एरंडोल (प्रतिनिधी) :- पुण्यात १७ ते १९ जानेवारी २०२५ दरम्यान आयोजित तीन दिवसीय ‘पुणे आंतरराष्ट्रीय व्यंगचित्र प्रदर्शन २०२५’ ला रसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. युवा संवाद सामाजिक संस्था, पुणे आणि कार्टुन कंबाईन्स संस्था, महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने बालगंधर्व कलादालनात या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
सन्मान व गौरव...
तिसऱ्या दिवशी, १९ जानेवारी रोजी, सुप्रसिद्ध युवा नेते आमदार रोहित पवार यांच्या हस्ते काही नामवंत व्यंगचित्रकारांचा गौरव करण्यात आला. ॲग्रोवनचे लहू काळे, बोलक्या रेषाकार घनश्याम देशमुख, दै. प्रभातचे धनराज गरड, मार्मिकचे शरद महाजन, गौरव सर्जेराव आणि अन्य व्यंगचित्रकारांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
प्रदर्शनाची वैशिष्ट्ये...
या प्रदर्शनात महाराष्ट्र तसेच देशविदेशातील २८० व्यंगचित्रकारांची चित्रे प्रदर्शित केली गेली.काही व्यंगचित्रांनी हास्याची कारंजी फोडली तर काहींनी प्रेक्षकांना विचारमग्न केले.राजकीय, सामाजिक, पर्यावरणीय, तंत्रज्ञान, प्रदूषण, पाणीटंचाई अशा विविध विषयांवर आधारित व्यंगचित्रांनी प्रेक्षकांना आकर्षित केले.
प्रारंभ व प्रमुख उपस्थिती...
प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी झाले. यावेळी दै. प्रभातचे संपादक अविनाश भट, ज्येष्ठ चित्रकार मुरली लाहोटी, ज्येष्ठ व्यंगचित्रकार वैजनाथ दुलंगे, बोलक्या रेषाकार घनश्याम देशमुख, सकाळ ॲग्रोवनचे लहु काळे, व्यंगचित्रकार शरद महाजन, गौतम दिवार, गणेश जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रात्यक्षिके आणि परिसंवाद...
शनिवारी (दि. १८) आणि रविवारी (दि. १९) व्यंगचित्र प्रात्यक्षिके आणि परिसंवाद आयोजित करण्यात आले.यावेळी घनश्याम देशमुख व गौरव सर्जेराव यांनी प्रात्यक्षिके सादर केली.या उपक्रमांना प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.
सहकार्य व आयोजन...
‘कार्टुनिस्ट कंबाईन्स’ संस्थेच्या सहकार्याने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. हा महोत्सव यंदा दुसऱ्या वर्षी साजरा करण्यात आला.
रसिकांची प्रतिक्रिया...
पुण्यातील रसिकांनी या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला. महोत्सवाने हसवतानाच विविध गंभीर सामाजिक विषयांवर विचार करण्यास प्रवृत्त केले.कार्यक्रमाचे संयोजक धनराज गरड यांनी प्रास्ताविक केले, तर आभार प्रदर्शन दीपक कसबे यांनी केले.