पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा निसर्ग व पर्यावरण मंडळाचे अध्यक्ष प्रमोददादा मोरे यांनी व्यक्त केली.
निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण मंडळाच्या वतीने नुकतेच (दि. २९ रोजी) आळंदी (जि.पुणे) येथील देविदास आश्रमशाळा तथा मामासाहेब दांडेकर स्मृती मंदिरात आठवे एकदिवसीय पर्यावरण संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ वनस्पती शास्त्रज्ञ प्रा. श्रीधर महाजन हे होते. तर उद्घाटक म्हणून आळंदी देवस्थानचे विश्वस्त ॲड. राजेंद्र उमाप होते. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती पूजनाने संमेलनाचे उद्घाटन संपन्न झाले.
याप्रसंगी व्यासपीठावर ज्येष्ठ शास्त्रज्ञ प्रमोद मोघे, पुणे मनपाचे माजी सहाय्यक आरोग्य अधिकारी प्रभाकर तावरे, देविदास आश्रम शाळेचे प्रमुख ह. भ. प. निरंजनशास्त्री कोठेकर, मंडळाचे अध्यक्ष प्रमोददादा मोरे, इंद्रायणी बचाव समितीचे विठ्ठल शिंदे, ॲड. लक्ष्मण येळे, छायाताई राजपूत, विलास महाडिक, मनिषाताई पाटील, लतिकाताई पवार, प्रभाकर म्हस्के, अलका गव्हाणे, कांचन सावंत, बबन जाधव, आदी उपस्थित होते. संमेलनाचे प्रास्ताविक व स्वागत धीरज वाटेकर यांनी केले. यावेळी ग्रंथ, शाल व स्मृतिचिन्ह देऊन मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी निरंजनशास्त्री कोठेकर, प्रभाकर तावरे, विघ्नेशा आहेर, ज्येष्ठ शास्त्रज्ञ प्रमोद मोघे यांनी आपल्या मनोगतातून पर्यावरण आणि वृक्षसंवर्धनाचे महत्त्व विशद केले. ज्येष्ठ शास्त्रज्ञ श्रीधर महाजन यांनी आपल्या मनोगतातून सांगितले की, निसर्ग व पर्यावरणाचा शास्त्रोक्त अभ्यास होणे गरजेचे असून पाश्चात्य राष्ट्रांची विकासनीती आणि निसर्गनीती पर्यावरण या विषयावर आधारित असून पर्यावरण वाचवणे हे जगातील सर्वच राष्ट्रांचे उद्दिष्ट आणि ते ध्येय आहे.
पाणी, जमीन आणि वृक्षांचे संवर्धन झाले नाही तर पृथ्वीवर पर्यावरणीय आणीबाणी निर्माण होऊ शकेल, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. आळंदी देवस्थानचे विश्वस्त, संमेलनाचे उद्घाटक ॲड. राजेंद्र उमाप यांनी सांगितले की, मानवनिर्मित जंगलांची वृध्दी, तापमान वाढ आणि हवामान बदल देशाला आव्हानात्मक आहे. पर्यावरण वाचवणे ही काळाची गरज असून शिक्षकांनी पुढाकार घेऊन निसर्ग व पर्यावरण संस्थेच्या माध्यमातून पर्यावरण चळवळ सार्वत्रिक करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या संमेलनासाठी राज्यातून २५ पेक्षा अधिक जिल्ह्यांची प्रतिनिधी उपस्थित होते. पर्यावरणाचे उत्कृष्ट कार्य करणाऱ्या सातारा जिल्हा गट, अबितखिंड व आंबीखालसा ग्रामस्थ तसेच व्ही. व्ही. पोपरे, पर्यवेक्षक माळी, पर्यावरणावर पीएच.डी करणारे औटी दांपत्य तसेच संयोजन समितीचा पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. दुपारच्या सत्रात आळंदी येथील सिद्धबेट येथे पर्यावरण प्रेमीची क्षेत्रभेट आयोजित करण्यात आली होती. शेवटी सहसचिव श्री संजय गायकवाड यांनी उपस्थितांचे आभार मानले.
*वृत्त विशेष सहयोग
डॉ.शरद दुधाट - श्रीरामपूर
*वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111