भुसावळ:- येथे महावितरण कंपनीच्या उपकार्यकारी अभियंत्याला २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडल्याची घटना समोर आली आहे. प्रशांत प्रभाकर इंगळे असे या अभियंत्याचे नाव असून ते चोरवड (भुसावळ) येथील उपकार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत आहेत.
तक्रारदार हे शासकीय विद्युत ठेकेदार असून, त्यांनी एका खाजगी कंपनीच्या NSC योजनेअंतर्गत 100 वॅटची विद्युत क्षमता वाढवून 200 वॅट करण्यासाठी प्रस्ताव दिला होता. हा प्रस्ताव कार्यकारी अभियंता यांच्याकडे पाठवण्यासाठी प्रशांत प्रभाकर इंगळे यांनी सुरुवातीला २५ हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. तडजोडीनंतर ही रक्कम २० हजारांवर आणली.
तक्रारदाराने जळगावच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिल्यानंतर पथकाने पंचासमक्ष लाच मागणी पडताळली. त्यानंतर, २२ जानेवारी रोजी, उपकार्यकारी अभियंता प्रशांत प्रभाकर इंगळे यांनी २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना त्यांना रंगेहाथ पकडले गेले.
सदर प्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तक्रारदाराचा प्रलंबित प्रस्तावही तपासासाठी जप्त करण्यात आला आहे.ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर, पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे, पोना बाळू मराठे, व पोकॉ अमोल सुर्यवंशी यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पूर्ण केली.