जिल्ह्यात आयत खाऊ लोकांमुळे शेतकरी आत्महात्या करत आहेत- भाई मोहन गुंड
प्रकाश मुंडे/बीड जिल्हा प्रतिनिधी:-
बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर बोगस शेतकऱ्यांच्या नावाने पीक विमा भरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. केज तालुक्यातील 2023 च्या कालावधीत सुमारे 80% गावांमध्ये ग्रामपंचायत गायरान जमीन, शासकीय जमीन, लघु पाटबंधारे जमीन, देवस्थान व पडीक क्षेत्रावर 680 बोगस खातेदारांनी वेगवेगळ्या नावाने पीक विमा भरल्याचे उघड झाले आहे. हे खातेदार केज तालुक्यातील नसून, यांची चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई मोहन गुंड यांनी केली आहे.
भाई मोहन गुंड यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, आयतखाऊ लोक बोगस पीक विम्याचा लाभ घेत असून, त्यामुळे प्रामाणिक शेतकऱ्यांना हक्काचा विमा मिळत नाही. परिणामी, आर्थिक अडचणीत सापडलेले प्रामाणिक शेतकरी आत्महत्या करत आहेत.
महत्त्वाचे मुद्दे:
शासकीय, गायरान व देवस्थान जमिनींवर बोगस नावाने पीक विमा भरल्याचे उघड.
680 बोगस खातेदारांची चौकशी करण्याची मागणी.
संबंधित महा-ई-सेवा केंद्र व बोगस खातेदारांवर गुन्हे दाखल करण्याची विनंती.
भाई मोहन गुंड यांनी स्पष्टपणे इशारा दिला आहे की, जर दोषींवर कठोर कारवाई झाली नाही, तर शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल. त्यांनी या संदर्भात मुख्यमंत्री, कृषी मंत्री, जिल्हाधिकारी बीड, तहसीलदार केज आणि तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन सादर केले आहे.
निवेदनावर भाई मोहन गुंड, मंगेश देशमुख, अशोक रोडे, सुदर्शन देशमुख, महेश गायकवाड आदींच्या सह्या आहेत. बोगस पीक विम्याचा प्रकार गंभीर असून, यावर तातडीने कारवाईची गरज आहे, असे मत शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.