पाकिस्तानने इंग्लंडविरुद्धच्या घरच्या कसोटीत जी विजयी कामगिरी केली होती, ती वेस्ट इंडिजविरुद्धही कायम ठेवली आहे. त्यांनी मुलतान कसोटी १२७ धावांनी जिंकली. इंग्लंडविरूध्दच्या मालिकेप्रमाणे या सामन्यातही पाकिस्तानी फिरकी गोलंदाजांची ताकद पुन्हा पाहायला मिळाली. वेस्ट इंडिजच्या सर्व विकेट फक्त २० फिरकीपटूंनी घेतल्या. तर पाकिस्तानी फिरकी जोडी साजिद खान आणि नोमान अली यांनी पुन्हा एकदा कहर केला. या सामन्यात दोघांनी मिळून एकूण १५ विकेट घेतल्या. दुसऱ्या डावात पाकिस्तान संघाने २५१ धावांचे लक्ष्य ठेवले होते, ज्याच्या प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा संपूर्ण संघ १२३ धावांवर गडगडला. पाकिस्तानचा घरच्या मैदानावर हा सलग तिसरा विजय आहे. याआधी सलग दोन सामन्यांत फिरकीपटूंच्या जोरावर इंग्लंडला पराभूत करून मालिका जिंकली होती.
वेस्ट इंडिजचा संघ दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी पाकिस्तान दौऱ्यावर आहे. त्याचा पहिला सामना मुलतानमध्ये खेळला गेला, जो कमी धावसंख्येचा होता. दोन्ही संघांना मोठी धावसंख्या करण्यात अपयश आले. संपूर्ण सामन्यात फिरकीपटूंचे वर्चस्व दिसून आले. १७ जानेवारीपासून सुरू झालेल्या या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार शान मसूदने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सौद सकीलच्या ८४ धावा आणि मोहम्मद रिझवानच्या ७१ धावांच्या जोरावर पाकिस्तानला २३० धावा करता आल्या.
प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा संघ अवघ्या १३७ धावांत गारद झाला आणि पाकिस्तानला ९३ धावांची आघाडी मिळाली. दुसऱ्या डावात पाकिस्तानने १५७ धावा केल्या आणि एकूण २५१ धावांचे लक्ष्य विंडीजपुढे ठेवले. पाकच्या या डावात कर्णधार शान मसूदने ७० चेंडूत ५२ धावांची शानदार खेळी केली. त्याचा पाठलाग करताना कॅरेबियन संघ १३७ धावांवर सर्वबाद झाला आणि पाकिस्तानने १२७ धावांनी सामना जिंकला.
संपूर्ण सामन्यात फिरकीपटूंचे वर्चस्व दिसून आले. वेस्ट इंडिजच्या फिरकीपटूंनी २० पैकी १४ विकेट घेतल्या, तर त्यांचे वेगवान गोलंदाज केवळ ३ विकेट घेऊ शकले. दुसरीकडे, पाकिस्तानच्या सर्व २० विकेट त्याच्या फिरकी गोलंदाजांच्या नावावर होत्या. इंग्लंड मालिकेचा नायक साजिद खानने सामन्याच्या पहिल्या डावात ४ आणि दुसऱ्या डावात ५ विकेट घेत एकूण ९ विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत. त्याचा सहकारी फिरकीपटू नोमान अलीने पहिल्या डावात ५ तर दुसऱ्या डावात एक बळी घेतला. उर्वरित ५ विकेट अबरार अहमदच्या नावावर होत्या. एवढेच नाही तर पाकिस्तानी संघाने जवळपास ५८ षटके टाकली मात्र केवळ एकच षटक वेगवान गोलंदाजाने टाकले. साजिद खानला त्याच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी सामनावीर म्हणून निवडण्यात आले.
वेस्ट इंडिजचा फिरकीपटू जोमेल वॉरिकनने रविवारी पाकिस्तानविरुद्ध सात विकेट घेत इतिहास रचला आहे. जोमेल हा सन १९५९ नंतर पाकिस्तानी भूमीवर पाच बळी घेणारा पहिला वेस्ट इंडिजचा फिरकी गोलंदाज ठरला आहे. त्याने सनी रामदिनचा ६६ वर्ष जुना विक्रम मोडला. त्याने २५ धावांत ४ बळी घेतले. जोमेल वॅरिकनच्या घातक गोलंदाजीच्या जोरावर वेस्ट इंडिजने पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी पाकिस्तानला दुसऱ्या डावात १५७ धावांत गुंडाळले. जोमेलने १८ षटकांत ३२ धावांत सात बळी घेतले.
जोमेल वॉरिकनने पाकिस्तानच्या मधल्या फळीतील आणि तळाच्या फळीतील फलंदाजांना टिकून राहण्याची संधी दिली नाही. पाकिस्तानने ५१ धावांत सात विकेट गमावल्या. वेस्ट इंडिजचा डावखुरा फिरकीपटू जोमेल वॅरिकनने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ३४९ आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५४ बळी घेतले आहेत. त्याने महान माल्कम मार्शलचा विक्रमही मोडला. त्याने पाकिस्तानमध्ये कसोटी क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजच्या गोलंदाजाने सर्वोत्तम गोलंदाजी करण्याचा विक्रम केला.
सौद शकील (दोन) धावा करून बाद झाला. वॅरिकनने त्याला ग्रीव्हजकरवी झेलबाद केले. यानंतर वारीकनं मोहम्मद रिझवान (२२) यालाही आपला शिकार बनवला. फलंदाजीला आलेल्या आगा सलमानने कामरान गुलामसह डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. ३८ व्या षटकात वॉरिकनने कामरान गुलामला (२७) बाद करून पाकिस्तानला सहावा धक्का दिला. नोमान अली (दोन), साजिद खान (पाच), खुर्रम शेहजाद (शून्य) बाद झाले. ४७ व्या षटकात गुडाकेश मोतीने आगा सलमानला (१४) बाद करत पाकिस्तानचा दुसरा डाव १५७ धावांवर संपवला.
पाकिस्तानमधील कसोटी डावात पाहुण्या गोलंदाजाची सर्वोत्तम कामगिरी- रवी रत्नायके (श्रीलंका), सियालकोट, येथे १९८५ मध्ये ८३ धावात आठ बळी.कपिल देव (भारत), लाहोर, १९८३ मध्ये ८५ धावात ८ बळी. जोमेल वॅरिकन (वेस्ट इंडीज) मुलतान, २०२५ येथे या सामन्यात ३२ धावात ७ बळी घेतले. मुलतानची खेळपट्टी निव्वळ आखाडा होती, त्यावर फलंदाजी करणं अतिशय कठीण काम होतं. थोडक्यात म्हणायचं तर ती फलंदाजांची कब्रस्तानच होती.
वास्तविक हि मालिक विश्व कसोटी चॅम्पियनशिप २०२३-२५ च्या चक्राचा एक भाग होती, मात्र अगोदरच्या मालिकांमध्ये गचाळ कामगिरी केल्यामुळे हे दोन संघ अंतिम फेरीच्या स्पर्धेतून आधीच बाद झाले आहेत. त्यामुळे हि मालिका केवळ औपचारीकता म्हणून खेळली जात आहे. आपणास ठाऊक आहेच की, डब्ल्यूटीसीचा अंतिम सामना ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका यांच्या दरम्यान जूनमध्ये लॉर्डसवर खेळला जाणार आहे.
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक
मो. क्रं - ९०९६३७२०८२