shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले महिला सबलीकरणाचा आदर्श

" क्रांतिज्योत पेटविली
सावित्रीबाई फुले यांनी
स्त्रीशिक्षणाचा दीपस्तंभ
फडकत आहे तो गगनी"
  भारतीय संस्कृतीचा आदर्श जपत कांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी पती महात्मा जोतीराव फुले यांच्या शैक्षणिक, सामाजिक, वाङमयीन कार्याची ज्ञानज्योत लावून ठेवली आहे. सावित्रीबाई फुले यांचा जन्म ०३ जानेवारी १८३१ रोजी सातारा जिल्ह्यातील नायगांव या खेड्यात झाला तर त्यांचे निधन पुणे येथे १० मार्च १८९७ रोजी झाले. सावित्रीबाई फुले यांना ६६ वर्षाचे आयुष्य लाभले. महात्मा जोतीराव फुले यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी पुणे येथे झाला तर त्यांचे निधन २८ नोव्हेंबर १८९० रोजी झाले. त्यांना ६३ वर्षाचे आयुष्य लाभले. समाजसेवा आणि शैक्षणिक क्रांतीचे हे पतीपत्नी म्हणजे भारतीय इतिहासातील एक आदर्श जोडपे आहे. आपले सर्व जीवन समाजाच्या उद्धारासाठी समर्पित करणारे हे दांपत्य पूजनीय, वंदनीय आणि सर्वांना दिशादर्शक ठरले आहे.


