"कासोद्यात इतिहास घडला वसंत हंकारेंच्या कार्यक्रमाने रचला विक्रम...रस्ते बंद, पार्किंग फुल्ल, श्रोत्यांच्या डोळ्यात गंगायमुना !" |
एरंडोल (कासोदा) :-दि.१७ जानेवारी रोजी आई व बाप समजून घेतांना हा विषय घेऊन कासोदा पोलीस स्टेशन व या कार्यक्रमासाठीची उत्सव समिती यांच्या परिश्रमातून कासोद्यात क.नं.मंत्री विद्यालयाच्या आवारात वसंत हंकारे यांचे तब्बल दोन तासांच्या वर झालेले व्याख्यान गाव व परिसरात सर्वत्र चर्चेत आहे.
कुण्या धर्माचा, कुण्या पक्षाचा प्रचार करायला मी आलेलो नाही, मी आई व बाप पेरायला आलो आहे,अशी सुरवात करुन श्री हंकारे यांनी काही क्षणातच प्रत्येक श्रोत्यांवर भावनिक विजय मिळवला.कन्या विद्यालयाच्या पटांगणावर १३० मंडप हाऊसफुल्ल झाले होते व जेवढी संख्या बसलेली होती तेवढेच लोक मंडपाच्या बाहेर ऊभे होते,आवारातील जागा अपूरी पडली एवढी दाद कासोदा व परिसरातील जनतेने या कार्यक्रमासाठी दिली आहे.
परिसरातील सर्व विद्यालये, कार्यक्षेत्राबाहेरील अनेक विद्यालयांचे विद्यार्थी व पालक शिक्षकांसह यावेळी आवर्जून आले होते,वसंत हंकारेंच्या प्रत्येक भावनिक शब्दांसोबत मंडपातील महिला व विद्यार्थ्यींनी अक्षरशः हसमुसून रडत होत्या,नागरिकांना देखील अश्रू लपवता येत नव्हते,वर्दीतले कठोर एपीआय श्री. निलेश राजपूत देखील किती हळवे आहेत, हे संपूर्ण श्रोते अनुभवत होते, कारण ते व्यासपीठासमोरच बंदोबस्तासाठी सर्वांसमोर उभे होते,पण डोळ्यातल्या घळघळ वहाणार्या आसवांना ते रोखू शकत नव्हते.या वक्त्याबाबत जसे ऐकले होते, त्यापेक्षा जास्त चांगले व्याख्यान आईची माया व बापाच्या मेहनतीबाबत वसंत हंकारे यांनी वास्तव मांडले. गावकर्यांनी या उपक्रमास अभूतपूर्व प्रतिसाद दिल्यामुळे हा कार्यक्रम कासोद्याच्या इतिहासात नोंद घेण्याएवढा सुंदर झाला आहे.