shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

चॅम्पियन ट्रॉफी उदघाटनासाठी रोहित शर्मा पाकिस्तानला जाणार का ?


              १९ फेब्रुवारी ते ९ मार्च २०२५ दरम्यान होणाऱ्या हायब्रीड मॉडेलमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीची तयारी जोरात सुरू आहे.  या स्पर्धेत एकूण आठ संघ सहभागी होणार आहेत.  भारत आणि पाकिस्तानला एकाच गटात ठेवण्यात आले असून सदर स्पर्धेसाठी या दोन्ही देशांनी अद्याप संघ जाहीर केले नाहीत. बाकी सहा संघांची घोषणा करण्यात आली आहे.  दरम्यान, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उद्घाटन सोहळ्या संदर्भात मोठी माहिती समोर आली आहे.


              वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, १९ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीचा उदघाटन सोहळा १६ किंवा १७ फेब्रुवारीला होऊ शकतो.  त्याच बरोबर या कार्यक्रमात भारतीय कर्णधार रोहित शर्मा सहभागी होईल, अशी आशा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) व्यक्त केली आहे.  पीसीबीशी संबंधित एका सूत्राने सांगितले की, ते आयसीसीकडून कर्णधारांच्या फोटोशूटचे वेळापत्रक आणि स्पर्धेपूर्वी पत्रकार परिषदेच्या माहितीची वाट पाहत आहे.  मात्र, उदघाटन सोहळ्याच्या ठिकाणाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

            आयसीसीच्या आजवरच्या परंपरेनुसार स्पर्धा सुरू होण्याच्या किमान दोन दिवस अगोदर सर्व सहभागी संघांचे कर्णधार ज्या मैदानावर स्पर्धेचा पहिला सामना होणार असतो तेथे निमंत्रीत केले जातात.  तेथे विजेत्या संघाला दिल्या जाणाऱ्या करंडकासह सर्व कर्णधारांचा सामुहिक फोटो काढला जातो. त्यानंतर एक विशेष पत्रकार परिषद होते,  त्यामध्ये सर्व संघनायक पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे देतात. अशी आयसीसी स्पर्धे पुर्वीची प्रथा आहे. मात्र यंदाची स्पर्धा संयोजक पाकिस्तान व त्यांचा कट्टर प्रतिस्पर्धी भारत यांच्यातील विसंवादामुळे संकरीत पध्दतीने खेळली जात असल्याने मुळ वादाचा मुद्दा भारतीय खेळाडूंची सुरक्षा हा असल्याने भारतीय कर्णधार रोहित शर्माला सदर मेगा इव्हेंटला हजर राहाण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून हिरवा कंदील मिळतो का नाही ? हा मोलाचा प्रश्न सध्या क्रिकेट जगतात मोठ्या चवीने चर्चीला जात आहे. बीसीसीआय जर भारतीय खेळाडूंना पाकिस्तानात न पाठविण्याच्या आपल्या धोरणावर अडून बसले तर यजमान पाकिस्तानचा फार मोठा हिरमोड होईल. तसेच आयसीसीही मोठी कुचंबना होईल. अशा परिस्थितीत आयसीसीला सदर कार्यक्रम दुबईत घेण्यावाचून दुसरा पर्याय असणार नाही. अशी बाब उद्भवलीच तर पीसीबी नेमका काय निर्णय घेईल यावरही क्रिकेट जगत लक्ष ठेवून आहे. परिस्थितीचा बारकाईने विचार केला तर बीसीसीआय रोहित शर्माला भारतीय मिडीया मॅनेजरसह पाकिस्तानला जाण्यास परवानगी देण्याची शक्यता वाटते.

               सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानला न जाणारा भारतीय संघ आपले सामने दुबईत खेळणार आहे.  भारताला २० फेब्रुवारीला बांगलादेशविरुद्ध पहिला सामना खेळायचा आहे तर २३ फेब्रुवारीला भारत आणि पाकिस्तान यांच्यात मोठा सामना होणार आहे.  सर्व संघ अ गट आणि ब गटात विभागले गेले आहेत. याशिवाय, सूत्राने सांगितले की पीसीबीला सर्व कर्णधार, खेळाडू आणि संघ अधिकाऱ्यांच्या व्हिसासाठी सरकारकडून मंजुरी मिळाली आहे.  तो म्हणाला, यात रोहित किंवा इतर कोणत्याही भारतीय खेळाडू किंवा अधिकाऱ्याचा समावेश आहे.  दुसऱ्या सूत्राने सांगितले की, पीसीबीने आयसीसीला स्पष्टपणे सांगितले आहे की उद्घाटन सोहळा पाकिस्तानमध्ये होणार आहे.  सूत्राने सांगितले की, हा सामान्य प्रोटोकॉल आहे की जर पहिला सामना १९ फेब्रुवारीला असेल तर उद्घाटन समारंभ १६ किंवा १७ फेब्रुवारी रोजी होईल.

