देवळाली प्रवरा -
दि.२६/१२/२४
प्रहार जनशक्ती पक्षाचे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष अप्पासाहेब ढूस यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने पोस्टर बॅनर सारख्या खर्चाला फाटा देऊन राहुरी फॅक्टरी येथील विधवा भगिनिच्या डोक्यावर छत देऊन देवळाली प्रवरा येथील प्रहार संघटनेने आगळावेगळा उपक्रम केला आहे.
२६ डिसेंबर रोजी अत्यंत साध्या पद्धतीने प्रसादनगर येथील विधवा भगिनी विजयाताई निकाळजे यांना प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने बारा बाय पंधरा फूट आकाराचे पत्र्याचे घर बांधून देऊन आज त्याचा ताबा दिला आहे.
प्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख आप्पासाहेब ढूस, कार्याध्यक्ष चंद्रकांत कराळे, देवळाली प्रवरा शहर प्रमुख प्रकाश वाकळे, राहुरी फॅक्टरी शहर प्रमुख शरद खांदे, देवळाली प्रवरा महिला शहरप्रमुख भाग्यश्री कदम, राहुरी फॅक्टरी महिला शहरप्रमुख रजनीताई कांबळे, उपप्रमुख वंदनाताई कांबळे, गणेश भालके, शाखा प्रमुख अमोल साळवे, संघटक सुनील कदम, कांबळे दादा, सनी सोनवणे आदी या प्रसंगी उपस्थित होते.
प्रसंगी बोलताना आप्पासाहेब ढूस यांनी सांगितले की, प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक आदरणीय बच्चुभाऊ कडू यांच्या आशीर्वादाने व प्रदेशाध्यक्ष अनिलजी चौधरी साहेब यांच्या सहकार्याने प्रहार मध्ये काम करत असताना वाढदिवस साध्या पद्धतीने कसे साजरी करावेत व त्याऐवजी जनसेवा कशी करावी हे शिकायला मिळाले.
प्रहार मध्ये आल्यानंतर स्वतःच्या जन्मदिनी कोणत्याही प्रकारे गाजावाजा न करता डीजे तसेच पोस्टर बाजीला फाटा देऊन व गावाचे विदृपीकरण होणार नाही याची काळजी घेऊन आम्ही वेगवेगळे उपक्रम हाती घेतले आहेत. त्यामध्ये कोविड काळात विधवा झालेल्या भगिनींच्या एक वर्ष वयाच्या मुलीच्या नावे प्रत्येकी दहा हजार रुपये पोस्टमध्ये फिक्स डिपॉझिट करून दहा मुलींना एक लाख रुपये वितरण करून आम्ही या आगळ्या उपक्रमाची सुरुवात केली होती. त्यानंतर पुढच्या वाढदिवसाला विधवा बहिणींना शिलाई मशीन व हातगाडी देऊन त्यांना उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध करून दिले. त्यानंतर उघड्यावर राहणाऱ्या एका अनाथ मुलीला घर बांधून देऊन तिला निवाऱ्याची व्यवस्था केली. त्यानंतर एका दिव्यांग बांधवाला तीन चाकी मोटरसायकल देऊन त्याला घरामधून व्यवसायासाठी बाहेर पडण्यास मदत केली. त्याचप्रमाणे यावर्षी विजयाताई निकाळजे या विधवा भगिनीला तिच्या घरामध्ये एकही पुरुष शिल्लक राहिला नसल्याने व तिचे घर पावसाने पडल्याने ती घर बांधू शकत नव्हती. नुकताच मुलगाही वारल्याने अत्यंत दुःखात असलेल्या व पडक्या घरात राहणाऱ्या या विधवा बहिणीला आम्ही आमच्या वाढदिवसाला पोस्टरबाजी न करता घर बांधून देण्याचा निर्णय घेतला व देवळाली प्रवरा येथील सर्व प्रहार पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी साथ दिल्यामुळे आम्ही या भगिनीला आज घर देऊन तिला निवारा देऊ शकलो. आणि आमच्या मातोश्री कै. चांगुनाबाई भिमराज ढूस यांच्या शिकवणी प्रमाणे आपल्या वाढदिवसाचे दुसऱ्याच्या खर्चाने गावभर पोस्टर लावून गावाच्या शिव्या खाण्यापेक्षा त्या पोस्टरच्या खर्चात गरजूंना मदत केली तर नक्कीच आपण त्यांच्या आशीर्वादाला पात्र ठरतो या शिकवणीप्रमाणे आज हा वाढदिवस अशा पद्धतीने साजरा करून विजयाताई निकाळजे यांना या ठिकाणी घर बांधून देण्यात आले आहे.
प्रसंगी श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे कार्याध्यक्ष चंद्रकांत कराळे यांनी आप्पासाहेब ढूस यांच्या प्रत्येक वाढदिवसाचे निमित्ताने होत असलेल्या आगळ्यावेगळ्या उपक्रमांचे कौतुक करून कोणत्याही प्रकारची सत्ता नसताना आपण जनतेला मदत करू शकतो हे आप्पासाहेब ढूस यांनी त्यांच्या कर्तुत्वाने दाखवून दिल्याने त्यांचे अभिनंदन करावे तितके थोडेच असल्याचे सांगितले.
प्रसंगी हे बांधकाम मुदतीत पूर्ण करण्यासाठी राहुरी फॅक्टरी शहर उपप्रमुख गणेश भालके यांनी घेतलेल्या परिश्रमाबद्दल त्यांचे शाल व श्रीफळ देऊन प्रहार कडून आभार व्यक्त करण्यात आले.