एरंडोल : शास्त्री फाउंडेशन संचालित शास्त्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, एरंडोल येथे दिनांक 24 जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती लाभली होती. व्यासपीठावर महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष व प्राचार्य डॉ. विजय शास्त्री, सचिव सौ. रूपा शास्त्री, एरंडोलचे तहसीलदार प्रदीप पाटील, नायब तहसीलदार देवेंद्र भालेराव, आणि महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. पराग कुलकर्णी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात वरिष्ठ प्राध्यापक जावेद शेख यांनी केलेल्या प्रस्तावनेने झाली. यावेळी, मागील वर्षी मतदार जनजागृती मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवणाऱ्या विद्यार्थी प्रतिनिधी आणि स्थानिक बूथ लेवल ऑफिसर यांचा स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
विद्यार्थ्यांचे मनोगत आणि अहवाल सादरीकरण..
विद्यार्थी प्रतिनिधी संकेत ठोसर यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि महाविद्यालयाने मागील वर्षी मतदार जनजागृतीसाठी राबवलेल्या विविध उपक्रमांचा अहवाल सादर केला.
तहसीलदारांचे मार्गदर्शन...
तहसीलदार प्रदीप पाटील यांनी विद्यार्थ्यांना आपापल्या गावांमध्ये आणि शहरांमध्ये मतदानविषयी जनजागृती करण्याचे आवाहन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना आपल्या पालकांना मतदानाचे महत्त्व पटवून देण्याचीही सूचना केली.
लोकशाही शपथ आणि अध्यक्षीय भाषण..
कार्यक्रमाच्या विशेष भागामध्ये उपस्थित विद्यार्थ्यांना लोकशाहीवरील निष्ठा कायम राखण्याची शपथ देण्यात आली. यानंतर प्राचार्य डॉ. विजय शास्त्री यांनी अध्यक्षीय भाषण केले. त्यांनी मतदानाचे महत्त्व स्पष्ट केले आणि धर्म, जात, भाषा किंवा अन्य कोणत्याही प्रलोभनांपासून मुक्त राहून निष्पक्षपणे मतदान करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सुयोग्य आयोजन..
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. श्रद्धा शिवदे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. योगेश्वरी लोहार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले. हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये मतदार जनजागृतीचा संदेश पोहोचविण्यासाठी आणि लोकशाही मूल्यांची रुजवणूक करण्यासाठी महत्त्वाचा ठरला.