विठाबाई भाऊ (मांग) नारायणगावकर
राष्ट्रपतिपदक विजेत्या तमाशा कलावंत
जन्म. जुलै १९३५
विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर ह्या अद्वितीय कलागुणांसह तमाम तमाशा रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणाऱ्या तमाशासम्राज्ञी होत्या. विठाबाईंचे वडील भाऊ खुडे आणि चुलत भाऊ बापू खुडे यांचा भाऊ-बापू (मांग) नारायणगावकर हा तमाशा अस्सल लोककलेचा नमुना तर होताच पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तमाशा हे या कलावंतांसाठी समाज सुधारणेचं एक माध्यम होतं. लहानपणापासूनच नृत्य आणि गायनाकडं विठाबाईंचा विशेष ओढा होता. घरी असताना तमाशातल्या लावण्या, गवळणी, भेदीक त्यांच्या कानावर आपसूक पडत होत्या. पण शाळेतही कवितेमध्ये विशेष रुची होती. त्यांचा हा कलेकडचा आत्यंतिक ओढा बघूनच वडिलांनी शिक्षणाची सक्ती केली नाही आणि वयाच्या चौथ्या - पाचव्या वर्षीच विठाबाईंची शाळा कायमची बंद झाली. आता त्या आपल्या वडिलांच्या तमाशाबरोबर भटकंती करू लागल्या. याच सुमारस मामा वरेरकर - आळतेकर आपल्या कलापथकातून एकांकिका आणि पथनाट्याच्या माध्यमातून समाजजागृती करत होते. भाऊ-बापूचा तमाशा पाहून ते खूपच प्रभावित झाले. भाऊ आणि बापू तमाशातून त्यांच्यासारखेच समाजप्रबोधन करत होते. त्यामुळे मामा वरेरकरांचा आणि भाऊ - बापूंचा विशेष स्नेह जुळला. भाऊ-बापूच्या तमाशात आता अधून-मधून विठाबाई आपल्या कलेची चुणूक दाखवून जात होत्या. ही कला मामा वरेरकरांनी नेमकी हेरली आणि विठाबाईंना आपल्या कलापथकात पाठवून द्यायची विनंती भाऊंना केली. भाऊंनी ती तात्काळ मान्य केली आणि विठाबाई मामा वरेरकरांच्या कलापथकातून काम करू लागल्या. त्यामुळे त्यांच्या अनुभवाच्या आणि शिकण्याच्या कक्षा रुंदावल्या. देशाविषयी, समाजाविषयी एक भूमिका तयार झाली. तमाशात आत्मसात केलेल्या कलेला आणखी पैलू पडले. त्यात शास्त्रशुद्धपणा आला. आपल्या कलेत त्या आणखी निपुण झाल्या.
भाऊ खुडे यांच्या लेकीनं पुढं महाराष्ट्राला आपल्या तालावर नाचवलं. विठाबाई भाऊ नारायणगावकर या नावाने तमाशाला दिल्लीच्या तख्तारतापर्यंत नेलं. विठाबाई नृत्यात आणि गायनात त्या खूप सरस होत्या. गवळणी, लावण्या, मराठी-हिंदी चित्रपटातली गीतं सुरेल आवाजात म्हणत असत. ढोलकीच्या तालावर नाचणार्या् विठाबाईंना पाहणं हा एक अपूर्व आनंद असे. त्यांच्यामुळे तमाशाला एक वेगळंच वलय प्राप्त होत होतं. तमाशातल्या कलावंतीणीचं आयुष्यही विठाबाईंच्या हळू-हळू अंगवळणी पडत होतं. तमाशातल्या बायकांची लग्न होत नाहीत हे त्यांना ठाऊक होतं. तमाशातल्या कलावंतांचं आयुष्यच खूप निराळं! बहुतेक पुरुष त्यांचं लग्न झालेलं असूनही त्यांच्या बायका-पोरांना गावी ठेवून तमाशातल्याच एखाद्या कलावंतीणीशी संधान बांधत. ती कलावंतीण जराशी थकली किंवा तिच्याशी बिनसलं की, ते तिला सोडून देत आणि दुसर्याब कलावंतीणीबरोबर घरोबा सुरू करत. ती कलावंतीण मग दुसरा आधार शोधत असे. त्यांच्या संबंधातून जन्माला आलेली संतती फडावरच लहानाची मोठी होत असे. शाळेचं शिक्षण या मुलांपासून कोसो दूर असे. ही मुलं जरा कळती झाली की, फडावरच जुजबी कामं करत. फडावरच्या स्वैर वातावरणाचा त्यांच्यावर परिणाम होत असे. मुलींची अवस्था फारच वाईट असे. विठाबाईंनी याही परिस्थितीचा समर्थपणे सामना