  नायगाव खेड्यातील खंडूजी नेवसे पाटील गावाचे पाटील होते. आई लक्ष्मीबाई नेवसे आदर्श गृहिणी होत्या. सावित्रीबाई ०९ वर्षाच्या असताना त्यांचा विवाह १३ वर्षीय जोतीराव फुले यांच्याशी झाला. जोतीराव यांची आई चिमणाबाई आणि वडील गोविंदराव शेरीबा फुले यांनी मुलांवर उत्तम संस्कार केले. जोतीराव ९ वर्षाचे होते तेव्हा त्यांच्या आईचे निधन झाले. आत्या सगुणाबाई यांनी जोतीरावांवर उत्तम संस्कार केले. हडपसर येथील इंग्रज अधिकाऱ्या च्या घरी त्या मुलांना सांभाळत असत, तेच संस्कार जोतीबावर झाले.हा परिवार मुळचा सातारा जिल्हयातील खटाव तालुक्यातील कटगुण येथील होता.जोतीबांचे आजोबा शेरीबा माधवराव गोऱ्हे हे पुणे येथे पेशवे दरबारी होते. पेशव्यांनी त्यांना फुलशेतीसाठी ३५ एकर जमीन दिली. गो-हे परिवार फुलांची शेती करीत, त्यामुळे पुढे गोऱ्हे आडनाव बाजूला पडून फुले आडनाव झाले. अशा या फुले परिवारात आल्यावर निरक्षर असलेल्या सावित्रीबाई यांना महात्मा फुले यांनी साक्षर केले. शिक्षण नसल्याने समाजात अन्याय, अत्याचार, लुबाडणूक, अंधश्रद्धा, जाचक रुढी, परंपरा यामुळे सर्वसामान्य समाज गलितगात्र झाला होता. महात्मा फुले यांनी समाजप्रबोधन आणि शिक्षणाचे कार्य सुरु केले.
" विद्येविना मति गेली
मतिविना नीती गेली
नीतीविना गती गेली
गतिविना शूद्र खचले
इतके अनर्थ एका अविद्येने केले."
   अज्ञानाचे खालचे मडके फोडले की बाकी समस्यांची उतरंड आपोआप ढासाळेल असे म्हणून जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाला महत्त्व दिले. ०१ जानेवारी १८४८ रोजी त्यांनी पुण्यात भिडेवाडा येथे मुलींची पहिली शाळा सुरु केली आणि स्त्री शिक्षणाचा प्रारंभ झाला. सावित्रीबाई पहिल्या शिक्षिका, मुख्याध्यापिका झाल्या. भारतीय माणसांनी सुरु केलेली ही पहिली मुलींची शाळा प्रगतीला पूरक ठरली. तत्कालिन कर्मठ समाजकंटकांनी शिक्षिका सावित्रीबाईंचे कार्य थांबविण्यासाठी प्रखर विरोध केला, त्यांच्यावर दगड, शेणमातीचा मारा केला, घरातील स्त्री शिकली तर तिने वाचलेला अक्षरांच्या अळया होऊन त्या पुरुषांच्या जेवणाच्या ताटात पडतील असा भ्रम निर्माण करण्यात आला, धर्म बुडाला-- जग बुडणार--कली आला" अशी समाजात भिती निर्माण केली गेली पण  सावित्रीबाईचे स्त्रीशिक्षणाचे कार्य थांबले नाही, केवळ ६ विद्यार्थिनीने सुरु झालेल्या या शाळांची संख्या वर्षभरात १८ झाली. 
 शिक्षणाबरोबर सावित्रीबाई फुले यांनी स्त्रीजागृती आणि स्त्रीरक्षण यांना महत्त्व दिले. बाला- जरठ विवाहाला विरोध केला. छोट्या मुली विधवा झाल्या की त्यांना कुरूप करण्यासाठी त्यांचे केशवपण केले जाई. छोटया बालविधवावर अन्याय, अत्याचार होत असत, त्या गरोदर राहत असत, काही बालविधवा आत्महत्या करीत , काही मुकपणाने अश्रू गिळत असत. अशा बालविधावांसाठी महात्मा फुले, सावित्रीबाईंनी  बालहत्या प्रतिबंधक गृह सुरु केले. बालविधवांचे कोणी केशवपण करू नये म्हणून त्यांनी नाभिक समाजाचे प्रबोधन केले. त्यांचा संप घडवून आणला, गृहआश्रमात विधवांना आश्रय मिळाला. अत्याचाराला बळी पडलेल्या काशीबाई या बालविधवा असलेल्या स्त्रीचे मूल सावित्रीबाई यांनी दत्तक घेतले, तोच यशवंत पुढे डॉक्टर झाला आणि या कार्याला त्याने वाहून घेतले.
  महात्मा फुले यांनी २४ सप्टेंबर१८७३ रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. सविजनिक सत्यधर्म पुस्तक लिहिले. सत्यशोधकी विवाह सुरु केले, या सर्व कार्यात        सावित्रीबाई फुले यांनी वाहून घेतले. महात्मा फुले यांनी सामाजिक प्रबोधनासाठी १८५५ मध्ये तृतीय रत्न नाटक लिहिले,१८६९ मध्ये शिवरायांचा पोवाडा लिहिला,१८७३ ला गुलामगिरी ग्रंथ लिहिला,१८८३ ला शेतकऱ्यांचा आसूड लिहिला. सत्सार अंक १,२ काढले, त्यातच ताराबाई शिंदे यांनी स्त्रीपुरुष तुलना दीर्घ निबंधलेख लिहून स्त्रीदास्य आणि स्त्रीशोषणावर प्रखर प्रकाश टाकला. सतीबंदी यासाठी संघर्ष सुरू ठेवला. महात्मा फुले यांच्यावर अनेक संकटे आली. घर सोडावे लागले पण दोघांचे कार्य थांबले नाही.२८ नोव्हेंबर१८९० रोजी महात्मा फुले यांचे निधन झाले, त्यांच्या अंत्यविधी प्रसंगी कोणी पुढे आले नाही त्यावेळी सर्व विधी सावित्रीबाई यांनी केले. सावित्रीबाई फुले यांनी १८५४ मध्ये 'काव्यफुले' १८९१ ला' सावित्रीबाईची गाणी', १८९२ साली' बावनकशी सुबोध रत्नाकर' कवितासंग्रह, जोतिबांची भाषणे संपादितपुस्तक प्रकाशित केले.१८९६-९७ मध्ये पुण्यात प्लेग रोगाची साथ सुरु झाली. इंग्रज सरकारने दडपशाही केली स्थलांतरित लोकांचे प्रश्न वाढले. सावित्रीबाईंनी पुण्याजवळ असलेल्या ससाणे माळावर दवाखाना सुरू केला. रोग्यांची त्यांनी सेवा केली, त्यातच त्यांनाही प्लेगची लागण झाली,    त्यातच त्यांचे १० मार्च १८९७ रोजी निधन झाले.
  " झाल्या सावित्रीबाई फुले
म्हणून शिकल्या मुली
क्रांतिज्योतीचा हा दीपस्तंभ
जपला पाहिजे गल्लोगल्ली"
  स्त्रीचा महिमा, स्त्रीची प्रतिष्ठा, तिची सुरक्षा आणि प्रागतिक अपेक्षा जपण्यातच क्रांतिज्योती सावित्रीबाईना खरी मानवंदना आहे !

डॉ.बाबुराव भामा दत्तात्रय उपाध्ये
श्रीरामपूर - भ्रमणसंवाद: ९२७००८७६४०

*लेख विशेष सहयोग
ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव 

*लेख प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस 
श्रीरामपूर - 9561174111
close