एरंडोल :- राज्य परिवहन महामंडळाच्या एरंडोल बस आगारातर्फे इंधन बचत या महत्त्वपूर्ण विषयावर विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन डी.डी.एस.पी. महाविद्यालयाचे प्राध्यापक एन.ए. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आगार प्रमुख विजय पाटील होते. कार्यक्रमाची सुरुवात आगार लेखाकार रविंद्र पाटील यांच्या प्रास्ताविकाने झाली, तर सूत्रसंचालन वरिष्ठ लिपिक सतीश महाजन यांनी केले.
प्रमुख वक्ते प्रा. एन.ए. पाटील यांनी मार्गदर्शन करताना इंधन म्हणजे काय, त्याचे प्रकार, तसेच इंधनाची बचत का आणि कशी करावी याबाबत उपस्थितांना माहिती दिली. त्यांनी इंधन बचतीसाठी पुढील उपाय सुचवले:
1. वाहनाचा वेग हळुवारपणे वाढवून स्थिर गती राखा.
2. ट्रॅफिक सिग्नल लाल असल्यास इंजिन बंद करा.
3. टायरचा दाब नियमित मोजा आणि योग्य दाब कायम ठेवा.
4. वाहनाची नियमित सर्विसिंग करा.
5. वैयक्तिक वाहनांच्या वापराऐवजी सार्वजनिक वाहनांचा, विशेषतः बसचा वापर करा.
प्रा. पाटील यांनी "इंधन वाचवा, पैसा वाचवा, पर्यावरण वाचवा" असा महत्त्वपूर्ण संदेश दिला.या कार्यक्रमाला वाहन निरीक्षक योगिता बर्हाटे, हेड मेकॅनिक सुनील पाटील, दिनेश सपकाळे यांच्यासह वाहक, चालक आणि आगाराचे इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाने उपस्थितांमध्ये इंधन बचतीविषयी जागरूकता निर्माण केली.