दि. १४ जानेवारी २०२५ मकर संक्रांतीचा दिवस.. प्रहार जिल्हा प्रमुख पदाच्या निवडीच्या निमित्ताने आज महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर मार्गे जळगांव येथे जाणे झाले.. छञपती संभाजीनगर जिल्ह्याची हद्द संपण्यापूर्वी थोडे अगोदर अजिंठा लेणी असा फलक पहावयास मिळाला.. तो फलक पाहून गाडीतील सहकाऱ्यांना मी सहजच बोलून गेलो.. बालपणी सहली मध्ये येथे यायचे राहून गेले.. आणि डोळ्यासमोर बालपणीच्या शालेय सहलीच्या त्या आठवणी जाग्या झाल्या..
१९८४-८५ साल असावे.. तत्कालीन अहमदनगर जिल्हयातील म्हणजे आत्ताचा अहिल्यानगर जिल्हा मधील राहुरी तालुक्याच्या देवळाली प्रवरा येथील श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या ईयत्ता सहावीच्या वर्गात शाळा भरल्यावर क्लास सुरू असताना शिपाई नोटीस बुक घेऊन आला .. शिक्षकांनी त्या नोटिसीचे वाचन केले आणि वर्गामध्ये एकच चळवळ सुरू झाली.. सहलीची नोटीस होती.. वेरूळ अजिंठा सह तत्कालीन औरंगाबाद म्हणजे आत्ताच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या ठिकाणी सहल जाणार होती.. १२०/- (अक्षरी रूपये एकशे विस मात्र) सहलीची रक्कम आठ दिवसात नोटीस मध्ये दिलेल्या शिक्षकांकडे जमा करून सहलीसाठी नाव नोंदणी करावयाची होती.
सहलीच्या नोटीस मुळे वर्गातील मुलांमध्ये जणूकाही नवचैतन्य संचारले होते बहुतेक जण मला जायचे.. मला जायचे असे एकमेकांमध्ये कुजबुज करत होते..
माझ्या बेंचवर बसलेले व पुढे मागे बसणारे राजू पवार, दुर्गाप्रसाद तिडके, विजय शिंदे, यशवंत टीक्कल, शिवाजी पवार यांनी जवळपास जाण्याचे नक्की केले होते.. परंतु माझा मात्र चेहरा उतरलेला होता.. मी जाऊ शकेल की नाही हे सांगता येत नव्हते.. नुकतेच.. म्हणजे १९८१ मध्ये वडील वारले.. घरात अठरा विश्वे दारिद्रय सारखी परिस्थिती निर्माण झालेली.. त्यामुळे घरून सहलीसाठी पैसे मिळण्याची सुतराम शक्यता नव्हती.. घरी आल्यावर आईला कोणत्या तोंडाने सांगावे ते समजत नव्हते.. दुसऱ्या दिवशी घरी सहलीचा विषय काढल्यावर माझ्या अपेक्षेप्रमाणे घरून नकार मिळाला.. शाळेत सुरू असलेली सहलीची चर्चा.. बहुतेक मित्र सहलीसाठी पैसे भरल्याच्या गप्पा मारू लागले.. तसतसा जीव कासावीस होऊ लागला.. शाळेतून घरी आल्यावर रोज सहलीसाठी रडू यायचे.. सर्व मित्र सहलीला जाणार आणि मी मात्र शाळेतच राहणार ही कल्पना सहन होत नव्हती.. सात दिवस संपत आले तरीही घरून सहलीच्या रकमेची व्यवस्था होऊ शकली नाही.. मुदत संपण्याच्या शेवटच्या दिवशी दिवसभर रडु आवरेना.. शेवटी कशीतरी एकशे वीस रूपयांची व्यवस्था झाली.. परंतू सहलीची फी भरण्याची मुदत संपली.. आणि एस टी महामंडळाच्या ज्या बसेस केल्या होत्या त्यातील पूर्ण शीटही संपले. म्हणजे जाणारे एकूण मुलांचा कोठा पूर्ण झाला.. त्यामुळे सहलीच्या पैशांसाठी घरी कराव्या लागलेल्या आठ दिवसाच्या संघर्षानंतर आता गाडीत जागा नसल्याने दुसरा संघर्ष समोर उभा