केला. तमाशाचा फड विठाबाईनं पुरता काबीज केला. लोक निखळ विठाबाईंचा नाच पाहायला आणि त्यांचं गाणं ऐकायला येत असत. भाऊ-बापूंचा तमाशा आता नावापुरता त्यांचा उरला होता. गण, गवळण झाली की विठाबाई बोर्डावर यायच्या. त्यांनी बोर्डावर पाय ठेवला की, शिट्ट्या आणि टाळ्यांचा कल्लोळ व्हायचा. मग रसिकांकडून फर्माईशी सुरू व्हायच्या. विठाबाईंच्या पायातल्या घुंगरांनी, अंगातल्या चैतन्यानं, प्रत्येक अदेनं रसिकांना घायाळ केलं होतं. भाऊ-बापूच्या तमाशातली गवळण, बतावणी, वगाचं सादरीकरण सगळंच अलातून असे. या वगांचे विषयही ‘शिवप्रतापासारखे’ ऐतिहासिक, ‘सत्यवान सावित्री’ सारखे धार्मिक तर कधी ‘चंद्र-मोहन’ किंवा ‘मेवाडचा कोळी’ सारखे सामाजिक असत. त्यामुळे तमाशाला येणारा प्रेक्षकवर्ग अगदी शहरातल्या बुद्धिजीवीपासून खेड्यातील अडाणी माणसापर्यंत सर्व थरातला असे. साहित्याची आणि लोककलेची आवड असणार्याल बहुतेकांनी भाऊ-बापूंचा तमाशा पाहिला होता. संगीत नाटक अकादमीच्या समितीवर असणार्या काही ज्येष्ठ कलावंतांनीही हा तमाशा पाहिला होता. त्यांनी भाऊ-बापूंच्या तमाशाची समितीकडे शिफारस केली. हा तमाशा कलेच्या माध्यमातून लोकशिक्षणाचा कसा प्रचार करतो याची माहिती दिली. त्यांच्या या शिफारसीमुळेच भाऊ-बापूंच्या तमाशाला तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्यासमोर आपली कला सादर करण्याची संधी मिळाली. या वेळीही विठाबाई कार्यक्रमाच्या मुख्य आकर्षण ठरल्या. दिल्लीकरांकडून शाबसकी मिळवूनच त्या घरी परतल्या. लवकरच नाटक अकादमीच्या परीक्षक मंडळानं पुरस्कारासाठी भाऊ-बापूंच्या तमाशाची निवड केली आणि तमाशा क्षेत्रात राष्ट्रपती पुरस्कार मिळवणारा तो पहिला तमाशा ठरला. सरकार दरबारी असं कौतुक झाल्यावर मग विठाबाईंनी मागं वळून पाहिलं नाही. तमाशातले त्यांचे स्पर्धक आता खूप मागं पडले होते. तमाशा म्हणजे विठाबाई असं समीकरण रूढ झालं होतं. आपला जन्म केवळ कलेची सेवा करण्यासाठी झालाय अशीच त्यांची धारणा होती. विठाबाईंची आपल्या कलेवरची निष्ठा ही अशी होती. त्यांच्या या स्वभावामुळेच त्यांनी अनेक माणसं जोडली. काही त्यांच्या वडिलांच्या काळापासून होती. त्यांच्या मदतीनं त्यांनी अनेक ठिकाणी आपली कला नेली. १९६२ मध्ये विठाबाईंच्या आयुष्यात आणखी एक महत्त्वपूर्ण घटना घडली. विठाबाई आणि त्यांच्या सहकार्यां्ना लष्करातील जवानांची करमणूक करण्यासाठी नेफा सीमेवर जाण्याचं आमंत्रण मिळालं. विठाबाईंच्या कलेचा हा एक प्रकारे सन्मान होता. खरं तर त्या वेळी विठाबाईंची लेक मालती अवघी तीन महिन्यांची होती. पण आपलं कर्तव्य श्रेष्ठ मानून त्यांनी मुलांना घरच्यांच्या हवाली केलं आणि आपल्या फडाबरोबर नेफा सीमेवर गेल्या. सीमेवरच्या बर्फाळ आणि जंगलाच्या प्रदेशात त्या आनंदानं राहिल्या. रोज एका छावणीवरून दुसर्याव छावणीवर जाणं, तिथे कला सादर करणं हे कष्टप्रद होतं. