साखर आयुक्तांचे राज्यातील साखर कारखान्यांना आदेश
श्रीरामपूर / प्रतिनिधी:
सध्या महाराष्ट्रात साखर कारखान्यांचा ऊस गळीत हंगाम जोरात सुरू आहे. त्यासाठी बैलगाडीतून क्षमतेपेक्षा जास्त ऊसाचा भार लादून बैलांना क्रुर पद्धतीने वागणूक दिली जात असल्याचे ठिकठिकाणी रस्त्यांवर दिसून येते आहे. अशा पद्धतीने बैलांकडून क्षमतेपेक्षा जास्त ऊस वाहतूक करून घेऊन त्यांना क्रुरपणाची वागणूक देणारांविरूद्ध कारवाई करण्याचे आदेश राज्याच्या साखर आयुक्तांनी दिले आहेत.
राज्याचे साखर आयुक्त दीपक तावरे यांनी महाराष्ट्र राज्यातील सर्वच साखर कारखान्यांसह राज्यभरातील सर्व जिल्हाधिकारी तथा जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक सोसायटी, प्रादेशिक साखर सहसंचालक, महाराष्ट्र राज्य साखर कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक यांना याबाबत निर्देश दिले आहेत. श्रीरामपूर येथील प्रेरणा फाऊंडेशनच्या पल्लवी आल्हाट यांनी याबाबत साखर आयुक्त व पशुसंवर्धन आयुक्तांकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत साखर आयुक्तांनी संबंधितांना आदेश दिले आहेत.
बैलगाडीने ऊस वाहतूक करताना बैलांना क्रूरतेची वागणूक देण्यात येऊ नये, बैलांवर क्षमतेपेक्षा जास्त वजन लादू नये. सूर्योदयापूर्वी किंवा सूर्यास्तानंतर पशुधनाची पायी ने - आण करू नये. जखमी, आजारी कुपोषित किंवा जास्त वय असलेले बैलांचे स्वास्थ्य उचित रहावे यासाठी त्यांना सक्तीची विश्रांती देण्यात यावी. जनावरांना नऊ तासाहून अधिक काळ वाहतूक देऊ नये. दुपारी १२ ते ३ या वेळेत त्यांना विश्रांती देण्यात यावी. खाणेपिण्यासाठी चार किलोमीटरच्या पलीकडे प्राण्यांची ने - आण करता येणार नाही.अशा सूचनाही साखर आयुक्तांद्वारे महाराष्ट्रातील सर्व खाजगी व सहकारी साखर कारखान्यांच्या कार्यकारी संचालक, सरव्यवस्थापक यांना देण्यात आलेल्या आहेत.
पशुधनाची काळजी घेणे हे समाजातील प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य आहे तथा काळाची गरज देखील आहे,प्राणी हिताचा विचार करता आपण वरील सूचनांचे पालन करावे. असे आवाहन प्रेरणा बहुउद्देशीय संस्थेच्या पल्लवी आल्हाट यांनी केले आहे.
वृत्त विशेष सहयोग
ज्येष्ठ पत्रकार मिलिंदकुमार साळवे
वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111