*स्वातंत्र्याची स्फुर्ती देण्याचे अतुलनीय कार्य जिजाऊंनी केले - आबीद खान
नगर / प्रतिनिधी:
जुलमी, अत्याचारी, परकीय सत्ताधीशांच्या जोखंडात शेकडो वर्षे खितपत पडलेल्या महाराष्ट्रासह मराठी मनाला स्वातंत्र्याची स्फुर्ती, प्रेरणा देण्याचे अतुलनीय कार्य राजमाता जिजाऊ यांनी केले असल्याचे प्रतिपादन मख़दुम एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष आबीद दूल्हेखान यांनी केले.
जिजाऊ जयंतीनिमित्त मखदुम सोसायटीच्यावतीने ऐतिहासिक वस्तू संग्रहालयातील जिजाऊं व शहाजी राजे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी इतिहासप्रेमी मंडळाचे अध्यक्ष आसिफ दुलेखान, इंजि.अभिजित वाघ, क्रांतीसिंह कामगार संघटनेचे कॉ.बहिरनाथ वाकळे, दत्ता वडवणीकर, अॅड.शिवाजीराव कराळे, संध्या मेढे, आर्कि.फिरोज शेख, इतिहासप्रेमी ठाकुरदास परदेसी आदि उपस्थित होते.
भैरवनाथ वाकळे म्हणाले की, रयतेच्या स्वतंत्र्य- सार्वभौम स्वराज्य निर्मितीची संकल्पनाच जिजाऊंची होती. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत इतिहासाला कलाटणी देण्याचे कार्य शिवछत्रपतींकडून जिजाऊंनी करवून घेतले. राष्ट्र निर्मितीच्या व्यापक भावनेने केलेले हे कार्य आजच्या पिढीला प्रेरणादायी आहे.
यावेळी बोलताना इंजि. अभिजित वाघ म्हणाले, शिवछत्रपतींना घडविणार्या आणि आयुष्यभर निरपेक्ष बुद्धीने कार्य करणार्या जिजाऊ श्रीमान योगिनी ठरल्या. राजाचं जनतेशी कल्याणकारी नात असतं, याउपर जिजाऊंचे जनतेच्या वेदनेशी नातं होतं. आपल्या रयतेची पोटच्या पोराप्रमाणे काळजी करणार्या राजमाता- राष्ट्रमाता जिजाऊच होत्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दता वडवणीकर यांनी केले. तर आभार आसिफ खान यांनी मानले. याप्रसंगी इतिहासप्रेमी मंडळ, मराठा सेवा संघ, मुस्कान सोशल फौडेशन, राजूभाई मित्र मंडळ आदि संघटनांचे पदाधिकारी, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*वृत्त विशेष सहयोग
ज्येष्ठ पत्रकार आबीद खान - अहमदनगर
*वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111