एरंडोल :- शिक्षण प्रसारक मंडळ संचलित न्यू इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये राजमाता जिजाऊ साहेब आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती अत्यंत उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाची सुरुवात शाळेचे प्राचार्य हॅरी जॉन सर आणि उपप्राचार्या सरिता पाटील मॅडम यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आली.
*विशेष आकर्षण: विद्यार्थींची वेशभूषा आणि मनोगते*
शाळेतील लहानग्या विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ साहेब, छत्रपती शिवाजी महाराज, आणि स्वामी विवेकानंद यांची वेशभूषा परिधान करून त्यांचे विचार आणि जीवनचरित्र प्रभावीपणे सादर केले.प्रणव जाजू, काव्या गायकवाड, ललित धनगर, कर्तव्य ओवेक चौधरी, आणि हितेशा भावसार यांनी आपल्या मनोगतातून या महान व्यक्तींच्या जीवनातील प्रेरणादायी गोष्टी विषद केल्या.
*प्राचार्यांचे मार्गदर्शन...*
कार्यक्रमादरम्यान शाळेचे प्राचार्य हॅरी जॉन सर यांनी विद्यार्थ्यांना राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या महान कार्याचा जीवनपट थोडक्यात उलगडून दाखवला. त्यांनी या दोन ऐतिहासिक व्यक्तींचे विचार आणि कर्तृत्व विद्यार्थी जीवनासाठी कसे मार्गदर्शक ठरू शकते, यावर विशेष भर दिला.
*सूत्रसंचालन आणि उपस्थिती...*
कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन नववी वर्गातील विद्यार्थिनी आकांक्षा इंगळे यांनी केले. या प्रसंगी शाळेचे प्राचार्य, उपप्राचार्य, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामुळे विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे वातावरण निर्माण झाले आणि दोन थोर व्यक्तिमत्त्वांच्या विचारांवर आधारीत मूल्ये आत्मसात करण्याची संधी मिळाली.