राहिला.. सहज जाण्यासाठी केवळ पाच दिवसांचा अवधी शिल्लक होता.. सर्व मित्रांची तयारी जोरात सुरू होती.. कुणी नवीन बॅग घेतली होती तर कुणी कॅमेरा घेतला होता.. मी मात्र कुठल्याही चर्चेत सहभागी होऊ शकत नसल्याने मन व्याकूळ होत होते.. सरांकडे पैसे देऊन ठेवलेले होते.. मात्र गाडीत जागा नसल्याने मी वेटिंग लिस्ट मध्ये होतो.. सहलीचे पैसे जबरदस्तीने द्यावे लागल्याने घरातही वातावरण फारसे काही चांगले नव्हते.. शिक्षकांची धावपळ सुरू होती प्रवासाचे नियोजन सुरू होते.. माझा मात्र जीव टांगणीला लागला होता.. कशातच लक्ष लागत नव्हते.. सहल निघण्यासाठी एक दिवस बाकी असताना वर्गामध्ये अचानक शिपाई मला बोलावण्यासाठी आला.. दिघे सरांनी टीचर रूम मध्ये बोलावले होते.. सरांकडे गेल्यावर त्यांनी मला सहलीचे पैसे परत घेऊन जाण्यास सांगितले.. मला तर त्या अवस्थेत किती वाईट वाटले असावे हे न सांगितलेले बरे.. तितक्यात पाठीमागून कुणीतरी शिक्षक बोलले की इयत्ता दहावी मधील बीबी वाळके यांना काहीतरी अडचण आल्याने त्या जाऊ शकत नाही.. त्यांना एकदा विचारून घ्या.. दिघे सरांनी मला लगेच वरच्या मजल्यावर असलेल्या इयत्ता दहावीच्या वर्गातील त्या वाळकेला बोलावनेसाठी मला पाठवले.. मी धावतच वर गेलो व त्या वर्गातील वाळके यांना दिघे सरांनी बोलावल्याचा निरोप दिला.. आणि मी सरळ खाली येऊन दिघे सरांजवळ येवून उभा राहिलो.. दिघे सरांच्या जवळ माझ्या पाठीमागून आलेल्या त्या वाळकें नावाच्या मुलीला सरांनी सहली बद्दल विचारणा केली असता तिने घरातील काही अडचणीमुळे येता येणार नाही असे सांगितले त्यामुळे तिच्या लिखित परवानगीने तिची सहल रद्द करण्यात आली व त्या जागेवर माझे नाव निश्चित झाल्याने माझा जीव भांड्यात पडला.. माझा तर आनंद गगनात मागेन असा झाला.. आठ दिवसांपासून सहलीसाठी सुरू असलेला माझा संघर्ष अखेर थांबला.. त्या वाळके नावाच्या मुलीच्या जागेवर माझे नाव निश्चित झाल्याने मी व माझेसह इतर दहा मुलांना मुलींसाठी आरक्षित असलेल्या बसमध्ये मागील बाजूला जागा मिळाली.. सहलीची नक्की तारीख आठवत नाही .. परंतु भल्या पहाटे शाळेमधून सहल रवाना झाली..
वेरूळ अजिंठा, दौलताबाद किल्ला, बिबी का मकबरा अशी सहल होती.. दौलताबादचा किल्ला पाहून झाल्यावर आम्ही सर्वजण किल्ल्यासमोर असलेल्या चहावाल्याकडे चहा घेत असताना .. वेरूळ पाहून झाल्यावर आपण अजिंठ्याला कधी जाणार असा सरांना प्रश्न केल्यानंतर समजले की अजिंठा लेणी वेरूळपासून शंभर ते दीडशे किलोमीटर अंतर दूर असल्याने अजिंठा लेणीचा या सहलीमध्ये सहभाग नाही.. त्या क्षणापासून आज पावतो अजिंठा लेणी पाहण्याची माझी इच्छा तशीच राहून गेली होती.. ती आज पुर्ण झाली.. अजिंठा लेणीच्या परिसरात फिरताना मला आजही माझ्या त्या बालपणीच्या सहलीचा प्रत्येक क्षण जसाच्या तसा आठवत होता.. माझ्यासोबत असलेले सर्व सहकारी अजिंठा परिसर पाहण्यात दंग असताना मी मात्र भूतकाळात डुबून गेलो होतो..
