एरंडोल :-शास्त्री फाउंडेशन संचलित शास्त्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, एरंडोल येथे 20 जानेवारी रोजी सुरत येथील दात्री फाउंडेशनतर्फे "स्टेम सेल्स" या महत्त्वपूर्ण विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले.
दात्री फाउंडेशन ही भारतातील सर्वात मोठी ब्लड स्टेम सेल डोनर संस्था असून, तिला वर्ल्ड मॅरो डोनर असोसिएशनचे सदस्यत्व प्राप्त आहे. या चर्चासत्राला महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. पराग कुलकर्णी, दात्री फाउंडेशनचे गुजरात मॅनेजर ईश्वर सर्टनपरा, कल्पेश गावटे, विशाल बिराडे आणि भावेश बिराडे उपस्थित होते.
उपप्राचार्य डॉ. पराग कुलकर्णी यांनी अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांना स्टेम सेल डोनेशनच्या महत्त्वावर भर देत, अधिकाधिक विद्यार्थ्यांनी स्टेम सेल सॅम्पल देऊन समाजासाठी आपले योगदान द्यावे असे आवाहन केले. यानंतर श्री ईश्वर सर्टनपरा यांनी दात्री फाउंडेशनच्या कार्याची सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रमाचे आयोजन संस्थेच्या संस्थापक सचिव सौ. रूपा शास्त्री व प्राचार्य डॉ. विजय शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. जवळपास 100 विद्यार्थ्यांनी फॉर्म भरून रजिस्ट्रेशन केले व सॅम्पल देत आपला सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी प्रतिनिधी मनीष ब्रह्मे यांनी केले तर आभार प्रदर्शन राजेश्वर पाटील यांनी केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, व जनसंपर्क अधिकारी शेखर बुंदेले यांनी विशेष परिश्रम घेतले.
ही कार्यशाळा विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणादायी अनुभव ठरली आणि समाजासाठी योगदान देण्याची नवीन दिशा दाखवली.