              सध्याची पाकिस्तानची आर्थिक स्थिती कोणापासून लपलेली नाही.  याची झलक चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी निश्चित करण्यात आलेल्या तिकिटांच्या दरात पाहायला मिळते.  पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) आगामी स्पर्धेसाठी तिकीटाची किंमत १००० पाकिस्तानी रुपये ठेवली आहे.  विशेष म्हणजे भारतीय चलनानुसार तिकीटाची किंमत फक्त ३१० रुपये इतकी होते. पीसीबीने आपल्या देशात होणाऱ्या सामन्यांसाठी तिकिटाची किंमत निश्चित केली आहे.  मात्र, दुबईत होणाऱ्या भारताच्या सामन्यांचे तिकीट दर काय असतील हे सांगण्यात आलेले नाही. सुत्रांच्या माहितीनुसार, पीसीबीने कराची, लाहोर आणि रावळपिंडी येथे होणाऱ्या सामन्यांसाठी किमान तिकीटाची किंमत एक हजार पाकिस्तानी रुपये ठेवली आहे.  पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात रावळपिंडी येथे होणाऱ्या सामन्यांच्या तिकिटांची किंमत २००० पाकिस्तानी रुपये  (६२० भारतीय रुपये) आणि उपांत्य फेरीसाठी २५०० पाकिस्तानी रुपये (७७६ भारतीय रुपये) असेल.  पीसीबीने सर्व सामन्यांचे व्हिव्हिआयपी तिकीट बारा हजार  पाकिस्तानी रुपये (३७२६ भारतीय रुपये) ठेवले आहे, पण उपांत्य फेरीत त्याची किंमत २५००० पाक चलन (७७६४ भारतीय रुपये) असेल.  कराचीतील प्रीमियर गॅलरीचे तिकीट ३५०० पाकिस्तानी रुपये (१०८६ भारतीय रुपये), लाहोरमध्ये ५००० पाकिस्तानी रुपये ( १५५० भारतीय रुपये) आणि रावळपिंडीतील पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश सामन्याचे तिकीट ७००० पाकिस्तानी रुपये ( २१७० भारतीय रुपये) असतील.


              पीसीबीला कराचीतील व्हीआयपी गॅलरीची तिकिटे ७००० रुपये, लाहोरमध्ये ७५०० रुपये आणि बांगलादेश सामन्यांची १२५०० रुपये ठेवायची आहेत.  सर्वसामान्य प्रेक्षकांसाठी अठरा हजार तिकिटे उपलब्ध असतील पण एका वेळी किती तिकिटे खरेदी करता येतील आणि ती तिकिटे ऑनलाइन उपलब्ध होतील की नाही हे अद्याप ठरलेले नाही. आयसीसी स्पर्धेच्या नियमांनुसार, यजमान देश सामन्यांची तिकिटे विकतो आणि त्यातून मिळणारा महसूल आणि हॉस्पिटॅलिटी बॉक्स ठेवतो.  याशिवाय, आयसीसीकडून होस्टिंग फी देखील मिळते.  भारताचे सामने दुबईत होणार आहेत, त्यामुळे तिकीट आणि हॉस्पिटॅलिटी बॉक्समधून पैसे मिळतील असा पीसीबीचा विश्वास आहे.  एमिरेट्स क्रिकेट बोर्डाला ग्राउंड भाड्याचा समावेश असलेल्या ऑपरेटिंग खर्चाची तरतूद केली जाईल.

               रावळपिंडी व कराची येथील स्टेडियमचे कामं अंतिम टप्प्यात आले असले तरी लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमची बरीचशी कामे अपूर्ण असून २५ जानेवारीपर्यंत आयसीसीला सर्व स्टेडियम्स सुपूर्द करण्याचे पाकिस्तानने वचन दिले असले तरी पाक आपल्या शब्दास जागेल असे सध्या तरी वाटत नसून फेब्रुवारीच्या ८ तारखेपर्यंत सर्व मैदाने तयार होतील अशी प्राथमिक अपेक्षा आहे.

लेखक : - 
डॉ.दत्ता विघावे                        
क्रिकेट समिक्षक 
मो. क्रं - ९०९६३७२०८२
close