अजिंठा लेणी ह्या तालुका सोयगाव छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील इ.स. पूर्व २रे शतक ते इ.स. ४थे शतक अशा प्रदीर्घ कालखंडात निर्मिलेल्या २९ बौद्ध लेणी आहेत.
छत्रपती संभाजीनगर शहरापासून १०० ते ११० कि.मी. अंतरावर वाघूर नदीच्या परिसराशेजारी या लेणी आहेत. ह्या लेणी नदीपात्रापासून १५-३० मीटर (४०-१०० फूट) उंचीवर विस्तीर्ण अशा डोंगररांगामधील कातळांवर कोरल्या आहेत.
बौद्ध धर्माचा वारसा जतन करणारी प्रदीर्घ ऐतिहासिक कालखंडाची पार्श्वभूमी लाभलेली अजिंठा लेणी या भारताची जागतिक आंतरराष्ट्रीय पर्यटनासाठी ठळक ओळख करून देणाऱ्या महत्त्वाच्या लेणी आहेत. लेणी घनदाट जंगलाने वेढलेल्या आहेत. भारताच्या केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या प्रतिष्ठित पर्यटन स्थळ प्रकल्पात देशातील १२ पर्यटन स्थळांची निवड करण्यात आली असून महाराष्ट्रातील अजिंठा व वेरूळच्या लेण्यांचा या यादीत समावेश आहे. अजिंठा लेणी ही जागतिक वारसा स्थान म्हणून युनेस्कोने इ.स. १९८३ साली घोषित केली आहे. आणि या लेण्यांना भारतातील पहिल्या जागतिक वारसा स्थळाचा मान आहे. जून २०१३ मध्ये महाराष्ट्राच्या सात आश्चर्यांची घोषणा करण्यात आली असता त्यात अजिंठा लेणी हे प्रमुख आश्चर्य ठरले आहे. लेण्यांमधील चित्रांपैकी एका लेण्याचे चित्र भारतीय चलनातील २० रुपयांच्या एका नोटेवर आहे.
अजिंठा लेण्यांत गौतम बुद्धाच्या विविध भावमुद्रा तसेच बौद्ध तत्त्वज्ञानाला चित्रशिल्प रूपात व्यक्त करणाऱ्या शिल्पकलेचा अद्वितीय आविष्कार पाहायला मिळतो. अशी ही अजिंठा लेणी देशी पर्यटकांसोबतच प्रामुख्याने विदेशी पर्यटकांच्या सर्वाधिक पसंतीचे पर्यटन स्थळ ठरले आहे. चित्र—शिल्पकलेचा नितांतसुंदर अनुभव देण्याऱ्या या लेण्यांमधून त्या काळात वापरण्यात आलेल्या रंगछटा पर्यटकांना पाहावयास मिळतात.
प्राचीन भारतात धर्मशाळा, लेणी क्वचित मंदिरेसुद्धा मुख्यत्वे व्यापारी मार्गांवर विश्रांतीसाठी उभारण्यात येत असत. त्यांचा उद्देश वाटसरूंना सुरक्षित आश्रय स्थान मिळावे असा असे. त्यांना राजाश्रय, धर्माश्रय व लोकाश्रय असे. अजिंठा गावाजवळच्या लेण्यांची निर्मितीही याच उद्देशातून सुरू झाली असावी असे मानले जाते.