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या काळात त्यांना विश्रांतीची गरज होती, त्याच काळात ही दगदग त्या सोशीत होत्या. कालांतराने विठाबाईंच्या वडिलांचं-भाऊ खुडेंचं-आणि चुलत भाऊ बापू खुडेंचं निधन झाल्यावर तमाशाची सगळी सूत्रं त्यांचा दुसरा चुलत भाऊ सावळाराम यानं हाती घेतली. पण त्याच्या काळात फडात हेवेदावे सुरू झाले. आर्थिक स्थितीही ढासळली. विठाबाई आणि सावळाराम यांच्यात वितुष्ट आलं. याचा परिणाम एवढाच झाला की, विठाबाई आपल्या मुलींसोबत भाऊ-बापूंच्या तमाशातून बाहेर पडल्या आणि त्यांनी विठा-भाऊ (मांग) नारायणगावकर असा स्वतंत्र फड सुरू केला. त्यांच्या तमाशाचा लौकिकही आता दिवसेंदिवस वाढत होता. त्यांच्या संपर्कात राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि कला क्षेत्रातली मोठ-मोठी मंडळी येत होती. अशा रीतीने नारायणगावच्या गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या रसिकांच्या कानात विठाबाईंच्या पायातल्या चाळाचे बोल, गळ्यातले लावणीचे सूर निनादू लागले. विठाबाईंची आर्थिक बाजूही भरभक्कम झाली होती. रसिकांनी त्यांच्यावर मुक्तहस्ते उधळलेल्या पैशामुळे नावलौकिकाबरोबरच चांगला पैसाही त्या गाठीला बांधत होत्या. पण जवळच्याच लोकांनी त्यांचा विश्वासघात केला. पण विठाबाईंनी पुन्हा मुंबईचे जुने ठेकेदार प्रभाकर कामेरकर यांच्या मदतीनं नव्यानं फड सुरू केला. नव्यानं माणसं बांधली. या वेळी त्यांची मुलगी मालतीही त्यांच्या मदतीला होती. पण विठाबाई आयुष्यातल्या अनेक चढ-उतारांनी खचल्या होत्या. अधून-मधून त्यांना गोत्यात आणणार्याू नातेवाईकांच्या कारवाया, थोरली मुलगी मंगला बनसोडे हिचं विभक्त होणं, खुद्द विठाबाईंच्या तमाशाच्या बसला झालेला अपघात या सर्व घटनांनी त्यांचं मनोधैर्य खचत होतंच पण त्या कर्जातही आणखी रुतत होत्या. तसं त्यांच्या कलेनंही त्यांना भरभरून दिलं. त्यांनी केलेली रसिकसेवा आणि कलेची सेवा सर्वपरिचित होती. त्यामुळे त्यांच्या पडत्या काळातही केवळ त्यांच नाव ऐकून त्यांना मदत करणारे अनेक जण होते. यात महत्त्वपूर्ण उल्लेख करावा लागेल तो लोकसत्ताचे तत्कालीन संपादक माधव गडकरी, वृत्तनिवेदक प्रदीप भिडे आणि तमाशाचे अभ्यासक प्रकाश खांडगे यांचा. या तिघांनी वृत्तपत्रातून, दूरदर्शनवरून विठाबाईंची परिस्थिती लोकांसमोर मांडली आणि त्यांच्यासाठी मदतीचा ओघ सुरू झाला. दुर्गाबाई भागवतांनी १०,००० रु. ची मदत केली. यातूनच या तमाशा सम्राज्ञीचा सत्कार करण्याची कल्पना पुढे आली. आणिमुंबईच्या एशियाटिक सोसायटीच्या सभागृहात विठाबाईंचा हा सत्कार सोहळा दुर्गाबाई भागवतांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमामुळे विठाबाईंचे कलेवरील प्रेम आणि निष्ठा पुन्हा एकदा रसिकांपुढे आली. विठाबाईंनी या पैशातून आपली जुनी देणी चुकती केली, गहाण पडलेल्या गाड्या सोडविल्या. इथून पुढे स्वत:च्या जिवावर फड चालवण्याची उमेद त्यांच्यात आता राहिली नव्हती. म्हणून आपला फड तिनं मुलीच्या फडात विलीन केला आणि स्वत: आपल्या वतनाच्या गावी म्हणजे नारायणगावला निघून गेल्या. पण माध्यमांच्या प्रसिद्धीमुळे त्यांचे नाव आता महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रात आदराने घेतले जात होते. त्यामुळे तमाशातून पूर्ण अंग काढून घेऊनही त्यांचे सत्कार समारंभ चालूच होते. याच काळात संगीत नाटक अकादमीच्या पुरस्कारासाठी विठाबाईंच्या तमाशाची दुसर्यां दा निवड झाली. त्यांना आपल्या आयुष्याचे सार्थक झाल्याचे समाधान वाटले. विठाबाईंना त्यांच्या आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यापर्यंत पुरस्कार मिळत होते. विठाबाई भाऊ (मांग) नारायणगावकर यांचे निधन १५ जानेवारी २००२ रोजी झाले.