या लेण्यांचा शोध ब्रिटिश भारताच्या मद्रास इलाख्यातील ब्रिटिश अधिकारी जॉन स्मिथ हा वाघाच्या शिकारीसाठी गेल्याने २८ एप्रिल, इ.स. १८१९ रोजी लागला. स्मिथने येथील दहाव्या क्रमांकाच्या लेणीतील एका खांबावर आपले नाव आणि तारीख कोरून ठेवल्याचे आजही अंधुकपणे दिसून येते. पुरातत्त्वशास्त्रीय पुराव्यानुसार ही लेणी दोन वेगवेगळ्या कालखंडांत निर्माण केली गेली. ९, १०, १२, १३ व १५-अ ही लेणी हीनयान कालखंडात कोरली गेली असावीत. हा कालखंड साधारणतः इ.स. पूर्व दुसऱ्या शतकाच्या सुमारास सुरू झाला. या सगळ्या लेण्यांतून बुद्धांचे दर्शन स्तूप-रूपांत होते. या व्यतिरिक्त १ ते २९ क्रमांकांची लेणी साधारणतः ८००-९०० वर्षांनंतर (इ.स.च्या सहाव्या व सातव्या शतकाच्या आसपास) महायान कालखंडात निर्माण केली गेलेली असावीत. या लेण्यांतून बुद्धांचे सर्वसामान्य लोकांस परिचित असे रूप दिसून येते. महायान लेणी वाकाटक राजांच्या राजवटीत निर्मिली गेली, त्यामुळे त्यांस बऱ्याचदा वाकाटक लेणी असेही संबोधले जाते. वाकाटक साम्राज्याच्या ऱ्हासानंतर लेण्यांची निर्मिती अचानक थांबली व ही लेणी योजित भव्यतेपासून वंचितच राहिली.
मध्ययुगातील अनेक चिनी बौद्धधर्मीय प्रवाशांनी अकबराच्या काळापर्यंत उपलब्ध असलेल्या आपल्या प्रवासवर्णनांत या लेण्यांचा उल्लेख केला आहे. जंगलाने वेढलेल्या असल्याने या लेणी अज्ञात होत्या. (सर्व संदर्भ विकी पिडिया)
अशा सुप्रसिद्ध पर्यटन स्थळाला भेट देण्याची आज योगायोगाने संधी मिळाल्याने मी धन्य झालो.. आणि त्यामुळें बालपणीच्या सहलीत राहून गेलेली इच्छाही पुर्ण झाली. नव्हे नव्हे मला पुन्हा बालपणात जाता आले हा आनंद कोणत्या शब्दात व्यक्त करावा ते समजत नाही.. आम्ही सर्वजण तेथून बाहेर पडत असताना दक्षिण भारतातील एक कुटुंब आमच्यासमोर निघाले होते त्यांना सहजच विचारले कुठून आलात तर त्यांनी हैदराबाद असे उत्तर दिले.. इतक्या लांबून पर्यटक या ठिकाणी भेट द्यायला येतात आणि आपण मात्र जवळ असूनही अद्याप येऊ शकलो नाही याची खंत त्या क्षणाला जाणवली आणि त्या पर्यटकांना मी हे बोलूनही दाखवले.. आणि त्याच पर्यटकांना विनंती करून माझ्या मोबाईल मध्ये आमच्या सर्वांचा ग्रुप फोटो घेण्याची त्यांना विनंती केली.. त्यांनीही ती तात्काळ मान्य केली व आमच्या सर्वांचा ग्रुप फोटो त्या ठिकाणी काढला त्याबद्दल त्यांचे मनस्वी आभार व्यक्त करून आम्ही त्या ठिकाणावरून परतीच्या प्रवासाला निघालो.. प्रहार जनशक्ती पक्षाची जिल्हाप्रमुखांची निवड निश्चित करण्यासाठी जळगाव मध्ये असलेल्या बैठकीच्या निमित्ताने आज या ठिकाणी येण्याची मला संधी मिळाल्याबद्दल प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अनिल भाऊ चौधरी यांचे सह प्रहारचे नूतन अहिल्यानगर उत्तर जिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर सांगळे व युवक जिल्हाप्रमुख पांडुरंग अवताडे यांच्यासह समवेत असलेल्या सर्व प्रहार कार्यकर्त्यांचे हार्दिक आभार.. व मनःपूर्वक धन्यवाद.
लेखक..
आप्पासाहेब भिमराज ढूस
देवळाली प्रवरा, ता. राहुरी
९८२३०३५९३६